(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LPG Gas Price Hike : महंगाई डायन खाए जात है! सर्वसामान्यांच्या खिशाला चटका, घरगुती गॅस सिलेंडर दरात मोठी वाढ
LPG Gas Price Hike : सर्वसामान्यांना घरगुती गॅस सिलेंडर दरवाढीचा झटका बसला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाली आहे.
LPG Gas Price Hike : आधीच महागाईने बेजार झालेल्या सामान्य नागरिकांना आणखी एक झटका बसणार आहे. इंधन कंपन्यांनी घरगुती गॅसच्या दरात 50 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे 14.2 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडर दराने एक हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मुंबईत आता घरगुती वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1052.50 रुपये मोजावे लागणार आहेत. Oil Marketing Companies(OMCs) यांनी आज नवीन गॅस दर जाहीर केले आहेत.
राजधानी दिल्लीत घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1053 रुपये, कोलकातामध्ये 1079 रुपये आणि चेन्नईत 1068.50 रुपये मोजावे लागणार आहेत.
मागील एक वर्षात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात जवळपास 200 रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीत एक वर्षापूर्वी 834.50 रुपयांच्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा दर आज 1053 रुपये झाला आहे. याआधी मे महिन्यात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात चार रुपयांची वाढ झाली आहे. महागाईने आधीच सर्वसामान्यांचे बजेट बिघडले असताना त्यात आता एलपीजी गॅस दरवाढीची भर पडली आहे.
पाच किलोच्या सिलेंडरच्या दरात वाढ
पाच किलोच्या घरगुती सिलेंडर दरातही वाढ करण्यात आली आहे. पाच किलोच्या गॅस सिलेंडर दरात 18 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तर, 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 8.50 रुपयांची कपात झाली आहे.
6 दिवसांत दुसऱ्यांदा व्यावसायिक गॅस दरात कपात
व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा कपात करण्यात आली आहे. याआधी एक जुलै रोजी व्यावसायिक गॅस दरात 198 रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा 8.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. मुंबईत 19 किलोंचा व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचा दर 1975.50 रुपये झाला आहे. दिल्लीत 2012.50 रुपये, कोलकातामध्ये 2132 रुपये आणि चेन्नईत 2177.50 रुपये इतका दर झाला आहे.