(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वर्षभरात सोन्याच्या तस्करीत मोठी वाढ, तब्बल 500 किलो सोनं केलं जप्त
गेल्या चार दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण झालीय. त्यामुळं ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळालाय. दरम्यान, एका बाजूला सोनं महाग असताना दुसऱ्या बाजुला सोन्याच्या तस्करीच्या घटनात वाढ झालीय.
Gold seized : दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Rate) वाढ होताना दिसत आहे. वाढत्या दरामुळं ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे. मात्र, गेल्या चार दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होताना दिसत आहे. त्यामुळं ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळालेला आहे. दरम्यान, एका बाजूला सोनं महाग असताना दुसऱ्या बाजुला सोन्याच्या तस्करीच्या (smuggling) घटनांमध्ये देखील वाढ झालीय. गेल्या आर्थिक वर्षात तब्बल 500 किलोपेक्षा जास्त सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे.
सोने तस्करीच्या घटनांमध्ये तब्बल 74 टक्क्यांची वाढ
मार्च 2024 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. 2022-23 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2023-24 या आर्थिक मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी झाली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत मागील वर्षी सोने तस्करीच्या घटनांमध्ये तब्बल 74 टक्क्यांची वाढ झाली आहे. केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी गेल्या आर्थिक वर्षात 500 किलोपेक्षा जास्त सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश केल्याची माहिती आहे.
देशभरात पाचशे पेक्षा जास्त गुन्हे दाखल
अधिकाऱ्यांनी विविध ठिकाणाहून सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये विमानतळ, बंदरे तसेच जिथे सोन्याची किंवा अमली पदार्थांची किंवा अन्य गोष्टींची तस्करी होते तिथे विशेष पाळत ठेवली होती. यामध्ये डीआरआयने वर्षभरात 500 किलो सोने पकडले आहे. देशभरात पाचशे पेक्षा जास्त सोने तस्करीच्या प्रकरणी तपास यंत्रणेने गुन्हे दाखल केले आहेत. दुबई, आबुधाबी, बँकॉक, मस्कत, सिंगापूर येथून वर्षभरात मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी झाली आहे. विशेष म्हणजे, मुंबई, दिल्ली या विमानतळावर तपास यंत्रणा अधिक सतर्क असल्यामुळे अनेक तस्करांनी परदेशातून भारतीय छोट्या विमानतळांकडे जाणाऱ्या विमानातून सोने तस्करी करण्याचा देखील प्रयत्न अलीकडे सुरू केला आहे.
सोन्याच्या तस्करीत का होतेय वाढ?
सोन्याच्या आयात शुल्कातील वाढ आणि भारतात सोन्याच्या किमतीत झालेली भरमसाठ वाढ या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून सोने तस्करीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत. केवळ सोन्याचे दागिने, बिस्किटे, बारच नव्हे तर सोन्याची पेस्ट आणि सोन्याची पावडर या माध्यमातूनही सोन्याची तस्करी होत आहे. विशेष म्हणजे, सोन्याची पेस्ट आणि सोन्याची पावडर यावर प्रक्रिया करत त्यातून सोने घडवत त्यांची विक्री भारतामध्ये होत आहे. अशा घटनांवर विविध विभाग लक्ष ठेऊन आहेत.
सध्या सोन्या चांदीच्या दरात घसरण
गेल्या चार दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरुय. सोने 74367 रुपयांवरुन 71500 रुपयांच्या आसपास घसरले आहे. सोन्याच्या किंमतीत ही घसरण मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर दिसून आली आहे. तर 20 मे 2024 रोजी चांदीने आपला सार्वकालिक उच्चांक गाठला होता. या दिवशी चांदीची किंमत 95,267 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली होती. परंतू, तेव्हापासून त्याची किंमत दररोज घसरत आहे. एक किलो चांदीचा भाव हा 91045 रुपये आहे.