(Source: ECI/ABP News/ABP Majha)
होळीची दमदार भेट! 16 मार्चला महागाई भत्त्यावर निर्णय होण्याची शक्यता; जाणून घ्या कर्मचाऱ्यांना किती लाभ होणार
Dearness Allowance : केंद्राने कोरोनाकाळात कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यावर निर्बंध आणले होते. आता तब्बल 18 महिन्यांनंतर यावर निर्णय होणार आहे.
नवी दिल्ली: केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना येत्या होळी दिवशी गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. गेल्या 18 महिन्यांपासून थांबलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यावर (Dearness Allowance) येत्या 16 मार्चला निर्णय होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीप्रमाणे या वेळी महागाई भत्त्यामध्ये 3 टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे.
या आधी महागाई भत्ता हा 31 टक्के देण्यात येत होता, आता तो 34 टक्के मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनामुळे गेल्या 18 महिन्यांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळाला नाही. त्यावर केंद्र सरकार आता वन टाईम सेटलमेंट करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात चांगलीच वाढ होणार आहे.
निवडणुकीमुळे उशीर
पाच राज्यांमधील निवडणूक प्रक्रियेमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्याच्या निर्णयामध्ये वेळ झाल्याचं सांगितलं जातंय. या होळीला जर याचा निर्णय झाला तर तब्बल 48 लाख कर्मचाऱ्यांना आणि 68 लाख पेंशनधारकांना त्याचा लाभ मिळणार आहे.
किती रुपये मिळणार महागाई भत्ता?
एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 18 हजार रुपये असेल तर त्याला 31 टक्के महागाई भत्त्यानुसार 5580 रुपये प्रति महिना महागाई भत्ता मिळू शकतो. जर महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवला आणि तो 34 टक्के केला तर त्या हिशोबाने महागाई भत्ता 6120 रुपये प्रति महिना इतका होईल.
महागाई भत्त्याची सुरुवात कधी?
वाढती महागाई लक्षात घेता राहणीमानाचा स्तर कायम राखण्यासाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना तसेच राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यात येतो. देशात सर्वप्रथम, मुंबईमध्ये 1972 साली महागाई भत्ता देण्यात आला. त्यानंतर त्याचे अनुकरण केंद्र सरकारने करत केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला.
महत्त्वाच्या बातम्या: