(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Inflation: डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई दर 5.90 टक्क्यांवर स्थिरावण्याची अंदाज, 45 अर्थतज्ज्ञांचा अहवाल
Inflation: डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई दर हा 5.90 टक्क्यांपर्यंत असणार असल्याचा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. रॉयटर्सच्या सर्वेक्षणात हा अंदाज व्यक्त करण्यात आला.
Inflation: डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई 5.90 टक्क्यांवर (Inflation Rate) स्थिर राहण्याची अपेक्षा आहे. रॉयटर्सच्या पोलमध्ये हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या अंदाजानुसार डिसेंबरमधील (December 2022) किरकोळ चलनवाढीचा डेटा खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ आणि वर्षभरापूर्वीचा मजबूत आधार यामुळे कमी आहे. रॉयटर्सच्या सर्वेक्षणात 45 अर्थशास्त्रज्ञांनी भाग घेतला होता. 4 ते 9 जानेवारी दरम्यान सर्वेक्षण करण्यात आले. नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये किरकोळ महागाईत किंचित वाढ झाल्याचे दर्शवण्यात येत आहे.
नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई 5.88 टक्के होती. येत्या काही महिन्यांत मूळ चलनवाढ स्थिर राहण्याचा अंदाज बहुतांश अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अन्नधान्याच्या किमतीतील अनुक्रमिक घसरणीचा चलनवाढीवर मध्यम परिणाम होण्याची शक्यता आहे, पण गेल्या बैठकीपासून आम्हाला फारशी तीव्र घट दिसत नसून मूळ चलनवाढ स्थिर राहील असं एचडीएफसी बँकेच्या मुख्य अर्थतज्ज्ञ साक्षी गुप्ता यांनी सांगितले.
चलनवाढीच्या दृष्टीने ही बाब सकारात्मक असल्याचे लक्षण असल्याचे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. किमतींवरील दबाव हळूहळू कमी होतो आहे हे यातून दिसत असल्याचे तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या अहवालानुसार किमान 2025 पर्यंत महागाई आरबीआयच्या लक्ष्य श्रेणीच्या मध्यम पातळीवर येण्याची अपेक्षा आहे.
महागाई नियंत्रित करण्यासाठी आरबीआय सातत्याने व्याजदर वाढवत आहे. त्यांनी मे महिन्यात व्याजदर वाढवण्याची प्रक्रिया सुरू केली. तेव्हापासून आत्तापर्यंत व्याजदरात 1.95 टक्के वाढ झाली आहे. यासह रेपो दर 5.90 टक्क्यांवर पोहोचला आहे. रॉयटर्सच्या सर्वेक्षणानुसार मध्यवर्ती बँक मार्चपर्यंत आणखी 0.50 टक्क्यांनी वाढू शकते. त्यामुळे रेपो दर 6.4 टक्क्यांवर पोहोचण्याचा अंदाज आहे.
उत्पादित उत्पादने, इंधन आणि खाद्यपदार्थांच्या किमती कमी झाल्याने घाऊक किमतींवर आधारित चलनवाढ नोव्हेंबरमध्ये 5.85 टक्क्यांच्या 21 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई मे महिन्यापासून घसरत आहे. ऑक्टोबरमध्ये तो एक अंकी म्हणजेच 8.39 टक्क्यांवर आला.
नोव्हेंबर 2022 मध्ये महागाईचा दर कमी होण्यामागे अन्नपदार्थ, मूलभूत धातू, कापड, रसायने आणि रासायनिक उत्पादने, कागद आणि त्यापासून बनवलेल्या उत्पादनांच्या किमतीत झालेली घसरण हे प्रमुख कारण असल्याचे म्हटले जात आहे. नोव्हेंबर 2022 पूर्वी महागाईचा सर्वात कमी स्तर फेब्रुवारी 2021 मध्ये होता. त्यावेळी तो 4.83 टक्के इतका होता.