(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Economic Survey 2022 : पुढील आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी 8-8.5 टक्के राहणार, पण...
Economic Survey 2022 : देशाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल आज जाहीर करण्यात आला. या सर्वेक्षण अहवालानुसार पुढील वर्षी जीडीपीचा दर 8 ते 8.5 टक्के राहण्याचा अंदाज आहे.
Economic Survey 2022 : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आधी आज संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला. या आर्थिक सर्वेक्षणात अहवालात पुढील आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी 8 ते 8.5 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महासाथीच्या आजाराची लाट व इतर अडथळे न आल्यास हा अंदाजित विकास दर गाठता येईल असे केंद्रीय अर्थ खात्याने आर्थिक सर्वेक्षण अहवालात नमूद केले आहेत.
कोरोना महासाथीच्या आजारामुळे भारतासह जगातील इतर देशांच्या आर्थिक विकासाला खीळ बसली आहे. काही देश कोरोनाच्या संकटातून सावरले आहेत. आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार यंदाच्या आर्थिक वर्षात 2021-22 मध्ये देशाची अर्थव्यवस्था 9.2 टक्क्यांनी वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील वर्षी देशाची अर्थव्यवस्था वाढीसाठी काही घटक मुख्यत: कारणीभूत ठरणार आहेत. यामध्ये कोरोना लसीकरण, निर्यातीत वाढ, नियमांमध्ये करण्यात येणारे बदल आदींमुळे जीडीपी वाढू शकतो. त्याशिवाय खासगी क्षेत्राकडून होणारी गुंतवणूक अर्थव्यवस्था वाढीसाठी हातभार लावू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोणत्या गृहितकावर जीडीपी वाढीचा अंदाज?
पुढील वर्षी भारताचा जीडीपी 8 ते 8.5 टक्क्यांनी वाढणार असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा अंदाज व्यक्त करताना काही गृहितकांचा आधार घेण्यात आला आहे. यामध्ये अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारी महासाथीची लाट न आल्यास, मान्सून सामान्य असल्यास, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 70-75 डॉलर असावे आणि जागतिक पुरवठा साखळी सुरळीतपणे सुरू राहिल्यास हा जीडीपी दर गाठता येईल असे आर्थिक सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात येणार आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती कोव्हिड पूर्व काळासारखी
कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला असल्याचे आर्थिक सर्वेक्षण अहवाला नमूद करण्यात आले आहे. कोरोना लसीकरणाचा मुद्दा हा केवळ नागरिकांच्या आरोग्याशी निगडित नसून आर्थिक विकासात येणारे अडथळे दूर करण्यासाठीचे प्रयत्न असल्याचे आर्थिक सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आले. देशाची अर्थव्यवस्था कोव्हिड पूर्व काळात असलेल्या अर्थव्यवस्थेतेच्या काळात (वर्ष 2019-20) आली असल्याचेही आर्थिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. जीडीपीच्या त्रैमासिक अंदाजानुसार भारतीय अर्थव्यवस्था 2020-21 च्या दुसऱ्या सहामाहीपासून सतत सुधारणा करत असल्याचे आर्थिक सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे.
- इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Economic Survey 2022: : लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर; पुढील वर्षी जीडीपी दर 8-8.50 टक्के राहण्याचा अंदाज
- Budget 2022: GDP म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या प्रत्येकासाठी का महत्त्वाचा आहे जीडीपी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha