(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rules Changes from 1st November 2022: उद्यापासून होणार 'हे' पाच बदल; तुमच्या खिशावर होणार परिणाम!
Rules Changes from 1st November 2022: उद्यापासून 1 नोव्हेंबर 2022 पासून काही बदल होणार आहेत. या बदलामुळे तुमच्या खिशांवर परिणाम होणार आहे.
Rules Changes from 1st November 2022: ऑक्टोबर महिन्याचा आजचा शेवटचा दिवस असून उद्यापासून काही नियमांमध्ये बदल होणार आहे. या बदलांचा परिणाम तुमच्या खिशावरदेखील होणार आहे. एलपीजी गॅस सिलेंडर, विमा दाव्याबाबतच्या नियमांत बदल होणार आहेत. त्याशिवाय, भारतीय रेल्वेच्या वेळापत्रकातही बदल होण्याची शक्यता आहे.
एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात बदल
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला पेट्रोलियम कंपन्यांकडून एलपीजी गॅसचे दर जाहीर केले जातात. इंधन कंपन्यांकडून दर महिन्याच्या पहिल्या तारखेला घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठीच्य दरात बदल करतात. या, ऑक्टोबर महिन्यात व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलेंडर दरात 25.5 रुपयांची कपात करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅस दरात झालेली वाढ लक्षात एलपीजी गॅसचे दर वाढण्याची शक्यता आहे.
ओटीपी सांगितल्यावर सिलेंडरची डिलिव्हरी
घरगुती गॅस सिलेंडरच्या डिलिव्हरी प्रक्रियेत बदल होणार आहे. आता, ओटीपी सांगितल्यावर गॅस सिलेंडर मिळणार आहे. गॅस सिलेंडर बुकिंग करताना तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवण्यात येईल. हा ओटीपी गॅस सिलेंडर घेऊन आलेल्या कर्मचाऱ्याला सांगावा लागणार आहे. ओटीपीनंतरच तुम्हाला गॅस सिलेंडर दिला जाईल.
विमा दाव्याबाबत नियमात बदल
विमा नियामक प्राधिकरणाच्यावतीने नोव्हेंबर महिन्यात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, 1 नोव्हेंबर 2022 पासून विमाधारकांना KYC माहिती देणे बंधनकारक ठरणार आहे. आतापर्यंत पॉलिसी खरेदी करताना KYC विवरण देणे ऐच्छिक आहे. मात्र, नोव्हेंबर महिन्यापासून KYC देणे अनिवार्य करण्यात आले आहे. याचा अर्थ असा की, विमा दावा करताना KYC डॉक्युमेंट सादर न केल्यास दावा रद्द केला जाऊ शकतो.
GST रिटर्नसाठी कोड क्रमांक
जीएसटी रिटर्नच्या नियमांमध्ये बदल करण्यात येत आहे. आतापर्यंत 5 कोटींपेक्षा कमी टर्नओव्हर असलेल्या करदात्यांना जीएसटी रिटर्नमध्ये चार अंकी HSN कोड नमूद करणे अनिवार्य असणार आहे. याआधी दोन आकडी HSN कोड नमूद करावा लागत होता.
रेल्वेचे वेळापत्रक बदलणार
भारतीय रेल्वे एक ऑक्टोबरपासून गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करत असे. मात्र, यंदा एक नोव्हेंबरपासून रेल्वेचे नवीन वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. त्यामुळे उद्यापासून, एक नोव्हेंबरपासून सुपरफास्ट, राजधानी एक्स्प्रेसच्या ट्रेनमध्ये बदल होणार आहेत.