Mukesh Ambani Stock: मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचं वर्चस्व संकटात, टाटा ग्रुपची 'ही' कंपनी जवळ पोहोचली, पहिलं स्थान हातून निसटणार?
Reliance Vs TCS: रिलायन्स इंडस्ट्रीजचं बाजारमूल्य 16.55 लाख कोटींपर्यंत आलं आहे. रिलायन्सच्या शेअरमध्ये जुलै 2024 पासून आतापर्यंत 24 टक्क्यांची घसरण झाली आहे.
Reliance Stock Price मुंबई : देशातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वर्चस्वाला धक्का पोहोचू शकतो. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीज भारतातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेली कंपनी आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून रिलायन्स इंडस्ट्रीजच्या स्टॉकमध्ये घसरण होत आहे. यामुळं शेअर बाजारातील सर्वाधिक बाजारमूल्य असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वर्चस्वाला धक्का बसू शकतो. 8 जुलै 2024 मध्ये आतापर्यंतच्या सर्वात उच्चांकी पातळीवर रिलायन्सचा शेअर पोहोचला तिथून आतापर्यंत शेअरमध्ये 24 टक्के घसरण झाली आहे.
रिलायन्सचं बाजारमूल्य 16.55 लाख कोटींवर
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये घसरण झाल्यानं बाजारमूल्य देखील 16.55 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. सहा महिन्यांपूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजचं बाजारमूल्य 21 लाख कोटी रुपयांवर पोहोचली होती. तिथून त्यामध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. 8 जुलै रोजी रिलायन्सचा शेअर 1608 रुपयांवर होते. तिथून जवळपास शेअर 24 टक्क्यांनी घसरुन 1222 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. आज देखील शेअरमध्ये घसरण सुरु आहे.
TCS रिलायन्सला धक्का देणार?
रिलायन्स इंडस्ट्रीजचं बाजारमूल्य 16.55 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. दुसरीकडे टाटा ग्रुपच्या टीसीएसचं बाजारमूल्य 15.12 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये 1.43 लाख कोटींचा फरक राहिला आहे. बाजारमूल्य विचारात घेतलं असता तिसऱ्या स्थानावर एचडीएफसी तिसऱ्या स्थानावर आहे. एचडीएफसी बँकेचं बाजारमूल्य 13.74 लाख कोटी रुपये आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये घसरण सुरु राहिली आणि टीसीएसच्या शेअरमध्ये तेजी राहिल्यास चित्र बदलू शकतं. रिलायन्स इंडस्ट्रीजचं बाजारमूल्य घसरल्यानं ते दुसऱ्या स्थानावर जाऊ शकतात.
2025 मध्ये रिलायन्स जिओचं लिस्टींग शक्य?
2025 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये तेजीची शक्यता पाहायला मिळते. रिलायन्स समूह टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओचा आयपीओ 2025 येऊ शकतो. त्यावेळी रिलायन्सच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळू शकते. अलीकडच्या काळात ब्रोकरेज हाऊसनं रिलायन्सच्या स्टॉकसाठी टारगेट प्राईस वाढवली होती.
CLSA-Jefferies यांनी त्यांच्या रिसर्च नोटमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीचा स्टॉक 1700 रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज वर्तवला आहे. रिलायन्स जिओचा आयपीओ 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत लाँच होण्याची शक्यता असल्यानं रिलायन्स जिओ अन् रिटेल क्षेत्रातील इतर व्यवसायांच्या आणि अक्षय्य ऊर्जा क्षेत्रातील नव्या व्यवसायाच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 2186 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
इतर बातम्या :
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)