पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चीन दौरा, दहशतवाद, व्यापार ते सिमेवरील शांतता यावर दोन्ही देशांचं एकमत, परराष्ट्र मंत्रालयाची महत्वपूर्ण माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे चीनच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा केली आहे.
PM Modi-Xi Jinping Meeting : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे चीनच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा केली आहे. चीनच्या तियानजिन शहरात झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) वार्षिक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद, सीमा वाद आणि व्यापार यासह अनेक जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली.
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. विक्रम मिस्री म्हणाले की, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमापार दहशतवादाचा उल्लेख केला. त्यांनी सीमापार दहशतवादाच्या मुद्द्यावर आपले म्हणणे अगदी स्पष्ट आणि अचूकपणे मांडले.
दहशतवादाच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींनी चीनचा पाठिंबा मागितला
पंतप्रधान मोदी म्हणाले, 'चीन आणि भारत दोघेही दहशतवादाचे बळी राहिले आहेत आणि भारत अजूनही त्याच्याशी लढत आहे.' दहशतवादाच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींनी चीनकडून पाठिंबा मागितला आहे. ज्यावर चीनने पाठिंबा देण्याचे सांगितले. यानंतर, पंतप्रधान मोदी म्हणाले की, सीमेवर शांतता आणि सौहार्द राखणे हे संबंधांच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचं आहे. सीमेवरील परिस्थिती कोणत्या ना कोणत्या प्रकारे एकूण संबंधांवर प्रतिबिंबित करेल असे मोदी म्हणाले.
द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी जिनपिंग यांच्या सूचना
भारत आणि चीनमधील मतभेदांना वादात रूपांतरित होऊ देऊ नये असे मोदी आणि शी यांचे मत होते. त्याच वेळी, पंतप्रधान मोदी यांनी संबंधांच्या निरंतर आणि सुरळीत विकासासाठी सीमावर्ती भागात शांतता आणि सौहार्द राखण्याची गरज यावर भर दिला. याशिवाय, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी पंतप्रधान मोदींशी झालेल्या चर्चेदरम्यान द्विपक्षीय संबंध अधिक सुधारण्यासाठी चार सूचना दिल्या. स्थिर आणि सौहार्दपूर्ण भारत-चीन संबंध दोन्ही देशांच्या 2.8 अब्ज लोकांना लाभदायक ठरू शकतात यावर एकमत झाले.'
दीर्घकालीन द्विपक्षीय विकासाबाबत त्यांचे विचार मांडले
परराष्ट्र मंत्रालयाच्या (MEA) निवेदनानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी द्विपक्षीय संबंधांच्या त्यांच्या संबंधित तत्त्वांबद्दल चर्चा केली, जे भविष्यातील कृतींना मार्गदर्शन करण्यास मदत करतील अशी अपेक्षा आहे. याशिवाय, पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दोन्ही देशांच्या दीर्घकालीन वाढ आणि विकासासाठी त्यांचे दृष्टिकोन देखील शेअर केले.
परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनानुसार, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अनेक जागतिक समस्या आणि चालू आव्हानांवरही चर्चा केली. टॅरिफवर बोलताना, दोन्ही नेत्यांनी आंतरराष्ट्रीय आर्थिक परिस्थितीवरही चर्चा केली. त्यांनी मान्य केले की आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना अनेक आव्हाने निर्माण करत आहेत. या बदलत्या आव्हानांमध्ये भारत आणि चीनमधील समज कशी चांगली विकसित करावी आणि परस्पर संबंध कसे पुढे नेले पाहिजेत यावरही दोन्ही नेत्यांनी विचार केला.
महत्वाच्या बातम्या:
























