शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना दमदाटी
ठाण्यातील गांधी नगर परिसरातील मागील अनेक वर्षे अडकलेले पुनर्वसन प्रकल्पातील बाधितांनी घराचे भाडे मागितल्यानंतर माजी नगरसेवक संजय पांडे यांनी धक्काबुकी करत शिविगाळ केली.

मुंबई : राज्यात एकीकडे महापालिका निवडणुकांची (Election) रणधुमाळी सुरू असून नेतेमंडळींकडून मोठी आश्वासने दिली जात आहेत. सर्वसामान्य नागरिकही निवडणुकांची संधी साधत आपल्या मागण्या करत आहेत, आपल्या भागातील तक्रारींचा पाढा उमेदवारांपुढे मांडत आहेत. त्यातून, अनेकदा उमेदवार हतबल झाल्याचे, तर कुठे संतप्त झाल्याचे पाहायला मिळत आहेत. ठाण्यातील शिंदेंच्या शिवसेनेच्या (Shivsena) माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या व्हायरल (Viral) झालेल्या कथित ऑडिओ क्लिपनंतर विटाव्याच्या महिला उमेदवार प्रियंका पाटील यांचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आला. आता, ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सिद्धार्थ पांडे यांच्या वडिलांनी केलेल्या गुंडगिरीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये, प्रकल्पबाधितांचा चक्क तोंड दाबून धमकवल्याचं पाहायला मिळत आहे.
ठाण्यातील गांधी नगर परिसरातील मागील अनेक वर्षे अडकलेले पुनर्वसन प्रकल्पातील बाधितांनी घराचे भाडे मागितल्यानंतर माजी नगरसेवक संजय पांडे यांनी धक्काबुकी करत शिविगाळ केली. आपल्या रुबाबात सर्वसामान्य प्रकल्पबाधितांना धमकावणे आणि शिवीगाळ केल्याचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे सर्वच प्रकल्पबाधितांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे, समाज माध्यमातही हा व्हिडिओ पाहून संतापाची लाट पसरल्याचं कमेंटवरुन दिसून येत आहे. निवडणुकू प्रचारात एकीकडे 10 लाखाचे घड्याळ घालून प्रचार करताना सिद्धार्थ पांडे दिसत आहेत. तर, दुसरीकडे हक्काचे भाडे मिळत नसल्याने हवालदिल झालेल्या पुनर्वसन प्रकल्प बाधितांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे. याउलट त्यांनाच सिद्धार्थ पांडे यांच्याकडून दमदाटी आणि मारहाण होत असल्याचं दिसून येतं.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रियंका पाटील मतदारांच्या गाठीभेटी घेत होत्या. त्यावेळी तुम्ही 5 वर्षात कधीच फिरकल्या नाहीत, तुमचे काम नाही असा सवाल स्थानिक मतदारांनी केला. त्यावर प्रियंका पाटील जोरदार भडकल्या आणि सर्वांना सांगा नोटा दाबा आम्ही आमच्या जीवावर निवडून येऊ, असे त्यांनी नागरिकांना उद्देशून विधान केले आहे. यासंबंधीची एक व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून प्रियांका पाटील या टीकेच्या धनी ठरत आहेत. प्रियंका पाटील शिवसेनेच्या ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 24 च्या उमेदवार आहेत, मतदारांसोबत बाचाबाची झाल्याचा त्यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. जाणून बुजून काही जणांनी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. तो व्हिडिओ अर्धवट आहे. मी त्या प्रभागात काम केले आहेत असे तिथल्या महिलांनी स्वतः सांगितले आहे.
हेही वाचा




















