(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Share Market Opening : भारतीय शेअर बाजारात उसळी; सेन्सेक्स 540 अंकांनी वधारला
Share Market Opening : शेअर बाजारात आज खरेदीचा जोर दिसत असून सेन्सेक्स 500 अंकांनी वधारला आहे.
Share Market Opening : आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराने उसळी घेतली आहे. बाजारात खरेदीचा जोर दिसत असून सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक वधारले आहेत. आशियाई बाजार पाॅझिटिव्ह ट्रेंड करत असल्याने भारतीय बाजारात उत्साहाचे वातावरण दिसत आहे. त्याशिवाय, अमेरिकन शेअर बाजारातही गुरुवारी तेजी दिसून आली होती. त्याचाही परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला.
शेअर बाजारात खरेदीचा जोर दिसत असल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक वधारला आहे. बीएसईचा निर्देशांक सेन्सेक्स 427.49 अंकांनी वधारत 56,245 अंकांवर सुरू झाला. त्यानंतर एनएसईचा निफ्टी निर्देशांक 133.65 अंकांनी वधारत 16761 अंकांवर सुरू झाला.
बाजारातील व्यवहाराला सुरुवात झाल्यानंतर 10 मिनिटातच शेअर बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये जवळपास 536.21 अंकांची तेजी दिसून आली. तर, निफ्टीत 144.70 अंकांची उसळण दिसून आली.
निफ्टी 50 मधील 37 शेअर दरात तेजी दिसून आली आहे. तर, 13 शेअर दरात घसरण दिसून येत आहे. बँक निफ्टीतही खरेदी दिसत असून 194 अंकांनी वधारला आहे. बँक निफ्टीत 35808 या पातळीवर व्यवहार करत आहे.
आज आयटी कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. एचसीएल, इन्फोसिस कंपन्यांच्या शेअर दरात वाढ झाली आहे. विप्रोच्या शेअर दरात 2.68 टक्के, टेक महिंद्राच्या शेअर दरात 2.37 टक्के, इन्फोसिसमध्ये 2.19 टक्क्यांची उसळण दिसून येत आहे. एचसीएल टेक 2.16 टक्के आणि बजाज फिनसर्व्ह शेअर 1.92 टक्क्यांनी वधारला आहे.
तर, श्री सिमेंटमध्ये 1.87 टक्के आणि अल्ट्राटेक सिमेंटमध्ये 1.26 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. एनटीपीसीच्या शेअर दरात जवळपास एक टक्क्यांची घसरण दिसत आहे.
दरम्यान, गुरुवारी शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्समध्ये 436 अंकांची वाढ झाली. तर निफ्टीही 105 अंकांनी वधारला होता. बाजार बंद होताना रिलायन्सच्या शेअर्समध्ये तीन टक्क्यांची वाढ झाली. गेल्या महिन्याभरातील कंपनीची ही सर्वात चांगली कामगिरी आहे. तसेच फायनान्शिअल मार्केटमधील HDFC, HDFC Bank आणि ICICI Bank यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली.
गुरुवारी, शेअर बाजार बंद होताना 1919 कंपन्यांच्या शेअर्स दरात वाढ नोंदवण्यात आली. तर 1301 कंपन्यांचे शेअर्स घसरले होते. 134 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नव्हता.