2047 पर्यंत भारत जागतिक विकासाला चालना देणारे शक्तीस्थान बनेल: पीयूष गोयल
Business Community In California: 'भारत 2047 पर्यंत जागतिक विकासाला चालना देणारे पॉवरहाऊस बनण्याच्या मार्गावर आहे', असे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे.
Business Community In California: 'भारत 2047 पर्यंत जागतिक विकासाला चालना देणारे शक्तीस्थान बनण्याच्या मार्गावर आहे', असे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. अमेरिकेत दक्षिण कॅलिफोर्नियातल्या व्यावसायिकांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत. आपल्या भाषणात गोयल म्हणाले की इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क (IPEF) अर्थात भारत प्रशांत क्षेत्र आर्थिक आराखडा म्हणजे, नियमावर चालणारी आंतरराष्ट्रीय सुव्यवस्था आणि पारदर्शक आर्थिक व्यवस्था राखणे हे समान उद्दिष्ट बाळगणाऱ्या समविचारी देशांसोबत मुक्त आणि निष्पक्ष व्यापारासाठीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. इंडो-पॅसिफिकमधील राजकीयदृष्ट्या स्थिरता आणि आर्थिक उलाढालींचा विस्तार करण्यासाठी एकत्र येत आहेत, असेही ते म्हणाले.
मेळाव्याला संबोधित करताना गोयल यांनी सांगितले की, भारतात होत असलेल्या प्रगतिकारक सुधारणा आणि विकास कामांमुळे, देशाने जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये पाचवा क्रमांक पटकावला आहे. गोयल म्हणाले की, 2047 या वर्षात भारताची अर्थव्यवस्था 35 ते 45 ट्रिलियन म्हणजेच 35 ते 45 लाख कोटी डॉलर्सची असेल.
भारत आज संधींचे आगार आहे आणि अमेरिकेतल्या व्यापारी समुदायासाठी एक संभाव्य बाजारपेठ आहे, असं गोयल म्हणाले. ते म्हणाले, भारताला लोकसंख्याशास्त्राच्या दृष्टीने लाभलेल्या मनुष्यबळाचा लाभ होत आहे आणि भारतातली महत्त्वाकांक्षी तरुणाई विकासाच्या वाढीसाठी मोठी संधी प्रदान करते. ते पुढे म्हणाले, भारत देखील स्वच्छ , प्रदूषणरहित ऊर्जा प्राप्तीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे आणि भारताचे 2030 वर्षा पर्यंत 500 गिगावॅट हरित ऊर्जा निर्मितीची क्षमता गाठण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
गोयल म्हणाले, सरकारने 1 अब्ज 30 कोटी नागरिकांना उत्तम नागरिक आणि देशाची आर्थिक वाढ आणि विकासात योगदान देणारे नागरिक म्हणून घडवते. गेल्या काही वर्षांत सरकारने केलेल्या उपाययोजनांबद्दल बोलताना गोयल म्हणाले की, सरकार लोकांच्या, अन्न सुरक्षा(उपलब्धता), निवारा आणि शौचालयांसारख्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी सक्षम आहे.
“जगातल्या सर्व लोकशाहींची जननी असल्याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्याकडे क्रियाशील न्यायव्यवस्था आणि कायद्याचे राज्य आहे, मजबूत माध्यमे आणि पारदर्शक सरकारी व्यवस्था आहे, याचा अभिमान वाटतो”, असेही गोयल यांनी सांगितले.
आज भारत हा जगाचा विश्वासार्ह सहकारी म्हणून उदयास आला आहे असे नमूद करून गोयल म्हणाले की, माहिती-तंत्रज्ञान, वस्त्रोद्योग, आदरातिथ्य, रत्ने, दागिनेनिर्मिती या क्षेत्रांमध्ये आमच्याकडे असलेलं कौशल्य आणि गुणवत्ता पाहता भारत आता मौल्यवान वस्तू आणि सेवापुरवठा यांचा उच्च दर्जाचा उत्पादक देश म्हणून उदयास आला आहे आणि भारताशी संबंध जोडू पाहणाऱ्या या क्षेत्रातल्या प्रत्येक गुंतवणूकदाराला संधी उपलब्ध करुन देईल.