(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BLOG : बाळासाहेब की दि बा पाटील? बदललेल्या राजकारणाचे रंग!
नवी मुंबईतून लवकरच विमानसेवा सुरु होईल तेव्हा 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे विमानतळावर आपलं स्वागत आहे' अशी घोषणा होईल की 'दि. बा. पाटील विमानतळावर आपलं स्वागत आहे' अशी? सध्या तरी नवी मुंबई आणि परिसरात नामकरणाच्या या मुद्यावर राजकारण तापलं आहे. कारण या विमानतळाला शिवसेनाप्रमुखांचं नाव देण्यासाठी शिवसेनेनं पावलं टाकली आहेत आणि भाजप, मनसे, वंचित आघाडीसह स्थानिकांनी दि. बा. पाटलांच्या नावाचा आग्रह धरला आहे. या सगळ्यामागे राजकारणाचे अनेक कांगोरेही आहेत. पण या निमित्तानं दि. बा. पाटील हे नाव महाराष्ट्रासमोर पुन्हा आलं आहे.
दि. बा. पाटील हे नाव सर्वांसमोर पुन्हा आलंय अशासाठी कारण ते कधीकाळी राज्यातील जनतेला परिचित होतं. कधी पनवेलचे नगराध्यक्ष म्हणून, कधी विधानसभेतले आमदार, विरोधी पक्षनेते म्हणून, तर कधी लोकसभेतले कुलाब्याचे खासदार म्हणून. या पदांवर काम करताना शेतकरी, कष्टकऱ्यांचे नेते म्हणून दि. बा. पाटलांनी केलेलं कार्य आजच्या पिढीला माहीत नसलं, तरी दि. बा. पाटलांनी सरकारला जे निर्णय घ्यायला भाग पाडलं अशा अनेक निर्णयांचा फायदा आधीच्या पिढ्यांना झाला आहे. नवी मुंबईतल्या भूमिपुत्रांचं अस्तित्व दि. बा. पाटलांनी तेव्हा उभारलेल्या आंदोलनामुळे आजही कायम राहिलं आहे.
आजची सुंदर नवी मुंबई अनेक गावांवर उभी राहिली आहे. या शहरासाठी आपलं घर, शेत, जमीन देणाऱ्या स्थानिकांसाठी दि. बा. पाटलांनी उभारलेल्या लढ्यामुळे इथला भूमिपुत्र अजून टिकून आहे. त्यांनी विकासाला विरोध केला नाही, पण त्यासाठी ज्यांच्या जमिनी घेतल्या जाणार होत्या त्यांना पुरेसा आर्थिक मोबदला आणि विकसित केलेल्या शहरात साडेबारा टक्के भूखंड मिळावा यासाठी त्यांनी आंदोलन उभारलं. दि. बा. पाटलांच्या जासई गावात या आंदोलनावर गोळीबार झाला. काही शेतकऱ्यांनी प्राण गमावले. पण नवी मुंबईचा विकास करताना साडेबारा टक्के भूखंडाची तरतूद दिबांनी करून घेतली. प्रकल्पग्रस्तांना त्याचा मोठा फायदा झाला. नवी मुंबईला मूळचा भूमिपुत्र या शहरात अस्तित्व टिकवू शकला. दिबांचं हे योगदान सर्वात मोठं आहे.
दि. बा. पाटलांची कारकीर्द या एका आंदोलनापुरती मर्यादित नाही. त्यांनी तरुणपणात कुळकायद्यासाठी लढा उभारला. कुळकायदा विधिमंडळात मंजूर झाला तेव्हा दि. बा. पाटील विधानसभेत आमदार होते. या कायद्यासाठी लढा देताना दि. बा. पाटलांना त्यातले खाचखळगे माहिती होते. त्यामुळे विधेयकातल्या त्रुटींवर बोट ठेवत त्यांनी या कायद्यात अनेक सुधारणा करण्यास सरकारला भाग पाडलं. याच कुळकायद्याचा फायदा राज्यभरातल्या लाखो शेतकऱ्यांना झाला आणि वर्षानुवर्षे शेतात कसणारी कुळं त्या शेताचे मालक झाली. केवळ कुळकायदाच नव्हे तर शेती, जमीन, महसूल, शेतकरी, भाडेकरू अशा अनेक कायद्यांवर आपल्या अभ्यासपूर्ण भाषणानं सुधारणा करुन घेणारे दि. बा. पाटील एकेकाळी विधिमंडळातले खऱ्या अर्थानं जनतेचे प्रतिनिधी होते.
रायगडात प्राबल्य असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे ते नेते. त्यांना राजकीय पार्श्वभूमी नव्हती. त्यांचे वडील शिक्षक आणि शेतकरी. दिबा कायद्याचे शिक्षण घेऊन वकील झाले आणि पुढे आंदोलनातून राजकारणात आले. नगराध्यक्षापासून ते खासदारपदापर्यंतच्या अनेक निवडणुका त्यांनी लढवल्या आणि जिंकल्या. अनेक दशकं त्यांनी विधिमंडळात आणि संसदेत काम केलं आणि आपल्या अभ्यासपूर्ण कामगिरीनं वेगळी छाप पाडली.
दि. बा. पाटलांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी आगरी-कोळी समाजानं आंदोलन सुरु केलं आहे. त्याला राजकीय पक्षांचीही साथ मिळाली आहे. त्यामुळे या आंदोलनाला आता राजकीय कांगोरेही आहेत. दिबा आगरी समाजाचे. ठाणे, नवी मुंबई आणि रायगड पट्ट्यात हा समाज्याचं प्राबल्य मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे नामकरणाच्या वादाला राजकीयदृष्याही महत्व आहे. भाजप, मनसे, वंचित अशा पक्षांनी दिबांचं नाव विमानतळाला द्यावं म्हणून जाहीर भूमिका घेतली आहे. पण दि. बा. पाटलांनी ज्या शेकापमध्ये आपली हयात ज्या पक्षात घालवली तो शेकाप आता महाविकास आघाडीसोबत आहे आणि त्यांची या प्रश्नावरची भूमिका अजूनही संदिग्ध आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की शेकापचे निष्ठावंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिबांनी त्यांच्या राजकारणाच्या अखेरच्या दिवसात शिवसेनेची वाट धरली होती. त्या शिवसेनेनंच बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा आग्रह धरला आहे. नामकरणाच्या निमित्तानं या दोन्ही पक्षांच्या भूमिका निव्वळ योगायोग नाहीत, तर बदललेल्या राजकारणाचे रंग दाखवणाऱ्याही आहेत.
- विठोबा सावंत
लेखक एबीपी माझाचे प्रतिनिधी आहेत.