(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BLOG | जरा याद करो कुर्बानी!
राष्ट्रीय डॉक्टर दिन अनेकजण डॉक्टरांना शुभेच्छा देतील. त्यांचे गोडवे गातील. त्यांनी केलेल्या कार्याची दखल म्हणून काही ठिकाणी त्यांचे सत्कार आणि स्वागत होईल. काही जण त्यांना देव्हाऱ्यात नेऊन देवाची उपमा देतील. मात्र, त्यांचा हा कौतुक सोहळा एका दिवसापुरताच मर्यादित असल्याचा साक्षात्कार आजपर्यंत भारतातील अनेक डॉक्टरांना आतापर्यंत झालेला आहे. गेली अनेक वर्ष आणि विशेष म्हणजे मागच्या कोरोना काळातील सव्वा वर्षापेक्षा अधिक काळात डॉक्टरांना मारहाण आणि शिवीगाळ करण्याच्या घटनेत मोठी वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. या कोरोनाच्या काळातील पहिल्या लाटेत तर काही डॉक्टर आणि वैद्यकीय सहाय्यकांना वाळीत टाकण्याच्या घटना या देशात घडल्या आहेत, तर काहींना शेवटी 'अंत्यविधीसाठी' जागा देण्यावरून गोंधळ घालण्यात आला होता.
या आणि देशातील अनेक डॉक्टरांनी कोरोना काळात प्राणाची बाजी लावून नागरिकांवर यशस्वी उपचार केले आहेत. आज या वैश्विक महामारीच्या काळात मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी जात आहे. तसेच या काळात या आजाराचा संभाव्य धोका माहिती असूनही केवळ हा पेशा स्वीकारला आहे म्हणून अनेकांनी रात्र-दिवस काम केले, हे कर्तव्य बजावत असताना देशातील जवळपास 1500 पेक्षा अधिक डॉक्टरांना आपले प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे यंदाचा डॉक्टर दिवस त्या शहिद डॉक्टरांची आठवण करीत त्यांना मनाचा मुजरा करीत त्याच्या कुटुंबियांच्या प्रति भावना व्यक्त करण्याचा आहे.
येत्या काळात भविष्यात जेव्हा केव्हा कोरोनाचा इतिहास लिहिला जाईल त्यामध्ये डॉक्टरआणि आरोग्य कर्मचाऱ्याच्या हौतात्म्यस विनम्र अभिवादन केल्याशिवाय तो पूर्णच होऊ शकत नाही. जिवंतपणी केलेल्या त्यांच्या सेवेचे कौतुक करता येत नसेल तर किमान मृत्यू पश्चात या शाब्दिक वेदना तर देता कामा नये. तसेच सध्या आपल्यासाठी जे डॉक्टर कार्यरत आहेत, त्यांना देवपण नाही दिले तरी चालेल पण माणुसकीची वागणूक नक्कीच देता येत येईल अशी इच्छा बाळगण्यास काही हरकत नाही.
एका बाजूला डॉक्टर कमी होत आहे, म्हणून ओरड होते तर दुसऱ्या बाजूला डॉक्टरांना कोरोनाच्या काळात कर्तव्य बजावत असताना प्राण गमवावे लागले. एक डॉक्टर तयार होण्यासाठी फार मोठा कालावधी लागतो. या अशा डॉक्टरांना काम करण्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करून देणे ही शासनाची आणि नागरिकांची जबाबदारी आहे. आज अनेक डॉक्टरांवर रुग्णाच्या नातेवाईकांकडून हल्ले होत आहे, त्यांना धमक्या दिल्या जात आहे. त्यामुळे डॉक्टरांचे मनोबल खच्चीकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्याच्या या वैश्विक महामारीच्या काळात डॉक्टर क्षेत्रातील सर्वचजण (ऍलोपॅथी, युनानी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी) आपल्याला अवगत असलेल्या वैद्यकीय ज्ञानाचा आणि कुशल बौद्धिकतेचा वापर करून रुग्णांना इमाने इतबारे उपचार देत आहेत. काही महिन्यापूर्वी या कोरोना काळात जेव्हा डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी रुग्णाच्या वस्त्यांमध्ये तपासणी करीत जात असताना त्यांना काही नागरिकांनी शिवीगाळ केली होती, काहींना वेळ प्रसंगी मारहाणही झाली. त्यांनी या गोष्टीचा निषेध केला. मात्र, त्यांचं काम बंद नाही केले. ते अविरतपणे संघर्ष करत सगळ्या परिस्थितीचा सामना करत आपली सेवा देत राहिले. हा लेख लिहिण्याचा हेतू डॉक्टरांचे कौतुक करण्याचा नसून वास्तवात त्यांनी ह्या समाजाला जे योगदान दिले आहे तो मांडण्याचा छोटासा प्रयत्न आहे.
अशी अनेक उदाहरणे देता येतील, डॉक्टरांनी खरोखरच खस्ता खाऊन, वेदना सहन करून वेळ प्रसंगी जीव घालून रुग्णांचे प्राण वाचविले आहेत. एप्रिल महिन्यात देशाच्या विविध प्रांतातील तीन डॉक्टर आपले कर्तव्य बजावत असताना धारातीर्थ झाले. रुग्णांना उपचार देत असताना त्यांना या रोगाची लागण झाली असून त्यांचे निधन झाले. मात्र, या तीन डॉक्टरांच्या अंत्यविधीला समाजातील काही समाजकंटकांनी अडथळे निर्माण केले. हे तीनही डॉक्टर देशातील विविध भागातील होते. आंध्रप्रदेश येथील डॉ लक्ष्मीनारायण रेड्डी (60), तामिळनाडू येथील 55 वर्षीच्या न्यूरोसर्जन डॉ. सिमॉन हर्क्युलस, मेघालय येथील 69 वर्षीय डॉ. जॉन एल सायलो रायनाथथिंग. पोलिसाची मदत घेऊन त्यांचे विधी पार पाडण्यात आले ही घटना केवळ निंदनीय नसून या घूर्णस्पद कृत्याचा निषेध समाजातील सर्वांनीच करायला हवा.
इंडियन मेडिकल असोसिएशन ही भारतातील डॉक्टरांची शिखर संस्था, या असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर सांगतात की, "ह्या कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात डॉक्टर रुग्णांना उपचार देताना मरण पावले. त्यांना आमची संघटना शहिदांचा दर्जा द्या म्हणून अनेक दिवस मागणी करीत आहेत. शिवाय त्याच्या करीत जो 50 लाखांचा विमा जाहीर केला होता तो या मृत्युमुखी पडलेल्या डॉक्टरांच्या कुटुंबियांना लवकरात लवकर देण्यात यावा. आमच्या संघटनेतर्फे आम्ही कर्तव्य बजावत असताना मृत्युमुखी पडलेल्या डॉक्टरांची यादी बनविली आहे त्यानुसार, कोरोनाच्या पहिल्या लाटेत 748 डॉक्टर मृत्युमुखी पडले तर दुसऱ्या लाटेत 801 डॉक्टर मृत्युमुखी पडले आहेत. सध्याच्या घडीला दुसऱ्या लाटेत सर्वाधिक दिल्लीत 128 तर बिहार येथील 115 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे तर तिसऱ्या क्रमांकांवर उत्तर प्रदेशातील 79 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात 23 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे."
ते पुढे असे सांगतात की, नागरिकांनी डॉक्टरवर जे हल्ले करतात ते तात्काळ थांबविले पाहिजे. नागरिकांकडून माणूस म्हणून डॉक्टरांना वागणूक मिळणे अपेक्षित आहे. त्यांना सुखुरुपपणे काम करू द्यावे. त्याशिवाय आरोग्य व्यवस्थेवरील खर्च मोठ्या प्रमाणत वाढवून नागरिकांना स्वस्त दरात चांगले उपचार मिळण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केले पाहिजे. तसेच घटनेत 'राईट टू हेल्थ' याचा अंतर्भाव करणे गरजेचे आहे. तसेच डॉक्टरांच्या हल्ल्याविरोधात देशपातळीवर एक मजबूत कायदा तयार केला गेला पाहिजे."
गेल्या वर्षीचे एक बोलके उदाहरण आहे. सुरत येथील 37 वर्षीय भूलतज्ज्ञ डॉ. संकेत मेहता जेव्हा स्वतः कोरोनाने बाधित होऊन अति दक्षता विभागात (आय सी यू ) उपचार घेत असताना, अचानकपणे 71 वर्षाचे गृहस्थ आयसीयूमध्ये दाखल झाले आणि त्यांना उपचार करण्याकरिता व्हेंटिलेटर ठेवणे गरजेचे होते त्यासाठी उपचाराचाभाग म्हणून ट्यूब टाकणे गरजेचे होते. मात्र, डॉक्टर येण्यास उशीर लागत असल्याचे समजताच डॉ. मेहता यांनी स्वतःचे ऑक्सिजनचे मास्क काढून बाजूला ठेवत, स्वतःच्या तब्बेतीचा विचार न करता या रुग्णामध्ये ट्यूब टाकण्याचे काम केले. त्यानंतर पुन्हा ते स्वतःच्या बेडवर जाऊन उपचार घेत होते. त्यांच्या या कामांची सर्वत्र प्रशंसा होत होती. मात्र, सध्या ते कोरोनापासून बरे झाले असले तरी, या कोरोनाचा या संसर्गाचा त्यांच्या फुफ्फुसांवर भयंकर परिणाम झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर 'फुफ्फुसांचे प्रत्यारोपण' करावे लागण्याची वेळ आली होती. त्याकरीता त्यांना चेन्नईच्या रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्याकरिता त्यांना 1 कोटी रुपये इतका खर्च येणार असून त्याची जुळवाजुळव करण्यासाठी सुरत येथील इतर डॉक्टर सहकार्यांनी मदत निधी (क्राऊडफंडिंग) गोळा केला होता आणि तो डॉ. मेहता यांच्या पत्नीच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याचे आवाहन त्यावेळी करण्यात आले होते. डॉ. मेहता सध्या सर्व उपचार घेऊन घरी आले असून ते आता व्यवस्थित आहे. त्यांच्यावर 'फुफ्फुसांचे प्रत्यारोपण करण्याची वेळ आली नाही आणि ते औषध उपचारानेच बरे झाले.
खरं तर प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू हा तितकाच महत्वाचा. प्रत्येक मृत्यूमागे एक कुटुंब असते, त्याची एक आपली सामाजिक व्यवस्था असते. कोरोना सोबत सुरु असलेल्या या युद्धात अनेक योध्यांना युद्ध लढत असताना मृत्यू झाला आहे. मग ते डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, आशा वर्कर, आरोग्य सहाय्यक, पोलीस दलातील कर्मचारी, राज्य परिवहन महामंडळाचे आणि बी.ई.एस.टी चे चालक, वाहक आणि अन्य कर्मचारी, या ठिकणी काम करणारे आणि तसेच अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्यांना, अनेकांना आपले कर्तव्य पार पडताना या आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. यापैकी अनेकजण उपचार घेऊन बरे होऊन पुन्हा कामावर रुजूही झाले आहेत. त्याच ठिकाणी त्याच व्यवस्थेत ज्या ठिकाणी त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता. केवळ इतर नागरिकांना त्यांच्या सर्व सेवा सुविधा व्यवस्थित मिळत राहाव्यात म्हणून. त्यांना घरी बसण्याचा 'पर्याय' नसतो कारण त्यांचे कामावर जाणे अनिवार्य आणि अत्यंत गरजेचे असते. हे सगळं सुरु आहे सर्व सामान्य नागरिक सुरक्षित आणि निरोगी राहावेत म्हणून. मात्र या सगळ्यात प्रक्रियेत आपण सामान्य नागरिक म्हणून आपण आपली जबाबदारी पाळतोय का? हा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.
राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणजे डॉक्टरांना शुभेच्छा देण्याचा दिवस. मात्र, या अशा दिवशी त्यांनी रुग्णांसाठी केलेले कष्ट आणि वेळप्रसंगी पत्करले मरण विसरता येणार नाही. त्याचे दुःख, वेदना, हाल नजरेआड करता येणार नाही. या दिनाचे औचित्य साधून सर्वच डॉक्टरांना आरोग्यदायी आयुष्य लाभो ह्या सदिच्छा.
सर्वसामान्य नागरिकांसाठी वेळ प्रसंगी जीव दिलेल्या या 'योद्धयांच बलिदान व्यर्थ' जाऊ द्यायचं नसेल तर आपण शासनाने कोरोनाच्या अनुषंगाने सुरक्षिततेचे आखून दिलेले सर्व नियम पाळून ते या लढत असलेल्या लढ्याला बळ प्राप्त होईल असे कृत्य केले पाहिजे. देश सर्व नागरिकांच्या आरोग्याच्या रक्षणाकरिता आपले सगळे योद्धे काम करीत आहे. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना या लढाईत यश मिळावं यासाठी प्रार्थना करून आपल्या कर्तव्याचे पालन केले पाहिजे. या सर्व योध्यांना मानाचा मुजरा.