एक्स्प्लोर
२०१७, तू येच. तुला दाखवतो!

ते ना आमचे एक मेघराज सर म्हणून एक आहेत.
ते मला म्हणाले की तू छान लिहीतोस.
मला खरंच खूप भारीबिरी वाटलं.. वजन ४०० ग्रॅमने वाढल्यासारखं झालं एकदम.
छाती ताणली गेली. मग मी लाडीक हसलो. किंचित लाजलो.
पुढं म्हणाले,'..पण किती ते अवघड असतं, तुझं लिहीलेलं!
थोडं सोप्प लिहीत जा.'
मग अचानक ४ किलोनं वजन कमी झाल्यानं अशक्तपणा आला.
तेव्हा मी पण खोटं बोल्लो.
'नवीन वर्षासाठी एकदम सोप्पं लिहीलंय…' मी थाप मारली.
लिहीलं तर काहीच नव्हतं. पण असं वाटलं की हेच लिहायला पाहिजे.
मेघराज सर त्यांच्या स्टाईलमध्ये 'पाठव पाठव' म्हणाले…
मी ही माझ्या स्टाईलमध्ये 'पाठवतो पाठवतो' केलं.
वर्ष सरलं. खरंच संपलं. २०१७ आलं.
इथपर्यंत वाचणाऱ्यांना शुभेच्छा… हैप्पी न्यू इअर.
२०१७चा पहिला दिवस सुरु होण्याच्या आधी हे लिहीतोय.
सरतेशेवटी आजचा पहिला दिवस आहे म्हणून थोडा उगाचपणा केलाय.
वर्ष म्हटलं की मला शाळेतले दिवस आठवतात.
इमॅजिन करा.. शाळा, बैंच, आणि एक साडीतल्या बाई. फळ्यावर काहीतरी लिहीणाऱ्या.
मागच्या बाकावर एक मुलगा बसलाय, नापास झालेल्या पोरांमध्ये. तो मुलगा मीचंय असं समजा.
शाळेत असताना माझा पहिल्या १० मध्ये नंबर यायचा.
पण पहिला कधीच नाही यायचा. नापास झालेली पोरं
माझे लगेच मित्र बनायचे. मी त्यांच्यातच बसायचो.
शिक्षक मला ओरडाचे. वर्ष वाया जाईल म्हणायचे.
तेव्हापासून आजपर्यंत.. वर्ष वाया गेलं यार, असं फिलिंग दरवर्षी यायचंच.
अजूनही येतंच. यंदाही आलंय.
मेघराज सर म्हणालेत. सोप्प लिहायचं.. ते पुढं लिहीतोय. सॉरी सर.
सर इथून पुढंच वाचा. वरचं नका वाचू. मला खात्रीए तुम्हाला नाही आवडणार.
गेल्या वर्षात हसलो का?
तर हसलो.
गेल्या वर्षात रडलो का?
तर रडलो.
खरं बोललो का?
बोललो.
खोटं बोललो का?
बोललो.
काम केलं का?
केलं.
काम टाळलं का?
हो.
भरपूर झोपलो?
हो. खूपच. जरा अतीच.
पोरिंना चोरून पाहिलं?
स वा ल.
सुख-दुःख असले जड शब्द काही कळत नाहीत.
त्यांचे अर्थही कळत नाही, म्हणून त्यांच्या फंद्यातच पडलो नाही.
जे आलं समोर आलं, त्याला सामोरा गेलो.
जे समोर वाढलं गेलं, ते निमूटपणे खाल्लं.
कधी कुणाच्या अरे ला का रे केलं? नाही जमलं.
गेल्या वर्षात काही नवीन केलं का?
एक मिनीट हा थोडा सिरियस प्रश्नंय.
हां… तर उत्तर सुचलै.
तर नवीन वगैरे असं काही नसतं, असं एकदा 'ते हे' बोलले होते.
'ते हे' नेमकं कोण बोलले होते, ते सुद्धा आठवावंस वाटत नाहीय.
जाऊदे.
'नवीन वगैरे सगळं अंधश्रद्धा असतात', 'ते हे' म्हणे.
हां म्हणजे बघा नं, गेल्या वर्षी केलेला थर्टी फर्स्ट आणि यंदाचा.. काही फरक आहे का?
आता म्हणाल आहे ना. एका संकदानं लेट सुरु झालंय, यंदाचं वर्ष.
यंदा दारु सोडली.
यंदा वजन वाढवायचं होतं ते कमी झालं. वजन कमी करायचं होतं ते अजूनच वाढलं.
स्वतःचं काहीतरी करुन दाखवणार होतो, पण दुसऱ्यालाच स्वतःच मानलं..
यंदा कर्तव्य होतं… किंवा यंदा फक्त धंदा करणार होतो.. पण आणि बीण,
असं खूप खूप आठवून गेलं असेल. नसेल..
तर ते काही नवीन नाही, असं 'ते हे' बोलले. आता 'ते हे' म्हणजे कोणतरी आहेत. रादर असतातच.
थोडंसं इमाजिन करा नं.. प्लीज..
मी तर 'ते हे' जे कोणी आहेत, त्यांचं ऐकूनच घेतलं नाही. म्हणजे संकल्प वगैरे करुच नयेत का लोकांनी?
याला काय अर्थए?
मग.. यंदा काय नवीन केलं?
आईबाबांशी भांडण?
दरवर्षी कसलं.. रोजचंय!
कुणावर ओरडलो?
नाही नाही.. ओरडलो की!
चिडचिडेपणा केला?
बस का भावा, केला नं!
स्वतःलाच फसवलं?
अय्यो..हम्म्म!
मनाविरुद्ध निर्णय घेतले?
बापरे..हो की..
पगार वाढला?
खूपच पर्सनल होतंय का?
पोच वाढली?
प्रोफेशनल होतंय नं?
बुद्धी वाढली?
आयक्यूवरच आलो ना सरळ?
ज्ञान वाढलं?
…काय रे देवा!
आपल्या माणसांना जेवढा वेळ दिला पाहिजे तेवढा दिला?
काहीतरीच हं.. उगाच!!
स्वतःला वेळ दिला?
आईशप्पथ.. हो की!
नाती जोडली?
हम्म्म
नाती टिकवली?
हम्म्म्
उगाचच हसलो? …हो हो
उगाचच रडलो?
उम्म्म.. आठवावं लागेल यार
उगागच भटकलो?
स वा ल
वेड्यासारखे वागलो?
नेहमीच वागतो.
मूर्खपणा केला?
येस...रोज
शहाणपणा केला?
कधी नाही करत?
किंचाळलो?..
किंचाळायचंय.. पण कसं किंचाळणार…?
शिवी दिली?
खरं नाही बोललं तरी चालतं नं कधी कधी?
शिवी खाल्ली?
खरं लपवल्यानं पाप नाही लागत ना?
प्रश्न
प्रश्न
प्रश्न
प्रश्न
अजून प्रश्न
खूप प्रश्न
प्रश्नच प्रश्न
तर हे प्रश्न वर्षाअखेरीला पडत नाही.
वर्ष संपलं की हातात काही उरत नाही.
फारफार तर त्या वर्षी असं केलं होतं आणि यावर्षी असं केलं, एवढंच उरतं ना?
म्हणून वर्ष सोप्प आणि सिंपलीफाय करायला पाहिजे.
वर्ष आज आहे. आत्ता आहे. या क्षणी.
रोज थर्टी फस्ट नसतो, म्हणून पिणारे ही आहेत.
आणि थर्टी फस्ट पासून सोडली, असं म्हणून रोज पिऊन पाजणारे ही आहेतच.
एकच्युअली आज आहे. आत्ता आहे. बस्सं.
सगळं करायचंय.
थोडं हसायचं. थोडं हसावायचंही आहे.
डोळे पुसायचे आहेतच. पण डोळे पाणावले नाहीत, तर सर्कल पूर्ण कसं होईल?
मनासारखं वागायचंय. आणि मनाचंच ऐकायचंय.
सोबत मेंदूला थोडी चालना द्यायचीय.
बॅटरी डिस्चार्ज झाली असेल. चार्जिंग पोर्टेबलने द्या किंवा प्लग चार्चरने.
पुन्हा चार्जडप व्हायचंय… बॅटरी डिस्चार्च करण्यासाठी.
हसायचंय.. पुन्हा रडण्यासाठी.
रडायचंय.. पुन्हा लढण्यासाठी.
त्या शाळेतल्या बाई साडी घातलेल्या…
कालपरवा दिसल्या होत्या, नापास झालेल्या एका मित्राच्या लग्नात
मी ओळखलं नाही. वनपीसमध्ये होत्या.
त्यांनी लांबूनच हाक दिली...
'खूप बदल्लास रे, तू. ओळखलंच नाही मी'..म्हणाल्या.
मी मनातल्या मनातच 'तुम्ही सुद्धा' असं म्हणत, त्यांना खालपासून वरपर्यंत पाहिलं.
बोलायची हिम्मतच झाली नाही. त्यांनीच विचारलं, 'मस्त ना?..'
मी मान हलवत 'छान छान..' केलं.
'बदलण्यासाठी गेलेलं वर्ष पुरेसं होतं', बाई म्हणाल्या.
'आता येणाऱ्या वर्षात अजून बदल, म्हणजे पुढच्यावेळी
तेवढाच बोलायला विषय मिळेल', असं बोलून गायब झाल्या.
मी आत्ता लिहिता लिहिता हसलो. का माहितीये?
वरच सगळं पुन्हा माझं मीच वाचलं.
कसलं सोप्प लिहायला शिकलोय नं मी?
हाच तर बदल हवा होता, नव्या वर्षासाठी.
थॅक्यू वनपीस मधल्या बाई.
थॅक्यू मेघराज सर.
थॅक्यू २०१६.
2017 अनेक संकटं, प्रसंग, आनंद-दुःख घेऊन तुमच्या समोर येणार आहे..
त्याच्याशी आम्हाला काहीही फरक पडत नाही..
नाही घाबरत तुला २०१७. तू येच. तुला दाखवतो, इंगा.
येस आय एम रेडी.
bdw कंटाळला असाल. पण इतकं वाचलं असेलच,
तर आता मला हैप्पी न्यू इअर करायला हरकत नाहीए.
१.०१.२०१७
सिद्धेश सावंत
View More
























