ICICI Bank Loan Scam: वेणूगोपाल धूत यांच्यासह कोचर दाम्पत्याला तीन दिवसांची सीबीआय कोठडी
ICICI Bank Loan Scam: वेणूगोपाल धूत यांच्यासह कोचर दाम्पत्याला तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. तिन्ही आरोपींना गुरूवारपर्यंत तपासयंत्रणेच्या ताब्यत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ICICI Bank Loan Scam: व्हीडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत यांच्यासह कोचर दाम्पत्याला तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. तिन्ही आरोपींना गुरूवारपर्यंत तपासयंत्रणेच्या ताब्यत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि दीपक कोचर यांच्यानंतर वेणूगोपाल धूत यांना आज अटक करण्यात आली. सकाळी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानातून त्यांना अटक करण्यात आली. सीबीआयनं धूत यांना कोर्टात आज हजर केले. चंदा कोचर आणि दिपक कोचर यांच्या कस्टडीत तीन दिवासांची वाढ झाली. तिन्ही आरोपींना समोरासमोर बसवून चौकशी करण्याकरता रिमांड आवश्यक असल्याचा सीबीआयचा युक्तीवाद मुंबई सत्र न्यायालयानं स्वीकारला.
ICICI Bank-Videocon case: CBI seeks three-day custody of Videocon chairman, Chanda and Deepak Kochhar
— ANI Digital (@ani_digital) December 26, 2022
Read @ANI Story | https://t.co/WTB52MnT49#ChandaKochhar #DeepakKochar #CBI pic.twitter.com/phleFWQ5bY
भारतातील बड्या उद्योगपतींमधील एक मोठं नाव म्हणजे वेणूगोपाल धूत… त्यांनी व्हिडीओकॉन उभी केली आणि ती वाढवली… मात्र, अनेक बॅंकांकडून घेतलेली कर्ज परतवू न शकल्याने व्हिडीओकॉन समूह अडचणीत सापडला आहे. व्हिडीओकॉनच्या अनेक कार्यालयांवर केंद्रीय यंत्रणांनी छापे देखील मारले. आणि अशातच धूत यांच्या देखील अडचणी वाढल्या. त्यातच त्यांना आता सीबीआयने अटक केली आहे.
कोण आहेत वेणूगोपाल धूत?
वेणूगोपाल धूत यांनी पुण्यातील अभियांत्रिकी कॉलेजमधून इलेक्ट्रीकल इंजिनिअरींगचं शिक्षण पूर्ण केलं. धूत यांचा इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरणांच्या निर्मितीत अधिक रस होता. त्यामुळे त्यांनी अनेक व्हिडीओकॉनची अनेक उपकरणे बाजारात आणली. एक काळ असा होता की व्हिडीओकॉनच्या उपकरणांचा मोठा दबदबा बाजारात बघायला मिळाला. वेणूगोपाल धूत यांनी व्हिडीओकॉन कॉर्पोरेशन आणि व्हिडीओकॉन इलेक्ट्रॉनिक्सची स्थापना केली. सर्वात पहिला रंगीत टीव्ही बनवण्याचा परवाना व्हिडीओकॉनला मिळाला आणि त्याचा मोठा फायदा कंपनीला झाला. अनेक अर्थानं कंपनीचं प्रस्थ आणि पसारा वाढायला लागला होता.
वेणूगोपाल धूत प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरणांच्या निर्मितीत गुंतले. सोबतच तेल आणि वायू क्षेत्रातही व्हिडीओकॉन समूहानं पाय पसरायला सुरुवात केली होती. भारतासोबतच मेक्सिको, इटली, चीन आणि पोलंडसारख्या देशात व्हीडिओकॉन वाढू लागली होती. फोर्ब्जच्या श्रीमंतांच्या यादीत धूत 61 व्या स्थानी पोहोचले होते. 2015 नंतर धूत यांचा पडता काळ बघायला मिळाला. अनेक कंपन्या धूत यांना विकाव्या लागल्या. सोबतच व्हिडीओकॉन समूहावर मोठ्या प्रमाणात कर्जाचा डोंगर देखील वाढत होता. अशातच आयसीआयसीआय बॅंक कर्ज घोटाळ्याचं प्रकरण समोर आलं आणि धूत यांच्या अडचणी आणखी वाढल्या. एक काळ असा होता की व्हिडीओकॉनचा टीव्ही घेणं प्रतिष्ठेचं मानलं जायचं. व्हिडीओकाॅन उपकरणांना अनेकांनी पसंती दिली होती. मात्र, कर्जाचा डोंगर वाढल्याने धूत यांच्या व्हिडीओकांनला ग्रहणच लागलं. मात्र, त्यातूनही धूत व्हिडीओकॉनला बाहेर काढतायत. मात्र, धूत तुरुंगात गेल्याने त्यांचा पाय आणखी खोलात गेलाय.
इतर महत्त्वाची बातमी