(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Inflation : महागाई तुमचा खिसा आणखी कापणार! औषधांच्या दरवाढीची टांगती तलवार
Inflation Pharma : महागाईने हैराण झालेल्या नागरिकांना आणखी झळ बसण्याची शक्यता आहे. औषधांच्या किंमतीत वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Inflation Pharma : महागाईने (Inflation) आधीच सामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता औषधांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. आधीच आरोग्यावरील खर्च करणे अनेकांना शक्य नसते. त्यातच आता औषधांच्या दरवाढीची टांगती तलवार सामान्यांवर आहे. औषध निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरवाढीच्या परिणामी औषधांचा खर्च वाढणार असल्याचे म्हटले जात आहे.
'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोना महासाथीच्या काळापासून ते आतापर्यंत काही औषधांच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात 100 टक्के वाढ झाली आहे. पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक्समध्ये सुधारणा झाल्यानंतरही कच्च्या मालाच्या वाढत्या किंमतीने फार्मा उद्योगांची चिंता वाढवली आहे. चीनमधून आयात केलेल्या अॅझिथ्रोमायसिन आणि अमोक्सिसिलिनसह हाय वॅल्यूड अॅण्टीबायोटिक औषधांच्या किंमतीत वाढ झाली आहे. काही औषधांसाठी भारताला चीनवर अवलंबून राहावे लागते. जीवनसत्त्वे ब आणि ड सह इतर जीवनसत्त्वांच्या औषधांच्या किंमती देखील चीनमधून आयातीवर अवलंबून असतात.
या औषधांच्या किमती दुप्पट
वृत्तानुसार, महत्त्वाच्या अॅण्टीबायोटिक औषधांसह अॅण्टी-ट्यूबरक्युलोसिस रिफाम्पिसिन आणि अॅण्टी-डायबिटीज मेटफॉर्मिन आदी औषधांची कोरोना महासाथीपूर्वीच्या दराच्या तुलनेत सध्या दुप्पट दराने विक्री होत आहे. ही औषधे परदेशातून मोठ्या प्रमाणात आयात केली जातात. मागील काही वर्षांत आयात वाढली असून त्याच्या खर्चातही वाढ झाली आहे.
कोणत्या कारणांमुळे तुमचे मेडिकल बिल वाढणार?
औषधांच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणार्या कच्च्या मालाच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे आयात व्यवसायावर परिणाम झाला आहे. महागाई दरातील वाढ हे देखील मानले जाते. उत्पादनांच्या आयातीवरही इतर काही घटक परिणाम होत असल्याने औषधांच्या किंमती वाढल्या आहेत.
चीनमधून आयात होणाऱ्या औषधांमध्ये वाढ
मागील काही वर्षांत ज्या औषधांसाठी कच्चा माल चीनमधून आयात केला जातो, त्या औषधांचा खर्च वाढला आहे. विशेषतः, ताप आणि वेदना कमी करणारे पॅरासिटामॉल, जीवरक्षक अँटीबायोटिक मेरापेनेम आणि अँटी-डायबेटिक मेटफॉर्मिन यासारख्या काही औषधांच्या API किंमती 200 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. अशा औषधांसाठी भारत पूर्णपणे चीनवर अवलंबून आहे.
अन्नधान्य महागाईने चिंता वाढली
जानेवारी महिन्यात किरकोळ महागाई वाढल्याने चिंता वाढली. मात्र, अन्नधान्य महागाईत वाढ झाल्याने या चिंतेत भर पडली. अन्नधान्य महागाई डिसेंबर मधील 4.19 टक्क्यांच्या तुलनेत जानेवारी 2023 मध्ये 5.94 टक्क्यांवर पोहोचली आहे. आगामी काळात अन्नधान्य महागाई आणखी त्रासदायक ठरू शकते, असे म्हटले जात आहे. यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून अन्नधान्य उत्पादनात घट होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आणखी वाचा :
Share Market Updates : सलग आठव्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद; अदानींच्या स्टॉक्समध्ये खरेदीचा जोर