समोर समुद्र, आसपास चित्रपट कलाकारांची घरं; मुंबईतील 'या' ठिकाणी तब्बल 100 कोटींना फ्लॅटची विक्री
मुंबईत (Mumbai) अनेकदा मोठ्या प्रॉपर्टींची डील झाल्याच्या बातम्या येत असतात. मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये (Real Estate Market) 100 कोटी रुपयांची मोठी प्रॉपर्टी डील झाल्याची माहिती मिळाली आहे.
Mumbai Luxury Flats: देशाची आर्थिक राजधानी मुंबईत (Mumbai) अनेकदा मोठ्या प्रॉपर्टींची डील झाल्याच्या बातम्या येत असतात. मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये (Real Estate Market) 100 कोटी रुपयांची मोठी प्रॉपर्टी डील झाल्याची माहिती मिळाली आहे. IndexTap.com ने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा रियल्टीचे संचालक परेश पारेख आणि विजय पारेख यांनी मुंबईतील वरळी भागात 100 कोटी रुपयांचे दोन फ्लॅट खरेदी केले आहेत.
जाणून घ्या काय आहे या फ्लॅट्सची खासियत
मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये मोठ्या आलिशान फ्लॅटची डील झाल्याची बातमी समोर आली आहे. दोन फ्लॅट 100 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. या कराराची कागदपत्रे IndexTap.com कडे आहेत. त्यानुसार हे दोन्ही फ्लॅट सुरक्षा रियल्टीने श्रीनामन रेसिडेन्सीमध्ये खरेदी केले आहेत. हे दोन्ही अपार्टमेंट 26व्या आणि 27व्या मजल्यावर आहेत. या दोन्ही फ्लॅटचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 6458 चौरस फूट आहे. एकूण चार गाड्यांसाठी पार्किंग एरिया देखील आहे. या दोन्ही फ्लॅटमध्ये 640 स्क्वेअर फूटची बाल्कनी आहे. मुंबईचा वरळी परिसर हा शहरातील पॉश भागांपैकी एक आहे. जिथे सी-व्ह्यू सोबतच शाहिद कपूर, अभिषेक बच्चन आणि अक्षय कुमार यांसारख्या अनेक दिग्गज चित्रपट कलाकारांची घरे आहेत. सुरक्षा रियल्टीने या दोन आलिशान फ्लॅटसाठी 50-50 कोटी रुपये शुल्क भरले आहे. याशिवाय 3-3 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहेत. हा करार 7 नोव्हेंबर 2023 रोजी झाला होता.
रेखा झुनझुनवाला यांच्या कंपनीने 740 कोटी रुपयांची प्रॉपर्टी केली डील
अलीकडेच अशी बातमी आली होती की दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या कंपनी Kinnteisto LLP ने मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आणि चांदिवली परिसरात दोन व्यावसायिक मालमत्तांसाठी करार केला आहे. ही दोन्ही कार्यालये एकूण 740 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली आहेत. हे कार्यालय क्षेत्र एकूण 1.94 लाख चौरस फुटांमध्ये पसरलेले आहे.
'या' शहरांमध्ये आलिशान फ्लॅट्सची मोठ्या प्रमाणात विक्री
रिअल इस्टेट सल्लागार कंपनी CBRE साउथ एशियाने आपल्या अहवालात सांगितले आहे की, 2023 मध्ये लक्झरी घरांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या फ्लॅटच्या विक्रीत 97 टक्क्यांची वाढ झाली आहे. अहवालानुसार, जानेवारी ते सप्टेंबर 2023 दरम्यान लक्झरी श्रेणीतील 9,246 घरे विकली गेली आहेत. गेल्या वर्षी या कालावधीत एकूण 4689 घरांची विक्री झाली होती. आलिशान घरांच्या विक्रीच्या बाबतीत दिल्ली-एनसीआर पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर मुंबई आणि तिसऱ्या क्रमांकावर हैदराबादचे नाव आहे.