(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sovereign Gold Bond: अगदी स्वस्तात मिळतंय सोनं, संधी दवडू नका; खरेदीसाठी केवळ 4 मार्चपर्यंतचा अवधी
Sovereign Gold Bond: सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड योजनेच्या माध्यमातून तुम्ही अगदी स्वस्तात सोनं खरेदी करू शकता. त्यासाठी केवळ 4 मार्चपर्यंतचा अवधी शिल्लक आहे.
मुंबई: रशिया-युक्रेनचे युद्ध आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर असलेला दबाव यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असं असलं तरी केंद्र सरकारने सामान्य नागरिकांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी एक चांगली संधी उपलब्ध करुन दिली आहे. सॉव्हरिन गोल्ड बॉन्डची (Sovereign gold bond) विक्री 28 फेब्रुवारीला सुरू झाली असून ती 4 मार्च पर्यंत खुली असणार आहे. त्यामुळे स्वस्त दरात सोनं खरेदी करुन त्यामध्ये गुंतवणूक करायचा तुमचा विचार असला तर त्यासाठी केवळ चारच दिवस उरले आहेत. यावेळी एक ग्रॅम सोन्याची किंमत 5,109 इतकी निर्धारित करण्यात आली आहे.
सॉव्हरिन गोल्ड बॉन्डची (Sovereign gold bond) खरेदी जर तुम्ही ऑनलाईन करणार असाल तर तुम्हाला 50 रुपयांची सूट मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला केवळ 5059 इतकी रक्कम भरावी लागेल. त्यामुळे सामान्य लोकांना तसेच गुंतवणूकदारांसाठी ही सुवर्णसंधी असल्याचं सांगण्यात येतंय. सॉव्हरिन गोल्ड बॉन्डच्या माध्यमातून खरेदी केलेल्या सोन्याची सुरक्षितता ही अधिक आहे.
कसं खरेदी करायचं सोनं?
सॉव्हरिन गोल्ड बॉन्डच्या माध्यमातून सोनं खरेदी करायचं असेल तर NSE, BSE सारख्या मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेन्जच्या माध्यमातून करता येईल. तसेच सार्वजनिक बँका किंवा खासगी बँकांच्या माध्यमातूनही ही खरेदी करता येऊ शकेल. स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SHCIL) आणि पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून हे सोनं खरेदी करता येऊ शकेल. केवळ लहान बँका आणि पेमेंट बँकांमध्ये याची विक्री केली जात नाही.
किती व्याज मिळेल?
सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड योजनेचा कालावधी हा 8 वर्षांचा असेल. यामध्ये पाच वर्षांनंतर गुंतवणूकदार यातील गुंतवणूक काढून घेऊ शकतात. यामध्ये किमान एक ग्रॅम सोन्याची खरेदी करता येऊ शकेल. या योजनेसाठी वर्षाला 2.5 टक्के व्याज मिळणार असून हे व्याज दर सहा महिन्याला तुमच्या खात्यावर जमा होईल.
करातून सूट मिळते
या गुंतवणूकीच्या विक्रीवर मिळणाऱ्या लाभावर आयकर लावला जात नाही. तसेच या गुंतवणुकीचे अनेक फायदे आहेत.
सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड या योजनेची सुरुवात 2015 साली करण्यात आली आहे. ही एक सरकारी सिक्युरिटी आहे. फिजिकल गोल्डला पर्याय म्हणून या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
- Gold Rates Today : सोन्याच्या दरात 6,600 रुपयांनी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा दर
- Gold Silver Price Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने 800 रूपयांनी महागले, जाणून घ्या 10 ग्रॅमचे ताजे दर
- Petrol Diesel Price : रशिया-युक्रेन युद्धाचा कच्च्या तेलावर परिणाम; महिन्याच्या पहिल्या दिवशी देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती काय?