Patanjali : आयुर्वेदाला जागतिक ओळख दिली, आचार्य बालकृष्ण यांचे योगदान आणि पतंजलीच्या यथोगाथेची कहाणी
Patanjali News : आचार्य बालकृष्ण आणि बाबा रामदेव यांनी आयुर्वेद आणि योगाला जागतिक मान्यता मिळवून दिली. स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देऊन त्यांनी पतंजलीला देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक बनवले.

Acharya Balkrishna : योग आणि आयुर्वेदाला जागतिक ओळख मिळवून देणाऱ्या आचार्य बालकृष्ण यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे पतंजली आयुर्वेद आज भारतातील आघाडीची स्वदेशी ग्राहक उत्पादने निर्माण करणारी कंपनी बनली आहे. स्वामी रामदेव यांच्यासोबत 1995 मध्ये दिव्य योग मंदिर ट्रस्टची स्थापना करून त्यांनी 2006 मध्ये पतंजली आयुर्वेदची पायाभरणी केली.
आयुर्वेद आणि स्वदेशीचा जागतिक आवाज
आचार्य बालकृष्ण यांनी आधुनिक जगात आयुर्वेद आणि योगाला नवजीवन दिले. त्यांनी "आरोग्य, समृद्धी आणि मानसिक शांतता" यांचा परस्परसंबंध ओळखत, त्याच तत्वावर आधारित 400 हून अधिक नैसर्गिक आणि रसायनमुक्त उत्पादने बाजारात आणली. यात साबण, तेल, खाद्यपदार्थ, हर्बल औषधे यांचा समावेश आहे.
'स्वदेशी'ची ताकद आणि 'मेक इन इंडिया'चा आत्मा
आचार्य बालकृष्ण यांनी 'स्वदेशी' आणि 'मेक इन इंडिया' या तत्वांना पतंजलीच्या केंद्रस्थानी ठेवले. त्यांनी भारतीय उत्पादने आंतरराष्ट्रीय ब्रँड्सच्या समोर उभी केली आणि उपभोक्त्यांमध्ये 'भारतीय उत्पादने गुणवत्ता आणि विश्वासात कुठेही कमी नाहीत' हा आत्मविश्वास निर्माण केला. बाह्य मार्केट रिसर्चशिवाय उत्पादन लॉन्च करणारी पतंजली ही एक आगळी-वेगळी कंपनी ठरली.
सादगी, परिश्रम आणि नेतृत्व
94 टक्के भागिदारी असूनही आचार्य बालकृष्ण पतंजलीतून कोणतेही वेतन घेत नाहीत. ते दररोज 15 तास कार्य करतात आणि त्यांच्या साध्या जीवनशैलीमुळे कर्मचारी प्रेरित होतात. कागदोपत्री काम, पारंपरिक पोशाख आणि शिस्तबद्ध व्यवहार हे त्यांच्या नेतृत्वाचे खास पैलू आहेत.
संशोधन आणि शिक्षणातही उल्लेखनीय कामगिरी
ते पतंजली विद्यापीठाचे कुलगुरू आहेत आणि त्यांनी 330 हून अधिक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. त्यांच्या 'World Herbal Encyclopedia' मध्ये 50,000 हर्बल वनस्पतींचे दस्तऐवजीकरण आहे, जे जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त झाले आहे.
ग्लोबल मार्केटमध्ये पतंजलीची घोडदौड
आचार्य बालकृष्ण यांच्या नेतृत्वात पतंजलीने Amazon, BigBasket यांसारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आपली उपस्थिती वाढवली आहे. नव्या फॅक्टऱ्यांची उभारणी, वितरक नेटवर्क दुप्पट करणे आणि पाच लाख कर्मचाऱ्यांचे लक्ष्य ठेवणे, हे त्यांच्या आक्रमक पण शाश्वत विस्ताराचे संकेत आहेत.
आचार्य बालकृष्ण हे केवळ उद्योजक नाही, तर भारतीय परंपरेचे जागतिक प्रवक्ते आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पतंजली ब्रँडने 'आयुर्वेदिक भारत' हा संदेश जगभर पोहोचवला असून, भारतीय बाजारात स्वदेशी उत्पादनांवरचा विश्वास अधिक बळकट केला आहे.























