(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Fitch India : दिवाळीपूर्वी मिळाली चांगली बातमी! फिचने वर्तवला भारताच्या विकास दराचा अंदाज
अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने दिवाळीच्या काही दिवस आधी एक चांगली बातमी आली आहे. क्रेडिट रेटिंग एजन्सी फिचने भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाजाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
Fitch India GDP Forecast: अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने दिवाळीच्या काही दिवस आधी एक चांगली बातमी आली आहे. क्रेडिट रेटिंग एजन्सी फिचने भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाजाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. एजन्सीने आज (6 ऑक्टोबर) याबाबतची माहिती दिली आहे. एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, भारताची अर्थव्यवस्था मध्यम कालावधीत 6.2 टक्के दराने वाढू शकते.
भारतीय अर्थव्यवस्थेने गेल्या दशकात अनेक मोठे टप्पे गाठले आहेत. सध्या भारत हा जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था असणारा देश बनला आहे. भारत हे जागतिक अर्थव्यवस्थेचे प्रमुख केंद्र मानले जात आहे. दरम्यान, अलीकडेच S&P ग्लोबल मार्केटने केलेल्या दाव्यानुसार, अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारत लवकरच जपानला मागे टाकेल. 2030 पर्यंत भारत हा जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे.
रेटिंग एजन्सी फिचने यापूर्वी भारताचा आर्थिक विकास दर 5.5 टक्के असू शकतो असा अंदाज व्यक्त केला होता. आता एजन्सीने आपला अंदाज वाढवून 6.2 टक्के केला आहे. याचा अर्थ एजन्सीने विकास दराच्या अंदाजात 70 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.70 टक्के इतकी मोठी वाढ केली आहे. एजन्सीने हा अंदाज अशावेळी वाढवला आहे जेव्हा देशात काही दिवसांनी दिवाळीचा सण साजरा होत आहे. यावेळची दिवाळी रविवार 12 नोव्हेंबर रोजी आहे. भारताच्या विकास दराचा अंदाज वाढवताना, आगामी काळात भारताच्या आर्थिक विकासाच्या शक्यता सर्वोत्तम असल्याचेही फिचने म्हटले आहे. रेटिंग एजन्सीनुसार, आगामी काळात भारताचा आर्थिक विकास दर टॉप-10 उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक असणार आहे. एजन्सीने विकास दराच्या अंदाजात झालेल्या वाढीचे श्रेय रोजगाराच्या बाबतीत स्थितीत झालेल्या सुधारणेला दिले आहे.
भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे
इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, S&P ग्लोबल मार्केटने अंदाज लावला आहे की 2030 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था 7.3 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल. त्यानंतर भारत जपानला मागे टाकून आशिया खंडातील दुसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनेल. S&P ग्लोबल मार्केटने आपल्या अहवालात म्हटले आहे की, 2021 आणि 2022 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग खूप मजबूत होता. भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) आर्थिक वर्ष 2024 पर्यंत 6.2 टक्के ते 6.3 टक्क्यांच्या दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत जागतिक स्तरावर भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत येतो. त्याच वेळी, एप्रिल ते जून या तिमाहीत भारताचा जीडीपी 7.8 टक्के होता. गेल्या काही वर्षांत देशात परदेशी गुंतवणूक वाढली आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे. अशा परिस्थितीत त्याचा परिणाम आता अर्थव्यवस्थेवर दिसून येत आहे.
पुढील 25 वर्षात देशाला विकसित देश बनवण्याचे लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवले आहे. 2047 मध्ये जेव्हा देश स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करेल, तेव्हा विकसित देशांच्या यादीत भारताचा समावेश करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आकडेवारीनुसार, देशाची अर्थव्यवस्था 2047 पर्यंत 30 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. सध्या, 3.7 ट्रिलियन डॉलरच्या GDPसह ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.
विकसित देश होण्याचा निकष काय?
जागतिक बँकेच्या मते, जर एखाद्या देशाचे दरडोई उत्पन्न 12,000 डॉलर्सपेक्षा जास्त म्हणजे वार्षिक 10 लाख रुपये असेल, तर तो देश उच्च उत्पन्नाची अर्थव्यवस्था म्हणजेच विकसित अर्थव्यवस्था मानला जातो. जागतिक रेटिंग एजन्सी S&P च्या मते, भारताचा GDP पुढील 7 वर्षांत 7.3 ट्रिलियनपर्यंत पोहोचेल. अशाप्रकारे, भारत 2030 पर्यंत जपान आणि जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या बातम्या: