कपडे धुणे महागणार; साबण आणि डिटर्जंट पावडरच्या किंमतीत मोठी वाढ
hike prices of soap and detergent : युनिलिव्हर आणि आयटीसी कंपन्यांनी आपल्या साबण आणि डिटर्जेंट पावडरच्या दरात वाढ केली आहे.
Hike Prices of Soap and Detergent : वाढत्या महागाईमुळे सामान्यजणांचे बजेट बिघडत असताना आता महागाईचा आणखी एक धक्का बसणार आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर आणि आयटीसी या महत्त्वाच्या कंपन्यांनी साबण आणि डिटर्जेंटच्या किंमतीत वाढ केली आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे साबण आणि डिटर्जेंटच्या किंमतीत वाढ करावी लागत असल्याचे कंपन्यांनी म्हटले आहे.
हिंदुस्थान युनिलिव्हर आणि आयटीसी या दोन कंपन्या भारतीय बाजारपेठेत महत्त्वाच्या कंपन्या आहेत. युनिलिव्हरने व्हील डिटर्जेंट पावडरच्या एक किलोमागे 3.4 टक्के वाढ केली असल्याचे वृत्त आहे. या वाढीमुळे प्रति किलोमागे दोन रुपयांनी वाढ होणार आहे. त्याशिवाय लक्स साबण, रिन डिटर्जेंट साबणाच्या किंमतीतही वाढ होणार आहे. आयटीसीने फियामा दी व्हिल्स आणि व्हिवेल साबणाच्या किंमतीतही 10-15 टक्के वाढ केली आहे.
दरवाढीचा झटका
रिन बारच्या 250 ग्रॅम पॅकची किंमत 5.8 टक्क्यांनी वाढली आहे. लक्स साबण 100 ग्रॅम मल्टिपॅकच्या किंमतीत 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तर, आयटीसीने फियामा साबणाच्या 100 ग्रॅम पॅकच्या किंमतीत 10 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्याशिवाय एंगेज डियोड्रंटच्या किंमतीतही 7.6 टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून 120 मिलीच्या परफ्यूममध्ये 7.1 टक्क्यांनी वाढ केली आहे.
वस्तूंच्या किंमती वाढवताना काही निवडक वस्तूंच्या किंमतीत वाढ केली आहे. जेणेकरून ग्राहकांवर दरवाढीचा मोठा बोझा पडणार नाही, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
कोरोनाच्या 'बोत्सवाना व्हेरिएंट'मुळे जगभरात खळबळ; जाणून घ्या विषाणूबाबत प्रमुख मुद्दे
शेअर बाजाराला 'कोविड बाधा'! सेन्सेक्स 1300 अंकांनी कोसळला, दोन तासांत 6 लाख कोटींचे नुकसान