जडले नाते विश्वाशी...
Lata Mangeshkar : भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर, त्यांनी गेल्या सात दशकांत कला-सामाजिक क्षेत्रात जोडलेल्या माणसांच्या आठवणींतून लतादीदींच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंची नव्यानी उजळणी झाली. लतादीदींविषयीच्या अशाच आठवणी सांगणारा हा लेख... लतादीदींचे मोठेपण नेमकेपणाने विशद करणारा अन् महाराष्ट्रातील गेल्या पिढीतील खंद्या राजकीय नेतृत्वाची कलारसिकता दाखवून देणारा!
रविवारी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दु:खद निधन झाले. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणारी नाही. मात्र, त्यांच्या स्वर्गीय स्वराने अजरामर झालेल्या गाण्यांच्या रूपातून लतादीदी कायमच आपली सोबत करत राहणार आहेत. लतादीदींच्या निधनाची बातमी कानी पडल्यापासून त्यांच्या अलौकिक आवाजातील अनेक गाणी मनात रुंजी घालू लागली आहेत. त्याचबरोबर माझे आजोबा, लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी लतादीदींच्या आम्हाला सांगितलेल्या अनेक आठवणीही जाग्या झाल्या. जवळपास साठ वर्षांपूर्वीच्या लतादीदींबरोबरच्या भेटींच्या, संवादाच्या आजोबांनी सांगितलेल्या या आठवणी आजही खूप काही शिकवून जाणाऱ्या आहेत.
लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा लतादीदींशी प्रत्यक्ष परिचय झाला तो 1958 साली. लतादीदींचे वडिल पं. दीनानाथ मंगेशकरांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी ते प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित होते. तिथे त्यांची लतादीदींशी आणि त्यांच्या भावंडांशी ओळख झाली. बाळासाहेब सांगतात, “प्रसिद्धीचे झगझगीत वलय सतत सभोवती फिरत असणाऱ्या लताबाई प्रत्यक्ष भेटीत मला फारच साध्या, नम्र असल्याचे प्रत्ययास आले. बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व या त्यांच्या गुणांना अभिजात विनयशीलतेची जोड मिळालेली पाहून मला त्यांचे मोठे कौतुक वाटले.” लतादीदींनी ही विनम्रता अखेरपर्यंत जपल्याचे आपण पाहिले आहे. कला क्षेत्रातीलच नव्हे, तर जीवनाच्या अन्य विविध क्षेत्रांत वावरणाऱ्यांनीदेखील लतादीदींचा हा गुण आत्मसात करायला हवा, असे वाटते.
बाळासाहेब राजकारणाच्या क्षेत्रात सुरुवातीपासून कार्यरत असले, तरी त्या काळातील जाणते, कलारसिक नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. लतादीदींशी भेट झाल्यानंतर बाळासाहेबांना मराठी संगीत नाटकांचा तो सुवर्णकाळ आठवला. त्याविषयी ते सांगतात, “लतादीदींशी बोलत असताना मन एकदम खूप मागच्या काळात गेले आणि अनेक जुन्या आठवणी मनात दाटून आल्या… फार लहानपणी, त्यावेळी रंगभूमीवरच्या केवळ एकाच नटाच्या दर्शनासाठी मी पुन्हा पुन्हा नाटके बघत होतो. तो नट म्हणजे मास्टर दीनानाथ! उंचापुरा धिप्पाड देह, राजबिंडे रूप, अत्यंत आकर्षक आणि परिणामकारक व्यक्तिमत्त्व अशा दीनानाथांना स्टेजवर बघताना देहभान हरपून जाई. रंगभूमीवर ते पाऊल टाकीत तेदेखील कडाडून टाळी घेतच. आपल्या भरदार पहाडी आवाजात 'परवशता पाश दैवे'सारखे गीत ते गाऊ लागले की सर्वांगावर थरथरून रोमांच उभे राहात. केवळ दीनानाथांना बघण्यासाठी पिटात दोन आण्याच्या जागी मी आनंदाने बसून राही. त्यांचे 'रणदुंदुभी' हे नाटक मी पन्नास वेळा तरी पाहिले असेल! दीनानाथांना पाहताना हा अगदी वेगळा, स्वयंभू कर्तृत्वाचा व प्रतिभेचा कलावंत आहे हे तत्काळ जाणवत असे. लताबाईही मला तशाच वाटल्या. तीच स्वतंत्र प्रज्ञा, तेच तेजस्वी व्यक्तिमत्त्व आणि कलेच्या ऐश्वर्याचा तोच वरदहस्त!”
एकदा लतादीदी आमच्या घरी जेवायलाही आल्या होत्या. त्याविषयीची आठवण आदरणीय बाळासाहेबांनी सांगितली आहे ती अशी, “त्यावेळी त्यांच्या संगतीत आम्हा सर्वांचा वेळ मोठ्या आनंदात गेला. एवढ्या मोठ्या गायिकेला जेवणात कितीतरी काळजी घ्यावी लागत असेल आणि पथ्ये सांभाळावी लागत असतील अशी माझी कल्पना होती. तथापि प्रत्यक्षात तसे काही आढळून न आल्यामुळे मला मोठी गंमत वाटली.”
महाराष्ट्र शासनात वेगवेगळ्या खात्यांची जबाबदारी सांभाळणारे बाळासाहेब कामाच्या व्यापात असूनही वेळात वेळ काढून लतादीदींची गाणी ऐकत असत. 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. त्या शुभप्रसंगी लतादीदींच्या कंठातून निघालेली "घनश्याम सुंदरा" ही होनाजी बाळाची भूपाळी प्रत्यक्ष ऐकताना थरारून जाण्याचे भाग्य लाभल्याचे बाळासाहेबांनी प्रांजळपणे नमूद केले आहे. त्याचप्रमाणे चिनी आक्रमणाच्या प्रसंगी मुंबई येथील ब्रेबॉर्न स्टेडियमवर सहस्रावधी श्रोत्यांसमोर राष्ट्रीय संरक्षण निधीसाठी 'ऐ मेरे वतन के लोगों' हे अप्रतिम गीत लतादीदींनी गायले होते. ते ऐकताना प्रत्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरूही गहिवरले होते. त्या ऐतिहासिक प्रसंगी बाळासाहेब देसाई हेही उपस्थित होते.
1967 साली प्रसिद्ध झालेल्या ‘लता मंगेशकर रौप्य महोत्सव गौरव ग्रंथा’त बाळासाहेबांनी ‘आंतरराष्ट्रीय कलाकार’ या लेखातून लतादीदींचे मोठेपण अधोरेखित केले होते. त्यात त्यांनी लिहिले होते, “लताबाई या केवळ महाराष्ट्रीय नव्हेत, केवळ राष्ट्रीय नव्हेत, तर आंतरराष्ट्रीय गायिका आहेत. ‘जागतिक कलाकार' हे विशेषण सर्वार्थाने जर कोणा भारतीय कलावंताला लागू पडत असेल, तर ते लताबाईंनाच. संगीत ही विश्वभाषा आहे. म्हणून श्रेष्ठ संगीतकार हा कोणत्याही एका प्रांताच्या मालकीचा राहूच शकत नाही. त्याचे साऱ्या जगाशीच नाते जडलेले असते. असे लताबाईंनी सर्व विश्वाशी नाते जोडले आहे.”
लतादीदींविषयी माझ्याही मनात हीच भावना आहे. आपल्या गायकीने आणि त्याचप्रमाणे कला व सामाजिक क्षेत्रातील सक्रियेतेने त्यांनी आजच्या पिढीसमोर मोठा आदर्श उभा केला आहे. महाराष्ट्रीय म्हणून तो आदर्श आपणही जपणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.