(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIC शेअर गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी; परदेशी ब्रोकरेज हाऊसने दिला 'हा' सल्ला
LIC Share News : शेअर बाजारात लिस्ट झाल्यानंतर एलआयसीच्या शेअर दरात सातत्याने घसरण सुरू असताना एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
LIC Share Price : शेअर बाजारात लिस्ट झाल्यानंतर एलआयसीचा शेअर दर एका महिन्यातच आयपीओ किंमतीच्या तुलनेत 31 टक्क्यांनी घसरला आहे. सध्या एलआयसीचा शेअर 658 रुपयांवर व्यवहार करत होता. सोमवारी, एलआयसी शेअरसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. परदेशी दिग्गज ब्रोकरेज हाऊस जेपी मॉर्गनने एलआयसी शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा शेअर सध्याच्या किंमतीहून 29 टक्के अधिक परतावा देऊ शकतो.
जेपी मॉर्गनने एलआयसी शेअर बाबत म्हटले की, एलआयसी शेअर किंमतीबाबत चुकीचे अंदाज वर्तवण्यात येत आहेत. एलआयसीच्या शेअर दरात जेवढी घसरण येणे अपेक्षित होते, तेवढी घसरण झाली आहे. जेपी मॉर्गने एलआयसी शेअर कव्हरेजला ओव्हरवेट असा शेरा दिला आहे मार्च 2023 पर्यंत रहा एलआयसीच्या या शेअरची किंमत 840 रुपये होण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी म्हटले. सध्या असलेल्या एलआयसी शेअर किंमतीपेक्षा 29 पट अधिक रिटर्न या पातळीवरून दिले जाऊ शकतात.
जेपी मॉर्गन या ब्रोकरेज संस्थेच्या या नव्या अहवालानंतर एलआयसी गुंतवणूकदार आणि पॉलिसीधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एलआयसीच्या शेअर दरात घसरण सुरू असल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. एलआयसीचा आयपीओ 949 रुपये प्रति शेअर इतका झाला होता. सध्या शेअर 658 रुपयांवर व्यवहार करत आहे. एलआयसीच्या शेअर दरात होत असलेल्या सततच्या घसरणीमुळे कंपनीचे बाजार भांडवलदेखील घसरले आहे. सध्या एलआयसीचे बाजार भांडवल 4.16 लाख कोटी रुपये इतके झाले आहे.
शेअर बाजारात एलआयसी लिस्ट झाली तेव्हा कंपनीचे बाजार भांडवलमूल्य 6 लाख कोटी रुपये होते. त्यामुळे विक्रीच्या दबावामुळे एलआयसीच्या बाजार भांडवलात 1.64 लाख कोटींची घट झाली आहे.
केंद्र सरकारने काय म्हटले?
दरम्यान, DIPAM चे सचिव तुहिनकांत पांडे यांनी काही दिवसांपूर्वीच एलआयसीच्या शेअरबाबत भाष्य केले होते.एलआयसीच्या शेअर दरात होत असलेली घसरण अस्थायी आहे. सरकारदेखील चिंतेत आहे. लोकांना एलआयसीचे फंडामेंटल्स समजण्यास वेळ लागणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. एलआयसीचे व्यवस्थापन सर्व पैलूंवर लक्ष देणार असून शेअर धारकांना फायदा होईल असेही त्यांनी म्हटले. मार्च अखेरीस एलआयसीची असलेली एम्बेडेड वॅल्यू शेअर प्राइसची खरी किंमत दर्शवले. कंपनी आपली एम्बेडेड वॅल्यू जून महिन्याच्या अखेरपर्यंत अपडेट करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.
(Disclaimer : ही बातमी केवळ माहिती देण्याच्या उद्देश्याने देण्यात आली आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. गुंतवणूक करण्याआधी नेहमी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ABPLive.com च्यावतीने आम्ही गुंतवणूक करण्याबाबत सल्ला देत नाही )