(Source: ECI/ABP News/ABP Majha)
1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन करणार विक्रम, 'या' माजी अर्थमंत्र्यांच्या रेकॉर्ड मोडणार
अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Minister Nirmala Sitharaman) या 1 फेब्रुवारीला देशाचा अंतरीम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सीतारामन यांच्या नावावर एक विक्रम होणार आहे.
Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Minister Nirmala Sitharaman) या 1 फेब्रुवारीला देशाचा अंतरीम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. कारण, अर्थसंकल्पात नेमक्या काय घोषणा होणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, हा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर निर्मला सीतारामन यांच्या नावावर एक विक्रम होणार आहे. सीतारामन या भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री बनतील की ज्यांनी सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला आहे.
मोरारजी देसाई यांच्या विक्रमाची बरोबरी
अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 1 फेब्रुवारीला सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदाचा अर्थसंकल्प पूर्ण अर्थसंकल्प नसेल कारण 2024 मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळं निवडणूकपूर्व खर्च भागवण्यासाठी सरकार अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. यासह, सलग पाच पूर्ण अर्थसंकल्प आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या देशाच्या दुसऱ्या अर्थमंत्री असणार आहेत. आतापर्यंत हा विक्रम केवळ माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे.
निर्मला सीतारामन 'या' माजी अर्थमंत्र्यांच्या रेकॉर्ड मोडणार
निर्मला सीतारामन या 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करत असताना, त्या मनमोहन सिंग, अरुण जेटली, पी चिदंबरम आणि यशवंत सिन्हा यांसारख्या माजी अर्थमंत्र्यांच्या रेकॉर्ड मोडतील. या नेत्यांनी अर्थमंत्री म्हणून सलग पाच अर्थसंकल्प सादर केले होते. तर मोरारजी देसाई यांनी 1959-1964 दरम्यान पाच वार्षिक आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता.
अंतरिम अर्थसंकल्पात कोणतेही मोठे बदल होण्याची शक्यता नाही
सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने सीतारामन यांच्या अंतरिम अर्थसंकल्पात कोणतेही मोठे धोरणात्मक बदल होण्याची शक्यता नाही. अर्थमंत्र्यांनी गेल्या महिन्यात एका कार्यक्रमात अंतरिम अर्थसंकल्पात कोणतीही मोठी घोषणा करण्यास नकार दिला होता. सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी हे केवळ व्होट ऑन अकाउंट असेल, असे ते म्हणाले. संसदेत पास झाल्यानंतर, खात्यावरील मतदानामुळे सरकारला एप्रिल-जुलै कालावधीतील खर्चाची पूर्तता करण्यासाठी देशाच्या एकत्रित निधीतून प्रमाणानुसार निधी काढता येईल. सार्वत्रिक निवडणुकीनंतर जूनच्या आसपास नवीन सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत नवीन सरकार 2024-25 साठीचा संपूर्ण अर्थसंकल्प जुलैमध्ये आणणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
आतापर्यंत देशात किती अर्थसंकल्प सादर? मोदी सरकारमध्ये अर्थसंकल्प सादर करणारे मंत्री कोणते?