Mumbai Home Buying: मुंबईत घर खरेदीकडे ओढा, मागील वर्षीच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात 15 टक्क्यांची वाढ
Mumbai Home Buying: नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर घर खरेदी करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Mumbai Home Buying: मुंबई महापालिका क्षेत्रात ग्राहकांचा घर खरेदी करण्याकडे ओढा वाढला असल्याचे समोर आले आहे. नोव्हेंबर महिन्यात 8756 घर खरेदी-विक्रीची नोंदणी करण्यात आली होती. याद्वारे राज्य सरकारला 671 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. नाईट फ्रँक या संस्थेने ही माहिती दिली आहे.
मागील काही महिन्यात मुंबईत मालमत्ता विक्री नोंदणीत वाढ दिसून आली. नोव्हेंबर 2022 मध्ये मालमत्ता विक्री नोंदणीत 15 टक्क्यांची वार्षिक वाढ दिसून आली. तर, सरकारच्या महसूलात मागील वर्षात तुलनेत (Year To Year) मध्ये 22 टक्क्यांची वाढ दिसून आली. नोव्हेंबर 2021 आणि नोव्हेंबर 2022 या महिन्यात सरकारकडून कोणतीही सवलत देण्यात आली नव्हती. मात्र, नोव्हेंबर 2022 मध्ये मेट्रो उपकर आणि मोर्टाज दरात एक टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे मुद्रांक शुल्क एक टक्क्यांनी वाढला असल्याचे दिसून आले आहे.
ऑक्टोबर महिन्यात दसरा, दिवाळीसारखे सण आल्याने घर खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली. याचे प्रतिबिंब नोव्हेंबर महिन्यात ही दिसून आले. नोव्हेंबर महिन्यात (Month To Month) ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत घर खरेदी चार टक्क्यांनी घर खरेदी वाढली होती.
जानेवारी ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत मालमत्ता विक्री नोंदणी आणि महसूल संकलनात वाढ झाली आहे. यंदाच्या 2022 मध्ये या कालावधीत मालमत्ता विक्री नोंदणीमध्ये 10 टक्के वार्षिक वाढ नोंदवली गेली आणि सरकारी महसूल संकलनात 50 टक्के वार्षिक वाढ नोंदवली गेली. या आकडेवारीवरून बाजारात सकारात्मकता असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
बेंगळुरूतील घराच्या किंमती वाढणार
नाईट फ्रँकने नुकत्याच प्रकाशित केलेल्या 'एशिया-पॅसिफिक आउटलूक 2023' या अहवालानुसार, बेंगळुरूमधील घरांच्या किंमतीत वाढ होणार असल्याचे नमूद केले आहे. पुढील वर्षात बेंगळुरुतील घरांच्या किंमती 5 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बेंगळुरुमध्ये स्टार्टअप, युनिकॉर्नची संख्या सातत्याने वाढत असल्याने घरांची मागणी वाढत आहे. त्यामुळे बेंगळुरूमधील घरांच्या किंमतीत वाढ होण्याचा अंदाज आहे.
तर, मुंबईत पुढील वर्षात घराच्या किंमती 4 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या तिसऱ्या तिमाहीत त्या मागील वर्षाच्या तुलनेत घरांची किंमत सहा टक्क्यांनी वाढली होती. विशेष म्हणजे त्यावेळी राज्य सरकारने मुद्रांक शुल्क सवलत दिली होती. नवी दिल्लीतील घरांची किंमतीत दोन ते तीन टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज आहे.