Ratan Tata Death: मैनु विदा करो... मुंबईच्या गरब्यातील सळसळती पावलं रतन टाटांसाठी थांबतात तेव्हा, VIDEO व्हायरल
Ratan Tata Death in Mumbai: रतन टाटा यांचं निधन. रतन टाटांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईतील गरब्यात चिडीचूप शांतता.
मुंबई: टाटा समूह आणि भारतीय उद्योग क्षेत्राची पताका आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाने फडकावणारे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी बुधवारी रात्री मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून रतन टाटा यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. रतन टाटा (Ratan Tata) यांनी स्वत: दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली प्रकृती ठीक असल्याचे सांगितले होते. मात्र, बुधवारी त्यांची प्रकृती खालावत गेली आणि रात्रीच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटा हे केवळ एक उद्योजक म्हणूनच नव्हे तर सामान्य व्यक्तींच्यादृष्टीनेही कुतूहलाचा विषय होते. रतन टाटा यांचे कर्तृत्व, त्यांचा साधेपणा किंवा त्यांचे श्वानप्रेम यांची अनेक किस्से सामान्य जनतेत कायम चर्चेचा विषय असायचे. रतन टाटा यांच्याशी सामान्य लोकांचा थेट संबंध येत नसला तरी त्यांच्याविषयीच्या अनेक दंतकथा रतन टाटा आणि 'कॉमन मॅन'चा एक खास ऋणानुबंध तयार झाला होता. हा ऋणानुबंध किती घट्ट होता, याचा प्रत्यय बुधवारी रतन टाटा यांच्या निधनानंतर आला.
मुंबईत सध्या नवरात्रौत्सव सुरु असल्याने संध्याकाळी ठिकठिकाणी गरब्याचा (Mumbai Garba) सोहळा रंगताना दिसतो. गोरेगावच्या नेस्को मैदानावर आयोजित केला जाणारा गरबा हा अनेकांच्या आकर्षणाचा विषय आहे. याठिकाणी आबालवृद्ध गरबा खेळण्यासाठी येतात आणि देहभान विसरुन गरबा खेळताना दिसतात. मात्र, बुधवारी रात्री रतन टाटा यांच्या निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर नेस्कोच्या मैदानावरील गरब्यात देहभान विसरुन थिरकरणारी पावले थांबली. एरवी रात्रीच्यावेळी नेस्को मैदानावर गरब्याची गाणी आणि तुफान नाच सुरु असतो. परंतु, रतन टाटा यांच्या निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर याठिकाणी मौन बाळगून रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी नेस्को मैदानावर चिडीचूप शांतता पसरली होती. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
रतन टाटा यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी नरिमन पाईंट येथील NCPA येथे ठेवण्यात येणार आहे. दुपारी चार वाजेपर्यंत सामान्य लोकांना रतन टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येईल. त्यानंतर रतन टाटा यांच्यावर वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील. रतन टाटा यांच्या निधनानंतर राज्य सरकारने एका दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे मंत्रालयावरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. त्यामुळे आज नियोजित असलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवरही टांगती तलवार आहे.
आणखी वाचा
रतन टाटांच्या निधनानंतर मुंबई पोलिसांचं ट्विट होतंय व्हायरल, इंडिया लॉस्ट इटस् रतन!