PF Interest rate : कधी काळी EPF वर मिळायचे 12 टक्के व्याज, आता मोदी सरकारकडून व्याजदरावर कात्री
PF Interest rate : कधी काळी EPF वर 12 टक्के व्याजदर मिळत असे. वाजपेयी सरकारच्या काळापासून पीएफ व्याजदरात कपात करण्यास सुरुवात झाली.
PF Interest Rate : होळीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने नोकरदारवर्गाला मोठा धक्का दिला आहे. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर सामाजिक सुरक्षेचा भाग असलेल्या भविष्य निर्वाह निधीच्या (PF) व्याजदरात केंद्र सरकारने कपात केली आहे. जवळपास चार दशकांनंतर पीएफ दर सर्वात कमी आहे. याआधी पीएफचा व्याजदर 1977-78 च्या काळात 8 टक्के इतका होता. कधीकाळी पीएफवर व्याजदर 12 टक्के व्याजदर मिळत होता. पीएफवरील व्याजदरात घट झाल्याने नोकरदार वर्गाचे नुकसान होणार आहे.
सुरुवातीला फक्त ३ टक्के व्याज
नोकरदार लोकांच्या सामाजिक सुरक्षेसाठी भारतात 1952 मध्ये EPFO ची स्थापना करण्यात आली. मात्र, तेव्हा पीएफवरील व्याज खूपच कमी होते. पीएफवरील व्याजदर केवळ 3 टक्क्यांपासून सुरू झाला आणि त्यानंतर तो सातत्याने वाढवला गेला. सर्वप्रथम, सन 1955-56 मध्ये पीएफवरील व्याजदर 3.50 टक्के करण्यात आला. आठ वर्षांच्या कालावधीनंतर, सन 1963-64 मध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आणि व्याजदर 4 टक्के झाला. यानंतर पीएफच्या व्याजदरात दरवर्षी 0.25 टक्के वाढ करण्याची परंपरा बनली.
इतक्या वर्षांनी व्याज 8 टक्क्यांच्या पुढे
वर्ष 1970-71 मध्ये व्याजदर 0.10 टक्क्यांनी वाढवला होता. या वर्षी पीएफवरील व्याजदरात वाढ करण्याची परंपरा खंडित झाली होती. त्यावेळी व्याजदर 5.50 टक्के इतका झाला होता. त्यावेळी पीएफ व्याजदर घटवण्याचा निर्णय घेण्यात आला नव्हता. वर्ष 1977-78 मध्ये पहिल्यांदाच पीएफवरील व्याज 8 टक्क्यांच्या पुढे गेला. वर्षभरानंतर त्यात पुन्हा 0.25 टक्के वाढ करण्यात आली. त्यासोबतच 0.50 टक्के बोनस देण्याचा निर्णयही सरकारने घेतला होता.
30 वर्षांपूर्वी झाला होता विक्रम
1985-86 मध्ये प्रथमच पीएफवरील व्याज 10 टक्क्यांच्या पुढे गेला. त्या वर्षी व्याजदर 9.90 टक्क्यांवरून 10.15 टक्के इतका करण्यात आला. एका वर्षानंतर म्हणजे 1986-87 मध्ये हा व्याजदर आणखी वाढून 11 टक्के झाला. हा विक्रम 1989-90 मध्ये झाला होता. पीएफवरील व्याजदर 12 टक्क्यांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला होता. त्यानंतर सलग 10 वर्षे त्यात कोणताही बदल झाला नाही. या 10 वर्षांच्या कालावधी पीएफवरील व्याज कमी करण्याची प्रथा सुरू झाली.
वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात व्याजदरावर कात्री
2001 मध्ये प्रथमच पीएफवरील व्याजात कपात करण्यात आली. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील भाजप-एनडीए सरकारने पीएफ व्याजदर 11 टक्के केला. सन 2004-05 पर्यंत ही मोठी कपात होती. त्यानंतर एकाच वेळी या व्याजदरात एक टक्क्यांनी त्यात कपात करण्यात आली होती. त्यानंतर 2010-11 मध्ये युपीए सरकारने व्याजदरात वाढ केली. पीएफवरील व्याजदर 9.50 टक्के करण्यात आला. त्यानंतर पुढील वर्षी पुन्हा कपात करण्यात आली आणि व्याजदर 8.25 टक्के इतका झाला. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले तेव्हा व्याजदर 8.75 टक्के इतका होता. तर, 2015-16 मध्ये यामध्ये किंचीत वाढ करण्यात आली. तर, 2019-20 मध्ये व्याजदर 8.50 टक्के इतका करण्यात आला. आता हा दर 8.10 टक्के इतका करण्यात आला आहे.