नटरंगसाठी अतुल कुलकर्णी नव्हे 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाच्या मनात; कागल गावच्या रांगड्या गुणासाठी कोण होतं पहिली पसंती?
अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत रवी जाधव यांनी या चित्रपटाच्या कास्टिंगमागचा रंजक किस्सा उघड केला आहे.

Natarang Atul kulkarni casting: मराठी मनोरंजन विश्वात असे मोजकेच चित्रपट आणि भूमिका आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर दीर्घकाळ राज्य केलं. यातलाच एक चित्रपट म्हणजे नटरंग. यातला कागल गावचा रांगडा गुणा सगळ्यांच्याच लक्षात राहिला. रवी जाधव (Ravi Jadhav) दिग्दर्शित हा चित्रपट 2010 साली प्रदर्शित झाला आणि अवघ्याच काळात तो प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला.
नटरंगमधील गुणवंतराव उर्फ गुणा कागलकर हे व्यक्तिरेखेचं सशक्त सादरीकरण अतुल कुलकर्णीने केलं होतं. मात्र, या भूमिकेसाठी सुरुवातीला अभिनेता अतुल कुलकर्णी नाही तर वेगळयाच कलाकाराचं नाव दिग्दर्शकाच्या मनात होतं. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत रवी जाधव यांनी या चित्रपटाच्या कास्टिंगमागचा रंजक किस्सा उघड केला आहे.
कागलगावच्या गुणासाठी कुणाला होती पहिली पसंती ?
अमोल परचुरेंच्या कॅच अप या मराठी पॉडकास्टमध्ये बोलताना रवी जाधव म्हणाले की, नटरंगसाठी अतुल कुलकर्णी ही त्यांची पहिली निवड नव्हती. सुरुवातीला त्यांनी आदेश बांदेकर यांचं नाव विचारात घेतलं होतं. अजय- अतुल या संगीतकार जोडीशी आपली ओळखही आदेश बांदेकरमुळेच झाली होती, असं त्यांनी सांगितलं. त्या काळात झी मराठीसाठी काम करत असल्यामुळे आदेशचा इंडस्ट्रीत मोठा संपर्क होता.
पुढे कास्टिंगबाबत निर्णय चॅनेल स्तरावर झाला आणि अतुल कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. निखिल साने आणि वैद्य यांनी हे कास्टिंग केलं होतं. प्रेक्षकांची नाडी ओळखणाऱ्या या टीमला वाटलं की, अतुल आल्यास सिनेमाला वेगळी उंची मिळू शकते आणि तसंच घडलं.
अतुलच्या मेहनतीचं भरभरून कौतूक
रवी जाधव यांनी अतुल कुलकर्णीच्या मेहनतीचं भरभरून कौतुक केलं. दिग्दर्शक म्हणून आपण थोडे स्वार्थी असतो, असं सांगत ते म्हणाले की, हिंदीतील मोठे चित्रपट केलेला अभिनेता मराठीत येऊन इतक्या बारकाईने काम करतो, प्रत्येक लहानसहान गोष्टीवर लक्ष देतो, हे खूप शिकवणारं होतं. अतुलला स्क्रिप्ट ऐकवण्याआधी आपण संपूर्ण प्रेझेंटेशन नव्यानं तयार केलं होतं, कारण त्यांचे प्रश्न आणि त्यांचा दृष्टिकोन नेहमीच खोल असतो, असंही त्यांनी नमूद केलं.
अतूलच्या ट्रान्सफॉरमेशन विषयीही सांगितलं ..
गुणाच्या ट्रान्सफॉर्मेशनबाबत बोलताना रवी जाधव म्हणाले की, पैलवानापासून बारीक, तणावग्रस्त कलाकारापर्यंतचा प्रवास अतुलने ज्या पद्धतीने साकारला, तो कल्पनातीत होता. आजच्या काळात असं समर्पण क्वचितच पाहायला मिळतं. त्या काळात इतर कोणतंही काम न करता फक्त या भूमिकेसाठी स्वतःला झोकून देणं, ही गोष्ट कौतुकास्पद आहे. अशा कलाकारांसोबत काम करण्याचं भाग्य मिळालं, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.























