(Source: ECI/ABP News/ABP Majha)
म्युच्युअल फंडाकडे लोकांचा कल वाढला, फेब्रुवारीत 19000 कोटी रुपयांची गुंतवणूक
Mutual Fund : चांगला परतावा देणाऱ्या योजनांमध्ये लोक गुंतवणूक करताना दिसतायेत. म्युच्युअल फंडांबद्दल (Mutual Fund) गुंतवणूकदारांचे प्रेम वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.
Mutual Fund SIP Investment : अलिकडच्या काळात गुंतवणुकीसाठी (Investment) विविध योजना आल्या आहेत. चांगला परतावा देणाऱ्या योजनांमध्ये लाक गुंतवणूक करताना दिसतायेत. दरम्यान, म्युच्युअल फंडांबद्दल (Mutual Fund) गुंतवणूकदारांचे प्रेम वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. कारण, म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा लोकांचा कल वाढत आहे. फेब्रुवार महिन्यात म्युच्युअल फंडात 19000 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.
इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक 23 टक्क्यांनी अधिक
शेअर बाजारापासून सोन्या-चांदीपर्यंत गुंतवणूकदारांनी भरपूर पैसा गुंतवला आहे. दोघेही सध्या विक्रमी पातळीवर आहेत. अशा परिस्थितीत अनेकांचा कल म्युच्युअल फंडाकडेही वाढला आहे. फेब्रुवारीमध्ये म्युच्युअल फंड आणि एसआयपी या दोन्हींनी विक्रमी पातळी गाठली. विशेषतः जर आपण SIP बद्दल बोललो तर लोकांनी फेब्रुवारी महिन्यात 19 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. दुसरीकडे, जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक 23 टक्क्यांनी अधिक दिसली आहे. ही आकडेवारी 23 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली. म्युच्युअल फंड आणि SIP मध्ये सामान्य लोकांनी किती गुंतवणूक केली ते सविस्तर पाहुयात.
मिळालेल्या माहितीनुसार, इक्विटी म्युच्युअल फंडांनी फेब्रुवारीमध्ये 26,866 कोटी रुपयांची वाढ सुरूच ठेवली आहे. जी गेल्या 23 महिन्यांतील सर्वाधिक मासिक चलन आहे. सेक्टर-आधारित फंड आणि नवीन फंड ऑफर (NFOs) मध्ये मोठ्या प्रमाणात स्वारस्य यामुळं इक्विटी म्युच्युअल फंड गुंतवणूक वाढली आहे. इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा फेब्रुवारीचा आकडा जानेवारीच्या 21,780 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीपेक्षा सुमारे 23 टक्के अधिक आहे.
एकूण 8.20 कोटी SIP खाती
दरम्यान, जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, मासिक पद्धतशीर गुंतवणूक योजनेद्वारे (SIP) योगदान फेब्रुवारीमध्ये 19,186 कोटी रुपयांच्या नवीन उच्चांकावर पोहोचले, जे जानेवारीमध्ये 18,838 कोटी रुपयांच्या पुढे गेले होते. AMFI (असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया) च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2024 मध्ये 49.79 लाख नवीन SIP नोंदणींसह एकूण 8.20 कोटी SIP खाती आहेत. एकंदरीत, म्युच्युअल फंड उद्योगाने फेब्रुवारीमध्ये 1.2 लाख कोटी रुपयांचा ओघ पाहिला, जो जानेवारीच्या जवळपास समान होता. यामध्ये कर्जाभिमुख योजनांचे योगदान 63,809 कोटी रुपये, इक्विटी योजनांनी 26,866 कोटी रुपये आणि हायब्रीड योजनांनी 18,105 कोटी रुपयांचे योगदान दिले. मजबूत गुंतवणूकीमुळे निव्वळ व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM) फेब्रुवारीअखेर 54.54 लाख कोटी झाली आहे, जे जानेवारीत 52.74 लाख कोटी होती.
म्युच्युअल फंड (Mutual Fund) म्हणजे लोकांनी गुंतवलेले पैसे एकत्रितरीत्या शेअर मार्केटमध्ये (Share Market) गुंतवले जातात आणि त्यावर मिळणारा लाभांश सर्वांना समान वाटून दिला जातो. शेअर मार्केटमध्ये ही गुंतवणूक करण्याचे काम एखादी कंपनी करत असते. अशा कंपनीला अॅसेट मॅनेजमेंट कंपनी (Asset Management Company) म्हटलं जातं. ही कंपनी वेगवेगळ्या म्युच्युअल फंड योजना सादर करत असते. त्यात आपल्यासारख्या अनेक गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या पैशांचं व्यवस्थापन ही कंपनी करते.
महत्वाच्या बातम्या: