Paytm Shares : पेटीएमचे शेअर्स 10 टक्क्यांनी कोसळले, आरबीआयच्या निर्बंधांनंतर व्यापारी वर्गात चिंता
Paytm Stocks : गुंतवणुकदारांचे मोठे नुकसान होऊ नये, यासाठी बीएसईने लिमिट बदललं होतं. मात्र, तरीही आज देखील पेटीएमच्या समभागात 10 टक्क्यांची घसरण झाली आहे.
Paytm Share Market Update : आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराची (Stock Market) सुरुवात घसरणीसह झाली आहे. आरबीआयच्या निर्बंधांनंतर पेटीएमची चिंता वाढली आहे. पेटीएमचे शेअर्स आज 10 टक्क्यांनी कोसळले आहेत. बीएसईकडून पेटीएमच्या स्टॉक्सच्या (Paytm Stocks) लोअर सर्किटची लिमिट 20 टक्क्यांवरून 10 टक्के घटवली होती. गुंतवणुकदारांचे मोठे नुकसान होऊ नये, यासाठी बीएसईने लिमिट बदललं होतं. मात्र, तरीही आज देखील पेटीएमच्या समभागात 10 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यासोबतच लोअर सर्किटही लागलं आहे. मागील तीन सेशन्समध्ये पेटीएमच्या शेअर्समध्ये 42 टक्क्यांची घसरण झाली होती.
पेटीएमचे शेअर्समध्ये घसरण सुरुच
पेटीएमची मागील दोन सेशन्समध्ये 17 हजार कोटींनी मार्केट कॅप घटली आहे. पेटीएमची पॅरेंट कंपनी वन 97 कम्युनिकेशनकडून माध्यमांमध्ये ईडी चौकशी संदर्भातल्या बातम्यांसंदर्भात खुलासा करण्यात आला आहे. वन 97 कम्युनिकेशनकडून ईडी चौकशीचं वृत्त फेटाळण्यात आलं आहे. वन 97 कम्युनिकेशनने याबाबत माहिती देताना सांगितलं आहे की, अंमलबजावणी संचालनालयाकडून कंपनी किंवा तिचे संस्थापक आणि सीईओ यांची मनी लाँड्रिंग संदर्भात कोणतीही चौकशी केली जात नाहीय. आमचे प्लॅटफॉर्म वापरणारे काही व्यापारी चौकशीला सामोरे जात आहेत, असं कंपनीने म्हटलं आहे. आम्ही भारतीय कायद्यांचे पालन करत आहोत आणि नियमकाचे आदेश गांभीर्याने घेत असल्याचं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
पेटीएमवरील निर्बंधामुळे व्यापारी वर्गात चिंता
आरबीआयकडून पेटीएमवर लावण्यात आलेल्या निर्बंधांनंतर व्यापारी वर्गात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सीएआयटीकडून पेटीएम न वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पेटीएमऐवजी दुसऱ्या ॲपचा वापर करण्याचा सल्ला कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने व्यापारी वर्गाला दिला आहे. देशाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांसोबत व्यवहार न करता इतर कोणत्याही ॲपचा विचार व्हावा, आरबीआयकडून केलेल्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी दिली आहे.
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात
आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली आहे. पहिल्याच सत्रात सेन्सेक्ससह निफ्टीही घसरणीसह उघडला. आज बाजार सुरु होताच सेन्सेक्समध्ये 100 अंकांची घसरण तर निफ्टी निर्देशांकात 8 अंकांची घसरण झाली आहे. आशियाई बाजारातील संथ सुरुवातीचे भारतीय शेअर बाजारावर परिणाम दिसून येत आहे. मंगळवारपासून आरबीआयची पतधोरण समितीची बैठक पार पडणार आहे. रेपो रेटमध्ये कपात होणार नसली तरी महागाई दर, विकास दरासंदर्भात भाष्य होण्याची शक्यता आहे. यासोबतच, रेपो रेटमध्ये बदल होणार नसला तरी स्टान्स न्यूट्रल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.