बुडत्या पाकिस्तानला IMF चा पुन्हा आधार, 8400 कोटी रुपयांचं दुसरं कर्ज मंजूर, भारतानं व्यक्त केला निषेध
पाकिस्तानला पुन्हा एकदा आयएमएफकडून कर्ज मिळाले आहे. विस्तारित निधी सुविधा कार्यक्रमांतर्गत पाकिस्तानला 1.02 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 8400 कोटी रुपयांचा दुसरा हप्ता देण्यात आला आहे.

India Pakistan ceasefire : पाकिस्तानला पुन्हा एकदा आयएमएफकडून कर्ज मिळाले आहे. गेल्या आठवड्यातच, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला 1 अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले होते. विस्तारित निधी सुविधा कार्यक्रमांतर्गत पाकिस्तानला 1.02 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 8400 कोटी रुपयांचा दुसरा हप्ता देण्यात आला आहे. सध्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट आहे. त्यामुळं पाकिस्तानने कर्जाची मागणी केली होती.
भारताने निषेध केला होता
स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने म्हटले आहे की ,16 मे रोजी संपणाऱ्या आठवड्यासाठी ही रक्कम देशाच्या परकीय चलन साठ्यात समाविष्ट केली जाईल. गेल्या आठवड्यात, आयएमएफच्या बैठकीत, पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या निधीवरील मतदानापासून दूर राहून भारताने निषेध केला होता. इथे तुम्हाला एकतर बाजूने मतदान करावे लागेल किंवा मतदानापासून स्वतःला दूर ठेवावे लागेल. यावर चिंता व्यक्त करताना भारताने म्हटले होते की पाकिस्तान या पैशाचा वापर सीमापार दहशतवादाला चालना देण्यासाठी करू शकतो. या आर्थिक मदतीमुळे पाकिस्तान मोठ्या कर्जात बुडाला आहे आणि तो आयएमएफचा मोठा कर्जदार बनला आहे.
पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट
पाकिस्तान सध्या आर्थिक संकटातून जात आहे. देशाच्या परकीय चलन साठ्यातही सातत्याने घट होत आहे. शिवाय, येथे महागाईही गगनाला भिडत आहे. आयएमएफकडून मिळणारा निधी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला आधार देईल, परंतू, दरम्यानच्या काळात भारतासोबतच्या युद्धात पाकिस्तानचे खूप नुकसान झाले आहे. एका अहवालानुसार, या समस्यांना तोंड देणाऱ्या पाकिस्तानवर डिसेंबर 2024 पर्यंत सुमारे 131.16 अब्ज डॉलर्सचे परकीय चलन कर्ज आहे.
10 मे रोजीच आयएमएफने पाकिस्तानला 1 अब्ज डॉलर्स कर्ज केलं होतं मंजूर
10 मे रोजी आयएमएफकडून (IMF) पाकिस्तानसाठी 1 अब्ज डॉलर्सचे कर्ज देण्यात आले होते. कर्जाची मंजुरी ही अत्यंत महत्त्वाची असल्याचं शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती सुधारत असून देश विकासाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात येतंय. दरम्यान, भारताकडून पाकिस्तानला मदत देण्यासंदर्भात विरोध करण्यात आला होता. एकीकडे भारत पाकिस्तानला सर्व बाजूंनी घेरत असल्याचं चित्र आहे. अशातच भारताचा विरोध असताना आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात IMF ने पाकिस्तानला कर्ज देण्यास मान्यता दिली आहे. IMFकडून पाकिस्तानला कर्ज मंजूर झालंय. मात्र पाकिस्तान या निधीचा वापर दहशतवादी कारवायांना पाठिंबा देण्यासाठी करत असल्याची शक्यता भारताकडून करण्यात आली आणि त्याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानला कर्ज देण्यास भारतानेविरोध केला होता, तर IMFच्या मतदानासाठीही भारत अनुपस्थित राहिला होता.
महत्वाच्या बातम्या:























