एखाद्या डब्ब्यात किंवा पाकिटात... 2 हजाराची नोट कुठे चुकून राहिलीय का पाहा अन् आजच बँकेतून बदलून घ्या!
2000 Rupee Note: 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याचा आज ( 7 ऑक्टोबर 2023) शेवटचा दिवस. पण, आजच शिल्लक नोटा बदलता आल्या नाहीतर...? काय असतील पर्याय... जाणून घ्या सविस्तर...
2000 Rupees Notes: आर्थिकदृष्ट्या ऑक्टोबर महिना अत्यंत महत्त्वाच्या आहे. सध्या सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, 2000 रुपयांची नोट (2000 Rupee Note) बंद होणार आहेत. सरकारनं नोटा बदलून घेण्याची मुदत वाढवून दिली होती. त्या मुदतीचा आजचा शेवटचा दिवस. तुमच्याकडे अजुनही 2 हजारांच्या नोटा असल्यास त्या बँकेत (Bank) जमा करण्याची आज शेवटची संधी आहे. जर तुम्ही आज 2 हजारची नोटी बदलून घेतली नाही, तर मात्र त्यानंतर तुम्हाला नोटा बदलता येणार नाहीत. दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नं 19 मे रोजी 2 हजार रुपयांच्या गुलाबी नोटा चलनातून काढून टाकण्याची घोषणा केली होती आणि 30 सप्टेंबर 2023 पर्यंत परत करण्याची सुविधा सर्वांना दिली होती. त्यानंतर, केंद्र सरकारकडूनच ही मुदत वाढवण्यात आली.
आरबीआयनं ही मुदत 7 दिवसांनी वाढवली
2,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची अंतिम मुदत सात दिवसांनी वाढवून 7 ऑक्टोबर 2023 करण्यात आली असून आज त्याचा शेवटचा दिवस आहे. आरबीआयनं मुदत वाढवण्याची घोषणा करताना नोटा परत करण्याचा डेटाही सादर केला. RBI च्या म्हणण्यानुसार, 29 सप्टेंबर 2023 पर्यंत चलनात असलेल्या 2 हजार रुपयांच्या 96 टक्के नोटा परत आल्या आहेत. 31 मार्चपर्यंत, देशात 3.56 लाख कोटी रुपयांच्या या नोटा होत्या, त्यापैकी 3.43 लाख कोटी रुपयांच्या नोटा परत आल्या आहेत, तर 0.14 लाख कोटी रुपयांच्या नोटा बाजारात होत्या.
अंतिम मुदतीनंतर नोटी बदलता नाही आल्या तर पर्याय काय?
महत्त्वाची बाब म्हणजे, ज्यावेळी रिझर्व्ह बँकेनं 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी ज्यांच्याकडे त्या नोटा आहेत, त्या परत करण्याचीही व्यवस्था केली होती. लोकांना या गुलाबी नोटा त्यांच्यासोबत बँका आणि 19 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये बदलून देण्याची सुविधा रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आली होती. आता या महत्त्वाच्या कामांची मुदत संपली असून 7 ऑक्टोबरनंतर या नोटा कुणाकडे शिल्लक राहिल्या, तर त्यांचं काय होणार? हेही जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
जर आरबीआयनं दिलेल्या मुदतीतही बँकेतून नोटा बदलून घेणं शक्य झालं नाही, तर चिंता करु नका. 7 ऑक्टोबरनंतरही आरबीआयच्या 19 कार्यालयांमधून 2 हजार रुपयांच्या नोटा बदलून घेता येतील. महत्त्वाची बाब म्हणजे, एकाच वेळी 20 हजार रुपयांपेक्षा जास्त नोटा बदलता येणार नाहीत.
नोटाबंदीनंतर 'या' नोटा अस्तित्वात आल्या
2 हजार रुपयांची नोट नोव्हेंबर 2016 मध्ये बाजारात दाखल झाली होती. जेव्हा सरकारनं चलनात असलेल्या सर्वात मोठ्या चलनी नोटा म्हणजेच, 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याची घोषणा केली होती. तेव्हा 2 हजाराची गुलाबी नोट बाजारात आली. नोटाबंदीनंतर, रिझर्व्ह बँकेनं बंद केलेल्या 500 रुपयांच्या नोटेऐवजी नवीन नोट जारी केली होती आणि 1 हजार रुपयांच्या नोटेऐवजी २ हजार रुपयांची नोटही जारी केली होती.
दरम्यान, इतर मूल्यांच्या नोटा पुरेशा प्रमाणात चलनात आल्यावर, RBI नं 2018-19 या वर्षांपासून 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबवली. त्यानंतर, 19 मे 2023 रोजी, क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत ही मोठी नोट चलनातून बाहेर काढण्याची घोषणा करण्यात आली.