Budget 2022 : देशात स्थापन होणार डिजिटल विद्यापीठ ; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा
Budget 2022 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman ) यांनी अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्राबाबत अनेक घोषणा केल्या. यामध्ये अर्थमंत्र्यांनी देशात डिजिटल विद्यापीठ निर्माण करण्याची घोषणा केली आहे.
Budget 2022 : गेल्या दोन-अडीच वर्षांपासून जगभरात कोरोना महामारीचं संकट आहे. कोरोनाच्या काळामध्ये शिक्षण क्षेत्र जास्त प्रभावित झाले. शाळा महाविद्यालयं बंद असल्यामुळे विर्द्याथ्यांचे मोठे नुकसान झाले. कोरोनाचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर झाला. त्यामुळे आजच्या अर्थसंकल्पातून शिक्षण क्षेत्राच्या खूप अपेक्षा होत्या. अर्थमंत्र्यांनी मांडलेल्या अर्थसंपल्पातून शिक्षण क्षेत्राबाबत अनेक घोषणा केल्या.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman ) यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्राबाबत अनेक घोषणा केल्या आहेत. यामध्ये, डिजिटल शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि शिक्षणातील सुविधांचा विस्तार करण्यासाठी अनेक नवीन प्रकल्पांची घोषणा केली. यामध्ये अर्थमंत्र्यांनी देशात डिजिटल विद्यापीठ निर्माण करण्याची घोषणा केली आहे.
अर्थमंत्र्यांनी सांगितले की, डिजिटल विद्यापीठाच्या माध्यमातून घरोघरी शिक्षण पोहोचेल. विद्यार्थ्यांना अनेक प्रादेशिक भाषांमध्ये शिक्षण मिळेल. त्याबरोबरच डिजिटल विद्यापीठांतून विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे दर्जेदार शिक्षण मिळेल. दर्जेदार शिक्षणासाठी वन क्लास वन टीव्ही चॅनल कार्यक्रम सुरू होईल. आतापर्यंत फक्त 12 टीव्ही चॅनेल्सच्या माध्यमातून मुलांना शिक्षण मिळत होते. आता देशभरात दोनशे टीव्ही चॅनेल सुरू करण्यात येतील. पहिली ते 12 वीच्या मुलांना प्रादेशिक भाषांमध्ये शिक्षण दिले जाईल. याबरोबरच डिजिटल विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थी टीव्ही, मोबाईल आणि रेडिओवरून आपल्या प्रादेशिक भाषेत शिक्षण घेऊ शकतील.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात डिजिटल शिक्षणावर भर दिला आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे भविष्यात असे नुकसान होऊ नये यासाठी ई-कंटेंट आणि ई-लर्निंगला चालना मिळण्यासाठी देशात डिजिटल विद्यापीठ स्थापन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
निर्मला सीतारमण यांनी कृषी शिक्षणावरही भर देण्यात येणार असल्याचे सांगितले. शून्य-बजेट आणि सेंद्रिय शेतीसह आधुनिक शेतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कृषी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात सुधारणा करण्यावर भर दिला जाईल, असेही निर्मला सीतारमण यांनी यावेळी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
Union Budget 2022: '60 लाख नवे रोजगार निर्माण करणार', अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून अर्थसंकल्प सादर
Budget 2022: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या भाषणातील आतापर्यंतचे प्रमुख मुद्दे