(Source: ECI/ABP News/ABP Majha)
डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण; कमकुवत रुपयाने तुमच्या खिशावर काय परिणाम? जाणून घ्या
Rupee Falling Against US Dollar : डॉलरच्या तुलनेत रुपयात सातत्याने घसरण होत असून त्याचा परिणाम सामान्यांवर होत आहे.
Rupee Falling Against US Dollar : डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या किंमतीत सातत्याने घसरण होत आहे. गुरुवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाची 77.81 या किंमतीवर घसरण झाली. आतापर्यंत रुपयाने गाठलेला हा नीचांकी स्तर आहे. येत्या काही महिन्यात एक डॉलरच्या तुलनेत रुपयाची 80 रुपये किंमत होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. अमेरिकेत वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने बँकेतील व्याज दर वाढवण्याचा निर्णय घेतल्यास शेअर बाजारातून गुंतवणुकदार आपली गुंतवणूक आणखी कमी करू शकतात. त्याच्या परिणामी रुपया आणखी कमकुवत होऊ शकतो. पदेशी गुंतवणुकदारांकडून सातत्याने विक्री सुरू असल्याने शेअर बाजारात घसरण सुरू आहे. रुपयात घसरण झाल्याने सामान्यांवर ही त्याचा परिणाम होणार आहे.
डॉलर वधारल्याने काय परिणाम होणार?
कच्च्या तेलाची आयात: भारत कच्च्या तेलाची सर्वाधिक आयात करतो. भारतातील इंधनाची गरज भागवण्यासाठी 80 टक्के कच्चे तेल आयात केले जाते. सरकारी इंधन कंपन्यांकडून डॉलरमध्ये कच्च्या तेलाची खरेदी केली जाते. रुपयाच्या तुलनेत डॉलर महाग झाल्यास भारतीय इंधन कंपन्यांना कच्चे तेल खरेदी करण्यासाठी अधिक डॉलर मोजावे लागतील.
परदेशातील शिक्षण महाग: परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खर्चातही वाढ होणार आहे. परदेशातील शिक्षण आणि तेथील वास्तव्याचा खर्च आणखी महाग होण्याची शक्यता आहे. जून ते ऑगस्ट दरम्यान प्रवेश प्रक्रिया सुरू होते. त्यावेळी डॉलरची किंमत वाढते. डॉलरचा दर वधारल्यास पालकांवर आणखी आर्थिक बोजा पडण्याची शक्यता आहे.
खाद्य तेलाच्या किंमतीत वाढ : खाद्य तेलाचे दर आधीपासूनच कडाडले आहेत. देशातंर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी खाद्य तेल आयात करण्यात येत आहे. डॉलरचा दर वाढल्याने खाद्य तेलाच्या आयातीसाठी आणखी परदेशी चलन खर्च करावे लागतील. त्याचा परिणाम खाद्य तेलांच्या किंमतीवर होणार आहे.
मोबाईल लॅपटॉप महाग होणार: ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडून सु्ट्टे भाग परदेशातून आयात केले जातात. मोबाईल, लॅपटॉपमध्ये वापरण्यात येणारे अनेक सुट्टे भाग परदेशातून येतात. त्यामुळे रुपयाची घसरण झाल्यास आयात महाग होणार आहे.
रोजगारवर परिणाम: रुपयात होत असलेल्या घसरणीचा परिणाम रोजगारावर होण्याची शक्यता आहे. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे ज्वेलरी उद्योगावर परिणाम झाला आहे. आता, डॉलर वधारल्याने या क्षेत्रात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याशिवाय इतर क्षेत्रांवरही रुपयाच्या घसरणीचा परिणाम जाणवत आहे.