एक्स्प्लोर
Advertisement
BLOG | आत्महत्या कधी थांबायच्या?
समीर शर्माच्या मृत्यूने पुन्हा एकदा या 67 टक्के लोकांचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. दुसरं काम मिळण्याची शक्यता नाही आणि आता वाट पाहाणंही हाती नाही.. यातून आलेला हा गुदमर वाटतो.
थेट मुद्द्यात हात घालूया.
आज दुपारी अभिनेता समीर शर्माच्या मृत्यूची बातमी आली. समीर शर्मा हा नावाजलेला नट होता. अगदी मुख्य भूमिकांमध्ये जरी नसला तरी दखलपात्र भूमिका त्याला मिळत होत्या. लेफ्ट राईट लेफ्ट, कहानी घर घर की, यह रिश्ते है प्यार के अशा बऱ्याच मालिकांत तो होता. यह रिश्ते.. या मालिकेत तर तो कुहूच्या वडिलांची भूमिका साकारत होता. बरं, व्यक्तिगत जीवनात संसारी होता.
मग असं अचानक काय झालं असेल?
पोलिसांनी संशयास्पद मृत्यूची नोंद केली आहे. आता पुढला तपास ते करतीलच. पण हाताशी इतक्या मालिका असून, एका लोकप्रिय मालिकेत पदरी पडलेला ट्रॅक चांगला असूनही समीरने आत्महत्या का केली असेल?
याचं उत्तर दडलं आहे कोरोना काळात होणाऱ्या चित्रिकरणामध्ये.
कोरोना काळात मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने टीव्ही, सिनेमांची चित्रिकरणं सुरू झाली. ती सुरू करताना कोरोनाचा संसर्ग रोखता यावा म्हणून काही अटी शर्ती घातल्या गेल्या. यातली एक मुख्य अट होती, ती मूळ कास्ट क्रूच्या केवळ 33 टक्के क्रू सेटवर असण्याची. म्हणजे शंभरापैकी केवळ 33 लोक सेटवर असणार होते. सर्वांनी त्याला होकार दिलाही. कारण त्या निमित्ताने चित्रिकरणं चालू होणं आवश्यक असणार होतं 100 बेकारांपैकी किमान 33 लोकांना काम मिळेल हा त्यातला हेतू होता. जो अत्यंत आवश्यक आहेच.
ट्रॅक बदलले गेले.. व्यक्तिरेखा कापल्या गेल्या.. मुख्य व्यक्तिरेखांभवतीच नव्या गोष्टी लिहिल्या गेल्या. कमीत कमी लोकांत चित्रिकरण कसं करायचं याचे प्लॅन आखले गेले.
पण पुढे काय?
अनलॉक महाराष्ट्र सुरू झालं. बघता बघता 5 ऑगस्टपासून दुकानं.. मॉल्स अशा अनेक गोष्टी अटीशर्तींसह सुरू झाल्या आहेत. पण चित्रिकरणाची अट मात्र 33 टक्क्यांवरच आहे.
आता मुद्दा असा की उरलेल्या 67 टक्के लोकांनी काय करायचं?
या 67 टक्क्यांमध्ये सगळे येतात. कलाकारांपासून पार स्पॉट बॉईजपर्यंत सगळे. अगदी गाड्यांचे, टेम्पोचे ड्रायव्हर्सही यात येतात. कोरोना काळातली स्थिती पाहता अनेक ड्रायव्हर्सनी मिळेत ते काम करायला घेतलं. पण अशा तळातून आपण जसे वर वर येऊ लागतो तसे काम करण्याचे पर्याय कमी होत जातात.
यातल्या सगळ्यात वरच्या बाजूच्या काही थरांत असतात सेटवरचे कलाकार.
कलाकाराची जेवढी ओळख जास्त तेवढे इतर कामं करण्याचे त्याच्यासमोरचे पर्याय कमी.
आज या 33टक्क्यांच्या अटीमुळे 67 टक्के लोकांच्या जगण्यावर प्रश्नचिन्ह आहे. अनेक मालिकांच्या सेटवर दुय्यम, तिय्यम वर्गाच्या भूमिकांना थेट कात्री लावण्यात आली आहे. केवळ मुख्य पात्रं घ्यायची आणि त्याचीच फुटेजं काढण्यावर भर आहे. त्यामुळे या चित्रिकरणातून ब वर्ग आणि क वर्ग बाद होतो. म्हणजे, नायिक-नायिका आणि मूळ व्हिलन तत्सम व्यक्तिरेखा सोडल्या तर भाऊ, वडील, आई, मैत्रीण अशा सगळ्या व्यक्तिरेखांना सध्या कात्री लागली आहे. त्याला चॅनल्स आणि प्रॉडक्शन हाऊसचाही ना इलाज आहे. शासनाने गाईडलाईन्स दिल्यानुसार काम होणं आवश्यक आहे.
तर अभिनेता समीर शर्मा हा 'या' 33 टक्क्यांमध्ये नव्हता असं कळतं. कारण 'ये रिश्ते है प्यार के' या मालिकेसाठी त्याला लोकेशनवर अद्याप बोलावणं आलं नव्हतं. त्यामुळे अर्थातच काम हाती नाही. या नैराश्येपोटी त्यांचा मृत्यू झालाय का, हे पाहायला हवं.
कलाकाराचा अशा पद्धतीने मृत्यू होण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी मनमित गरेवाल, प्रेक्षा मेहता यांच्याबाबतीतही अशी दु:खद बातमी आली होती. आता हा तिसरा बळी ठरला आहे. मृत्यू कशाने झाला.. कधी झाला हा तपास पोलीस करतीलच. पण मृत्यू झाला हे लक्षात घ्यायला हवं. या निमित्ताने इतरही अनेक प्रश्न समोर आले आहेत.
33 टक्के कलाकारांना घेऊन शूट सुरू करणं हे आवश्यक होतंच. पण आता इतर सर्व गोष्टी खुल्या करतानाच या 33 टक्क्यांचे हळूहळू 100 टक्क्यांच्या दिशेनं वाटचाल होणं गरजेचं आहे. ते कधी होणार? दुसरीकडे या 67 टक्के लोकांची थकित देणी दिली जाणं आवश्यक आहे. सध्या सुरू असलेलं चित्रिकरण पाहता सर्व कलाकारांना महिन्याचे महिन्याला मानधन देण्यावर निर्मात्यांचं एकमत झालं आहे असं कळतं. पण कित्येक निर्मात्यांनी कलाकारांना अद्याप जुनी देणीच दिलेली नाहीत त्याचं काय?
सध्या जी 67 टक्के इंडस्ट्री घरात बसून हा लॉकडाऊन उघडण्याची वाट पाहाते आहे त्याचं आपण काय करणार? निदान तो विचार तरी आपल्या डोक्यात आहे का? खरंतर यात सगळ्यात दुर्दैवी अवस्था कलाकाराची होते.तोंड लपवावं तरी पंचाईत आणि तोंड दाखवावं तरी पंचाईत. समाजात ओळख असल्यामुळे इतर काम करणं शक्य होतं नाही हे आहेच. पण आणखी एक महत्वाचा मुद्दा कलाकाराला काम करण्याला थांबवतो ते म्हणजे त्याची मानधन घेण्याची पद्धत. ब वर्ग किंवा क वर्ग भूमिका करणाऱ्या नाट्यकलावंताला दोन तास काम केलं की ठरलेलं मानधन मिळतं. मालिकेतल्या कलाकाराला दिवस भरला की त्याची 'हजेरी' लागते. यात त्याला दिवसभर सतत कष्ट करायचे असतातच असं नाही. परिणामी, दहा दिवस काम करून एका कलाकाराला जे मानधन मिळतं, तेच मानधन मिळवायला इतर क्षेत्रात ढोबळमानाने महिनाभर किमान 8 तास काम करावं लागतं. काम छोटं वा मोठं हा मुद्दा इथे नाही. केवळ 'पैसे मिळवणे' यापुरतंच या तुलनेकडे बघावं. म्हणून कलाकार आपल्या क्षेत्रातच काम करण्याला प्राधान्य देतात. याच सवयीचा मोठा फटका कलाकारांना बसत असावा. समीर शर्माच्या मृत्यूने पुन्हा एकदा या 67 टक्के लोकांचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. दुसरं काम मिळण्याची शक्यता नाही आणि आता वाट पाहाणंही हाती नाही.. यातून आलेला हा गुदमर वाटतो. आता या सगळ्या 67 टक्क्यांचा धीर सुटू लागलाय की काय असं वाटून जातं. सांगताही येत नाही.. सहनही होत नाही अशी स्थिती आली की मग 'एकच' पर्याय हाती असल्यासारखं वाटू लागतो. असं वाटणं.. खात्रीत बदलण्यापूर्वीच अनलॉक इंडस्ट्रीसाठीचं दुसरं पाऊल टाकायला हवं. तर कदाचित पुन्हा आशा पल्लवीत होतील.. पुन्हा जगणं महत्वाचं वाटेल.सौमित्र पोटे यांचे आणखी काही ब्लॉग
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
भविष्य
निवडणूक
Advertisement