Ratan Tata death: टेल्कोमध्ये नोकरीला असणाऱ्या सुधा मूर्तींनी 'ती' गोष्ट मागितली, रतन टाटांनी क्षणभराचा विचार न करता हवं ते देऊन टाकलं
Ratan Tata death in Mumbai: रतन टाटा यांचं मुंबईत निधन. टाटा समूहाला नव्या उंचीवर नेणारा शिल्पकार हरपला.
मुंबई: टाटा उद्योग समूहाला जागतिक पातळीवर नव्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या रतन टाटा यांचे बुधवारी रात्री मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनामुळे उद्योगविश्वात शोककळा पसरली आहे. रतन टाटा (Ratan Tata) हे अनेकांसाठी आदर्श आणि प्रेरणास्थान होते. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती (Sudha Murty) यांनी रतन टाटा यांच्या निधनामुळे माझ्या आयुष्यातील 'ध्रुवतारा' गमावल्याची भावना व्यक्त केली.
मी कधी जमशेटजी टाटा किंवा दोराबजी टाटा यांना बघितलं नाही. अनेक लोक सांगायचे की, ते कमालीचे साधे आणि मूल्य जपणारे होते. मात्र, मी माझ्या आयुष्यात रतन टाटा यांना पाहिले. रतन टाटा हे साधे राहणीमान आणि सचोटीने मूल्य जपणारे व्यक्ती होते. त्यांना इतरांविषयी काळजी असायची. ते नव्या कल्पनांचे स्वागत करायचे. त्यांच्या जाण्याने उद्योग जगतातील एका पर्वाचा अंत झाला आहे. त्यांची जीभ शुद्ध होती. त्यांच्याकडे कमालीचा संयम होता. त्यांच्या जाण्याने मी आयुष्यातील ध्रुवतारा गमावल्यासारखं वाटतंय, अशी भावना सुधा मूर्ती यांनी व्यक्त केली.
सुधा मूर्तींनी तो फोटो मागितला अन् रतन टाटांनी...
सुधा मूर्ती यांनी रतन टाटा यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला. सुधा मूर्ती यांनी म्हटले की, मी 1994 साली त्यांना पहिल्यांदा भेटले होते. टेल्को कंपनीत असताना एकदा मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेले होते. ते मला सुधा या नावाने हाक मारायचे. त्यांनी मला विचारलं की, तुला काय हवंय? मी त्यांच्या ऑफिसमधील जमशेदजी आणि जेआरडी टाटा यांचा फोटो मागितला. रतन टाटांनी मला लगेच तो फोटो देऊन टाकला. तो फोटो आजही माझ्याकडे आहे, असे सुधा मूर्ती यांनी सांगितले.
अन् रतन टाटा हुबळीतीली लहानशा गावात कॉलेजच्या कार्यक्रमाला गेले
सुधा मूर्ती यांनी रतन टाटा यांच्या साधेपणाचा आणखी एक किस्सा सांगितला. त्यांनी म्हटले की, मी हुबळीला एका लहानशा महाविद्यालयात शिक्षण घेतले. मी टाटा समूहात कामाला लागल्यानंतर मला महाविद्यालयातील सगळेजण बोलायचे, तुम्ही रतन टाटांना भेटलात, आम्ही कधी भेटणार? मी त्यांना प्रयत्न करेन, एवढेच बोलायचे. एकदा मी रतन टाटा यांना सांगितले की, आमच्या गावातील लोकांना तुम्हाला भेटायची इच्छा आहे. आमचं गाव मुंबईसारखं नाही. तुम्ही बिझी असता, तुमच्याकडे वेळ नसतो. पण माझ्या गावातील लोकांना तुम्हाला भेटायचे आहे. माझं बोलणं ऐकून घेतल्यावर त्यांनी लगेच हुबळीतील महाविद्यालयात येण्यासाठी होकार दिला. तिकडे येऊन ते विद्यार्थ्यांशी बोलले. ते माझ्यासारख्या साध्या कर्मचाऱ्याच्या सांगण्यावरुन हुबळीच्या त्या लहानशा महाविद्यालयात आले, याचे मला आश्चर्य वाटते, असे सुधा मूर्ती यांनी सांगितले.
आणखी वाचा
मैनु विदा करो... मुंबईच्या गरब्यातील सळसळती पावलं रतन टाटांसाठी थांबतात तेव्हा, VIDEO व्हायरल