मोठी बातमी! अमित शाहांच्या अडचणी वाढणार, निवडणूक निकालापूर्वीचं 'ते' वक्तव्य भोवणार
India Allince Complaint to SEBI: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या अडचणी वाढणार असून इंडिया आघाडी सेबीकडे अमित शहांच्या स्टॉक मार्केटबाबतच्या वक्तव्याविरोधात तक्रार दाखल करणार आहे.
Amit Shah : नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. निवडणूक निकालापूर्वी (Lok Sabha Election Result 2024) स्टॉक मार्केटबाबत (Stock Market) केलेल्या वक्तव्याचा अमित शाह यांना फटका बसणार असल्याचं बोललं जात आहे. इंडिया आघाडीचे (India Allince) खासदार आज सकाळी 11 वाजता सेबीकडे (SEBI) तक्रार करणार आहेत. सेबीकडे तक्रार करायला जाण्यापूर्वी इंडिया आघाडीच्या खासदारांनी शरद पवार यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवर भेट घेतली. यावेळी तृणमुलचे खासदार साकेत गोखले, कल्याण बॅनर्जी आणि सागरीका घोष उपस्थित होते. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने अरविंद सावंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रतिनिधी म्हणून सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल जाहीर होण्यापूर्वी 3 जून रोजी शेअर बाजारात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि त्यानंतरच 4 जून रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, त्यावेळी मात्र बाजारात कमालीची पडझड पाहायला मिळालेली. काँग्रेसनं नुकताच शेअर बाजारातील या चढ-उताराला सर्वात मोठा घोटाळा ठरवून जेपीसी चौकशीची मागणी केली होती, तर आता देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन झाल्यानं पुन्हा एकदा हा प्रश्न चर्चेत आला आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते साकेत गोखले यांनी याप्रकरणी बाजार नियामक सेबीकडे तक्रार करणार असून चौकशीची मागणीही केली जाणार आहे.
साकेत गोखलेंसह राहुल गांधींनीही केलेले गंभीर आरोप
तृममूलचे नेते साकेत गोखले यांच्यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केलेले. निवडणूक निकालाच्या दिवशी शेअर बाजाराला आलेल्या त्सुनामीच्या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांनी अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले होते. ते म्हणाले होते की, भारताच्या शेअर बाजाराच्या इतिहासातील हा सर्वात मोठा घोटाळा आहे. त्यांनी याप्रकरणी जेपीसीची मागणी केली होती. शेअर बाजारात विक्रमी वाढ झाल्याचं सांगत अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकांना शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिल्याचंही राहुल गांधी म्हणाले होते.
राहुल गांधींच्या म्हणण्यानुसार, पीएम मोदी, अमित शहा आणि निर्मला सीतारामन यांना यावेळी अंदाजे 220 जागा मिळतील असा अंदाज होता, परंतु बनावट एक्झिट पोलद्वारे लोकांमध्ये खोटं पसरवलं गेलं. यानंतर, एक्झिट पोलच्या अंदाजानंतर लगेचच शेअर बाजारानं लक्षावधी अशी झेप घेतली. सर्व रेकॉर्ड तोडले, पण दुसऱ्याच दिवशी 4 जून रोजी शेअर बाजारात मोठी घसरण झाली.