Home Loan Tips: होम लोनसाठी अर्ज करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा; नक्कीच फायदा होईल
बँकांकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या ऑफर्सची संपूर्ण माहिती ठेवा. घाईघाईने कर्ज घेऊ नका. सर्वप्रथम विविध बँकांच्या कर्ज योजनांची माहिती घ्या आणि तुलना करा त्यानंतर मग अर्ज करा.
Home Loan : स्वत:चं घर खरेदी करणे प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र घर खरेदी करताना रोख रक्कम नसल्यामुळे होम लोनच्या माध्यमातून एवढी मोठी रक्कम उभी केली जाते. बँका किंवा नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या लाँग टर्म कर्ज उपलब्ध करुन देतात. यामध्ये दर महिन्याला या रकमेचा विशिष्ट ईएमआय भरावा लागतो. या कर्जाची मुदत 10, 20, 30 वर्षांपर्यंत असते. गृहकर्जासाठी अर्ज करताना अत्यंत काळजी घ्यावी लागते. बँका अनेक विविध कारणांमुळे गृहकर्ज देण्यास नकार देतात.
कर्जाच्या ऑफर जाणून घ्या
बँकांकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या ऑफर्सची संपूर्ण माहिती ठेवा. घाईघाईने कर्ज घेऊ नका. सर्वप्रथम विविध बँकांच्या कर्ज योजनांची माहिती घ्या आणि तुलना करा त्यानंतर मग अर्ज करा.
CIBIL स्कोअरची काळजी घ्या
CIBIL स्कोअर तुमची क्रेडिट हिस्ट्री दाखवतो. CIBIL तुम्हाला कर्ज मिळवण्यात महत्वाची भूमिका बजावतो. याद्वारे, बँका तुम्ही आधी कर्ज घेतले आहे की नाही किंवा तुम्ही क्रेडिट कार्ड कसे वापरले इत्यादी पाहतात. क्रेडिट स्कोअर रिपेमेंट हिस्ट्री, क्रेडिट वापराचं प्रमाण, कर्जे आणि बिले वेळेवर भरली जातात की नाही हे दर्शवते. क्रेडिट स्कोअर 300-900 च्या श्रेणीत असतो. 750 किंवा त्यापेक्षा जास्त स्कोअर चांगला मानला जातो. म्हणूनच तुम्ही तुमचे क्रेडिट स्कोअर चांगले बनवणे महत्वाचे आहे. यासाठी, कर्जाची किंवा इतर कोणत्याही ईएमआय आणि क्रेडिट कार्डची थकबाकी निर्धारित वेळेपूर्वी भरण्याची सवय लावा. तुमचे क्रेडिट स्कोअर नियमितपणे तपासा जेणेकरून तुम्ही ते वेळेत सुधारू शकाल. जर तुमच्या कर्जाची परतफेड चांगली असेल तर समजून घ्या की तुमचा CIBIL स्कोअर तितकाच चांगला असेल. एकावेळी एकापेक्षा जास्त कर्ज घेऊ नका कारण त्याचा तुमच्या क्रेडिटवर परिणाम होतो.
संयुक्त गृहकर्जासाठी अर्ज करू शकता
गृहकर्ज उपलब्ध नसल्यास संयुक्त गृहकर्ज हा एक चांगला पर्याय आहे. संयुक्त गृह कर्ज घेतल्यास कर्ज देणाऱ्या संस्थेचा धोका कमी होतो. आपल्या ओळखीच्या एखाद्याला सह-अर्जदार म्हणून बनवा ज्याचे स्थिर उत्पन्न आणि चांगले क्रेडिट स्कोअर आहे. सह-अर्जदार जोडल्याने कर्ज मिळण्याची शक्यता वाढते. संयुक्त गृहकर्ज घेतल्यावर, दोन्ही अर्जदार आयकर कपातीचा लाभ घेऊ शकतील.
कमी रकमेसाठी अर्ज करा
जर तुम्हाला घर खरेदी करायचे असेल तर लोन-टू-व्हॅल्यू (LTV) गुणोत्तर कमी ठेवा म्हणजेच तुम्हाला घर खरेदी करण्यासाठी स्वत:कडून जास्त रक्कम उभी करावी लागेल. यामुळे बँकेचा धोका कमी होतो आणि कर्ज मिळण्याची शक्यता वाढते. कमी LTV गुणोत्तरामुळे कमी EMI कर्जाची परवड वाढवते.
कोणत्या बँकेत अर्ज करावा?
ज्या बँकेत तुमचे खाते आहे किंवा FD आहे तेथे तुम्ही कर्जासाठी अर्ज करावा. असे केल्याने कर्ज मिळण्याची शक्यता वाढते.
फिक्स ऑब्लिगेशन टू इनकम रेशो लक्षात ठेवा
फिक्स ऑब्लिगेशन टू इनकम रेशो (FOIR) दर महिन्याला तुम्ही किती कर्जाचा हप्ता भरू शकता हे दर्शवते. कर्ज देताना बँका नक्कीच FOIR पाहतात. यातून कळतं की तुम्ही सध्या भरत असलेले EMI, घरभाडे, विमा पॉलिसी आणि इतर देयके तुमचे वर्तमान उत्पन्नाच्या किती टक्के आहे. जर बँकेला हे सर्व खर्च तुमच्या पगाराच्या 50 टक्क्यापर्यंत वाटत असतील तर तुम्हा गृहकर्ज नाकारलं जाऊ शकतं.