Share Market Opening Bell: शेअर बाजारात आजही तेजीचे संकेत; सेन्सेक्स 300 अंकांनी वधारला, पण...
Share Market Opening Bell: शेअर बाजारातील व्यवहाराची आजची सुरुवात तेजीसह झाली. मात्र, बाजारात आज अस्थिरता राहण्याचे संकेत दिसत आहेत.
Share Market News: भारतीय शेअर बाजारात सोमवारी दिसलेली तेजी आजही कायम दिसत आहे. मेटल (Nifty Metal), आयटी (IT), बँकिंग सेक्टरमध्ये (Banking) खरेदीचा जोर दिसून येत असल्याने शेअर बाजार वधारला आहे. प्री-ओपनिंग सत्रातही बाजारात तेजी दिसून आली होती. त्यानंतर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर खरेदीचा ओघ कायम दिसत आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (BSE Sensex) 295 अंकांच्या तेजीसह 60,861.41 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) 75 अंकांच्या तेजीसह 18,089.80 अंकांवर खुला झाला. त्यानंतर विक्रीचा दबाव वाढला. सकाळी 9.35 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 99 अंकांच्या घसरणीसह 60,466.67 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 22.30 अंकांच्या घसरणीसह 17,992.30 अंकांवर व्यवहार करत होता.
सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 16 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसत आहे. तर, 14 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 32 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. तर, 18 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे. निफ्टी निर्देशांकातील जेएसडब्लू स्टीलच्या शेअर दरात 2.33 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर, टाटा मोटर्सच्या शेअर दरात 2.20 टक्के, हिंदाल्कोच्या शेअर दरात 1.91 टक्के, टाटा स्टीलच्या शेअर दरात 1.76 टक्के, ओएनजीसीच्या शेअर दरात 1.13 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. तर, महिंद्रा अॅण्ड महिंद्राच्या शेअर दरात 0.74 टक्के, बजाज फिनसर्व्हमध्ये 0.70 टक्के, यूपीएलमध्ये 0.68 टक्के, एचडीएफसी बँकेच्या शेअर दरात 0.61 टक्के, आयटीसीच्या शेअर दरात 0.61 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.
'शेअर इंडिया'चे उपाध्यक्ष आणि संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. रवी सिंह यांनी सांगितले की, आज बाजारातील व्यवहार 17800-18200 दरम्यान होण्याची शक्यता आहे. बाजारात आज सकारात्मक वातावरण दिसत आहे. पीएसयू बँक, मीडिया, रियल्टी, मेटल सेक्टरमध्ये खरेदीचा जोर दिसू शकतो. तर, फार्मा, आयटी, एफएमसीजी, इन्फ्रा, ऑटोमध्ये घसरण होण्याची शक्यता आहे. बँक निफ्टी निर्देशांक 42400-42900 दरम्यान व्यवहार करण्याची शक्यता असल्याचे डॉ. रवी सिंह यांनी सांगितले. आज बँक निफ्टीत तेजी दिसण्याची शक्यता आहे.
सोमवारी बाजारात तेजी
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 704 अंकांची तेजी दिसून आली. सेन्सेक्स 60,555 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 200 अंकांच्या तेजीसह 18006 अंकांवर स्थिरावला. फार्मा आणि हेल्थकेअर समभाग वगळता इतर सर्व क्षेत्रातील समभाग वधारत बंद झाले. बँकिंग सेक्टरमध्ये खरेदीचा उत्साह दिसून आला. बँक निफ्टी 2.31 टक्क्यांनी वधारत बंद झाला.