प्रणिती ताईंची गाडी फोडण्याआधी तुझी गाडी फोडतो; काँग्रेसच्या युवक नेत्याचा इशारा; मविआत मोठी बिघाडी
काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर दक्षिणमध्ये काँग्रेसने ठाकरे गटाच्या अमर पाटील यांच्या ऐवजी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
सोलापूर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोलापूर मतदारसंघात जाहीर सभा घेत प्रणिती शिंदेंना मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भूमिका घेत महाविकास आघाडीतील शिवसेना उमेदवार अमर पाटील यांच्याऐवजी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. त्यावरुन, काँग्रेस आणि शिवसेनेत चांगलीच जुंपल्याचा पाहायला मिळत आहे. येथील मतदारसंघातील हा वाद आणखी चिघळताना दिसून येतो. कारण, शिवसेना उपनेते शरद कोळी (Sharad Koli) यांनी प्रणिती शिंदेंवर सडकून टीका केल्यानंतर आता काँग्रेसनेही पलटवार केला आहे. काँग्रेसचे युवक शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांनी शरद कोळी यांची गाडी फोडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे, सोलापूर दक्षिणच्या जागेवरुन महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर दक्षिणमध्ये काँग्रेसने ठाकरे गटाच्या अमर पाटील यांच्या ऐवजी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी या दोन्ही काँग्रेस नेत्यांवर सडकून टीका केली आहे. शरद कोळी यांनी प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम असल्याचा आरोप केला आहे. प्रणिती शिंदेंनी भाजपसोबत आतून हातमिळवणी केली. प्रणिती शिंदे या भाजपचा प्रचार करतात आणि त्यांनी भाजपसोबत आतून हातमिळवणी केली आहे. मात्र, शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी आहे, यापुढे तुम्हाला खासदारकी मिळणार नाही, असा इशाराही शरद कोळी यांनी दिला आहे. सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी सोलापूरचा विकास केला नाही. शिंदे कुटुंबाने आमचे आभार मानणे ऐवजी पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. ही माणसं धोकेबाज निघाली, गद्दाराकडून काय अपेक्षा करणार? असा हल्लाबोल त्यांनी केला. आता, काँग्रेसकडूनही शरद कोळी यांच्यावर पलटवार करण्यात आला आहे.
काँग्रेसकडून गाडी फोडण्याचा इशारा
सोलापुरात शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वाद टोकाला गेला आहे. शरद कोळींच्या ऑफिससमोर जाऊन युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षानेही इशारा दिला आहे. प्रणिती ताईंची गाडी फोडण्याआधी तुझी गाडी फोडतो असे काँग्रेसच्या युवक नेत्याने म्हटलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींनी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन केले होते, काल केलेल्या आंदोलनानंतर आज युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक पाहायला मिळत आहेत. तसेच, शरद कोळीची गाडी ज्या दिवशी ऑफिससमोर थांबेल, त्या दिवशी ती गाडी फोडणार, असा इशाराच काँग्रेसने दिला आहे.