IMF ने कबूल केली चूक; 2029 नाही, तर 2027 मध्ये भारत बनणार 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था
Indian 5 Trillion Economy: भारतात 2021-2022 या आर्थिक वर्षात 83.57 अब्ज डॉलर्स FDI प्राप्त झाले आहे, जे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आधारस्तंभ ठरत आहे.
Indian 5 Trillion Economy: भारतात 2021-2022 या आर्थिक वर्षात 83.57 अब्ज डॉलर्स FDI प्राप्त झाले आहे, जे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आधारस्तंभ ठरत आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आयएमएफने भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकास दराचा अंदाज लावण्यात चूक केल्याचे मान्य केले आहे. ही चूक आता सुधारण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे की, त्यांनी भारताच्या आर्थिक वाढीच्या गणनेतील चूक दुरुस्त केली आहे. आयएमएफने सांगितले की, भारताचा विकास दर आधीच्या अंदाजापेक्षा जास्त आहे.
आयएमएफने मान्य केली चूक
भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकास दराबाबत आयएमएफने म्हटले आहे की, त्यांनी तयार केलेला अहवाल दुरुस्त करण्यात आला आहे. कारण त्यात गणिती चूक झाली होती. 2029 पर्यंत भारत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होईल, असा अंदाज IMF ने यापूर्वी व्यक्त केला होता. तर IMF ने आता आपला आधीचा अंदाज चुकीचा असल्याचे म्हटले आहे आणि नवीन अंदाजानुसार भारत 2 वर्षांपूर्वीच या टप्प्यावर पोहोचेल, असेही म्हटले आहे.
आयएमएफची चूक कशी झाली?
भारत, नेपाळ आणि भूतानचे वरिष्ठ निवासी प्रतिनिधी लुई ई ब्रुअर यांनी बिझनेस स्टँडर्डला सांगितले की, आयएमएफच्या कर्मचार्यांनी डेटा इनपुट त्रुटी शोधून काढली, ज्यामुळे भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) यूएस डॉलरमध्ये मोजण्यात त्रुटी आढळली. ती दूर करण्यात आली आहे. ते म्हणाले की, कोविड महामारीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेत चांगली सुधारणा होत आहे आणि मार्च 2022 मध्ये भारताचा वास्तविक जीडीपी महामारीपूर्वीच्या जीडीपीच्या समान पातळीवर पोहोचला आहे. त्याच बरोबर भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा सुरू राहण्याची अपेक्षा आहे.
पंतप्रधान मोदींचे 5 ट्रिलियन डॉलरचे लक्ष्य
दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2025 हे वर्ष भारतासाठी 5 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठण्यासाठी निश्चित केले होते. परंतु गेल्या दोन वर्षांत कोरोना लॉकडाऊनमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अशातच भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांनी या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले होते की, रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक अनिश्चिततेच्या दरम्यान सुधारित आर्थिक व्यवस्था आणि चांगल्या कॉर्पोरेट परिस्थितीमुळे भारत मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये अजूनही चांगल्या स्थितीत आहे.