Blog : नित्य संघर्षाच्या 'प्रसवकळा'...
परकडल्या वर्षीची गोष्ट असलं, लय आठवतं नै, असंच पाऊस सुरू व्हता...आमच्या गावापासून ते समद्या गाव खेड्यात भात आवणीची लगबग सुरू होती. हा काळ असा असायचा की एकदा अवणी सुरू झाली की थांबायची न्हाय, पुढच्या आठेक दिसात उरकून जायची, मात्र आठ दिवस घरातला एक माणूस घरी राहायचा नै...!
त्या दिशी बी असाच मुसळधार पाऊस सुरू व्हता....व्हळाला मोक्कार पाणी वाढलं व्हतं..त्यामुळे येणं जाणं अवघड झालं व्हतं, म्हणा जायचं कुणीच नसायचं, कारण दरवर्षी प्रमाण पावसाळ्याचा सगळा किराणा जेथोडीच आणलेला असायचा, त्यामुळे पावसाळ्यात शहरात जाणं व्हायचं नै, त्यामुळे व्हहळ पार करणं शक्यतो कुणी करायचं नै...! मात्र त्या दिशी खालच्या आळीच्या तुळशीची लेक संगी. जी काही दिवसांपूर्वी बाळंतपणासाठी माहेरी आली व्हती, तिला सायंकाळी कळा यायला सुरुवात झाली. इकडं अख्खी माणस आवणीला गेलेली, शेजारच्या बारक्या पोराला सांगून संगीन आईला बोलावंण धाडलं, तसा पोऱ्यान एक हातात चड्डी पकडून आवणाकड धूम ठोकली. तोपर्यंत दिस बी उतरत आला व्हता, त्यामुळे एक एक माणूस घरी येत व्हता, अन् पावसामुळे गरम पाण्याने हातपाय धुवून चुलीपसी बसत होता, इकडं संगीच्या कळा वाढत चालल्या होत्या...
अखेर काही वेळाने संगीची आई धावतपळत घरी आली. 'काय व संगे लय पोटात दुखतंय, थांब, तुया बहासयी येतंय', लगेच निगु आपण, घाबरू नको' अस म्हणत तिने संगीला धीर दिला. तेवढ्यात संगीचा भाऊ दाम्या अन् संगीचा बाप दारात पोचला...संगीच्या आईने तिला लगेच दवखाण्यात न्यावं लागलं अस सांगितलं. त्यामुळं दोघेही बापलेक काळजीत पडलं, सुरवातीला पाव्हण्याला फोन करून दिला, व्हळाच्या त्या बाजूला येऊन थांबा, आम्ही येतूय, 'पण आता काय करायचा, पोरील नेयाचा कसा?' इकडं व्हळाच पाणी वाढतं चाललेलं, तसं सारं घरदार व्याकुळ झालेलं, दुसरीकडं संगीही कासावीस झालेली...!
दाम्यान लगोलग दोन तीन फोन फिरवले, लागलीच त्याची मित्र कंपनी घराजवळ जमा झाली. त्याचबरोबर भर पावसातही आजूबाजूच्या आयाबाया, काही जेष्ठ मंडळी गोळा झाली. सर्वांच्या मते लवकरात लवकर पेशंटला दवाखान्यात हलवा, टाइम झाला तर व्हळातून नेता येणार नाही, लागलीच चादरीची झोळी करून लाकडाच्या खांबाला बांधली, तिच्यात संगीला झोपवलं, दोन तीन जणांनी मोठं मोठ्या बॅटऱ्या घेउन चालायला सुरुवात केली. झोळी एवढी बारीक पण दोन जीव कसेबसे त्या झोळीत बसवले होते. व्हळाचं पाणी वाढलंच होत, जीव धोक्यात घालून एक जीव वाचवायचा होता...संगीचा भाऊ पुढे त्याचा मित्र मागे, त्याच्या मागे संगीच्या बापाने बॅटरी धरून व्हळातून चालू चालायला सुरुवात केली. इकडं काठावर संगीची आई अंगावरच्या फडकीचा बोळा तोंडात कोंबून रडत व्हती, आईच ती...!
वर काळाकुट्ट अंधार, मुसळधार पाऊस, फक्त रातकिड्यांची किर किर ऐकू येत व्हती, हे तिघेही काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, व्हहळ कसा पार करायचा एवढंच ध्यानात व्हतं, तर संगीची काय अवस्था होती, ही तिला अन् तिच्या येणाऱ्या बाळाला ठाऊक होती, व्हळाच पाणी, त्यात बॅटरीचा उजेड आणि झोळीचे हेलकावे यात संगीची कसरत सुरू होती! तेवढ्यात व्हळाच्या दुसऱ्या बाजूने बॅटरीचा उजेड दिसला, 'दाजी, सांभाळून, दगड पाहून या, आलो मी', दाम्याच्या मेव्हण्याचा, संगीच्या नवऱ्याचा तो आवाज होता, तो व्हळाच्या दुसऱ्या काठावर आला होता, सोबत आईला घेऊन आला होता!
काही वेळात कसेबसे व्हळाचे दिव्य पार करत संगी एका दिव्यातून पुढे निघाली होती. संगीच्या नवऱ्याने पटकन गाडीला किक मारून संगीला त्यावर बसवले. त्याच्याआधी जागा नसलेल्या जागेवर त्याच्या आई म्हणजेच संगीची सासू बसली! त्यानंतर दाम्या, त्याचा मित्र अन् त्याचा बाप हे तिघेही पायी चालत दवाखाना गाठण्याचे ठरविले. त्यानुसार ते झपाझप रस्ता कापू लागले...! काही वेळात जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात संगी पोहचली होती. मात्र तिची मरणाच्या दारातली धडपड सुरूच होती. काही वेळातच तिचा जीव मोकळा झाला. सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
रात्रीचे दहा वाजले असतील! तोवर बातमी पांगलीही! काही पत्रकार दवाखान्यात दाखल झाले, बातम्या झाल्या, गावं चर्चेत आलं...'गरोदर महिलेचा पुराच्या पाण्यातून डोलीतून प्रवास, जीवाची बाजी लावून दिला गोंडस बाळाला जन्म' अशा हेडिंगन बातम्याही आल्या..बराच वेळ बातमी सुरू होती, दुसऱ्या दिवशी संगीच्या बाळासह तिचा फोटो पेपरात छापून आला होता. तोवर गावच्या व्हळाचा पुरही ओसरला होता...!