राज्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि त्यामुळे होणारे मृत्यू हा अतिचिंतेचा विषय बनला असून ही संख्या थांबविण्याकरिता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ आपआपली मते व्यक्त करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सतत राज्य विशेष कृती दलाच्या तज्ञाशी या संदर्भात चर्चा करून नवनवीन उपाय योजना राबविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यातच आता उत्तर प्रदेशात राबविण्यात येणाऱ्या 'दस्तक' उपक्रमाची माहिती पुढे आली असून या धर्तीवर राज्यात घरोघरी जाऊन तपासणी करण्याचा मार्ग धुंडाळला जात आहे. आरोग्य व्यवस्थेच्या सोबतीला लोकप्रतिनिधीचा सहभाग यामध्ये असणार असून कोरोनाचा शोध घेण्यासाठी प्रत्येच्या घरी जाण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. लोकसहभाग आणि आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातून या आजारसंदर्भात जनजागृती निर्माण करून अधिकच्या चाचण्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हा 'दस्तक' उपक्रम कशापद्धतीने राबविला जातो याची जवळून माहिती असणारे आणि काम करणारे डॉक्टर सचिन गुप्ते मूळचे ठाण्याचे असून ते सध्या उत्तरप्रदेशात लखनऊ शहरात  कार्यरत आहेत. त्यांच्यामते अशा पद्धतीने हा उपक्रम राबविल्यास कोरोनाचा प्रसार थांबविण्यास मदत होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे.


गुरुवारी राज्यात रुग्णवाढीचा उचांक नोंदविला गेला, दिवसभरात 18 हजार 105 नव्या रुग्णांची भर पडली. पुण्यात कोरोनाबाधित रुग्णाचे हाल होत असतानाच राज्यातील ग्रामीण भागात आता ही रुग्णसंख्या वाढत चालली आहे. काही ठिकाणी या आजाराच्या उपचारासाठी लागणारी महत्वाची औषधे मिळत नसल्याच्या तक्रारी अजूनही सुरूच आहेत. अनलॉक केल्यानंतर रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्याता यापूर्वीच तज्ञांनी व्यक्त केली होती. मात्र शिथिलता देताना या गोष्टींचा विचार करून त्या तोडीने आरोग्याच्या व्यवस्था उभी करण्याची नितांत गरज आहे. आरोग्य व्यवस्था आणि त्यामध्ये काम करणारे सर्वजण एकदिलाने काम करीत आहे. मात्र अनपेक्षितपणे मोठ्या संख्येने निर्माण होणाऱ्या रुग्णांच्या आरोग्याचं व्यवस्थापन करण्यास सध्याची आरोग्य व्यवस्था तोकडी पडत आहे. त्यामुळे शासनातर्फे तात्पुरती रुग्णालये (जंबो फॅसिलिटी) उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य केले पाहिजे, कोणासही आजाराची काही लक्षणे आढळल्यास त्यांनी अंगावर काढत बसू नये तात्काळ जवळच्या दवाखान्यात जाऊन त्यावर उपचार करून घेतले पाहिजे असे प्रशासनतर्फे वारंवार सांगण्यात येत आहे. मुंबईतील रुग्णसंख्या बऱ्यापैकी आटोक्यात होती मात्र त्यामध्येही अचानकपणे वाढ झाली आहे. या सणासुदीच्या दिवसात नागरिकांनी सर्व नियमांचे पालन केले पाहिजे अन्यथा धोके संभवतात, कारण कोरोनाचे संकट अजून टळलेले नाही, असे तज्ञांनी सांगितले आहे.


राज्य कोरोना विशेष कृती दलाचे प्रमुख डॉ संजय ओक सांगतात कि, "काही दिवसापूर्वीच डॉ सचिन गुप्ते यांनी मुख्यमंत्र्यांना या 'दस्तक' उपक्रमाविषयी माहिती दिली असून हा उपक्रम सुंदर आहे. असा उपक्रम आपण आपल्या राज्यात राबवू शकतो. सध्या पुणे येथील रुग्णसंख्या कमी करण्यावर लक्ष देत आहोत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम राज्यात राबविला जाईल. या उपक्रमात घरोघरी जाऊन तपासण्या करणे हा हेतू आहे, आणि त्यामुळे नक्कीच या कोरोनाला थांबविण्यात यश येऊ शकते."


डॉ सचिन गुप्ते, यांनी त्यांचं वैद्यकीय पदवी शिक्षण मुंबईच्या ग्रांट मेडिकल कॉलेज, सर जे जे रुग्णालय येथे केले असून पदव्युत्तर शिक्षण जनऔषध वैद्यकशास्त्र (प्रिव्हेंटिव्ह आणि सोशल मेडिसिन) या विषयात नायर रुग्णालयांतून पूर्ण केले आहे. तसेच त्यांनी परदेशात जाऊन मास्टर इन पब्लिक हेल्थ या विषयांचे शिक्षण घेतले आहे. गणपतीच्या काळात ज्यावेळी ते ठाणे येथील घरी आले होते. त्यावेळी त्यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायांविषयी चर्चा झाली. त्यावेळी त्यांनी उत्तर प्रदेश येथे आरोग्याशी निगडित राबविण्यात येणाऱ्या 'दस्तक' या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यावेळी  राज्यातील कोरोना विशेष कृती दलाशी संबंधित डॉक्टर उपस्थित होते. डॉ गुप्ते सध्या 'पाथ' या बिगर सरकारी आंतराष्ट्रीय आरोग्य क्षेत्रात करणाऱ्या संस्थेत काम करत असून उत्तर प्रदेश राज्याचे प्रमुख म्हणून काम पाहत आहे. या राज्यात, अन्य संस्थांबरोबर आरोग्याशी निगडित विविध कार्यक्रम राबवून कोणत्याही आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे ते काम येथे पाहत आहेत.


पाथ (PATH - प्रोग्राम फॉर अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी इन हेल्थ) ही संस्था आंतराष्ट्रीय पातळीवर विविध देशात आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे.  दस्तक हा उपक्रम विशेष करून तीव्र मेंदूज्वर किंवा मेंदूला येणारी सूज (एन्सेफलायटीस) या आजाराचा समूळ नायनाट  करण्यासाठी सुरु करण्यात असून नागरिकांच्या दारोदारी जाऊन त्यांना या आजाराविषयी माहिती देणे आणि त्यांच्यामध्ये आजाराविषयी जजजगृती करणे. त्यांना याच्या उपचारबाबत आणि उपचार कुठे, कसे मिळतील याची सविस्तर माहिती देणे हा उद्देश आहे.


याप्रकरणी डॉ सचिन गुप्ते यांनी लखनऊ येथून फोन वरून 'एबीपी माझा डिजिटल' शी सविस्तर बोलताना सांगितले कि, "दस्तक हा उत्तर प्रदेश सरकारचा उपक्रम असून आम्ही आणि युनिसेफ, जागतिक आरोग्य परिषद या संस्था त्यांच्या या उपक्रमास सहकार्य करत आहोत. हा कार्यक्रम मूळ इतर आजाराच्या उद्देशाने आखण्यात आला असून त्यांची कार्यपद्धती कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारात वापरल्यास कोरोनाला थांबविण्यात किंवा त्याचा प्रसार रोखण्यास  मदत होऊ शकते या उद्देशाने मी ही माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली.  दस्तक हे हिंदी नाव आहे, त्याला वेगळही  नाव देता येईल. महाराष्ट्रात अशा पद्धतीचा उपक्रम राबविताना आरोग्य सेवक किंवा आशा सेविका यांनी नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांना या आजारासंदर्भातील सविस्तर माहिती, या आजारापासून कसे वाचता येईल, कोणत्या उपचारपद्धती सध्या उपलब्ध आहे. विनाकारण घाबरण्याची कोणतीही गरज नसून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे. तसेच या आजारातील संभाव्य त्यात सर्व गोष्टीशी नागरिकंना अवगत करणे. त्यांच्या मनातील शंकेचे निरसन करणे. त्याचप्रमाणे ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि त्यासुमार उपचार करणे ह्या गोष्टीचा अवलंब केला पाहिजे. यामुळे आपणस रुग्ण सापडण्यास मदत होईल आणि वेळच्यावेळी उपचार दिल्याने तो रुग्ण आणखी काही लोकांना बाधित करणार नाही."


ते पुढे असे सांगतात कि, "काही लोकांना या आजाराची कोणतेही लक्षणे नसतात परंतु ते काही वेळेला या आजारी रुग्णाच्या संपर्कात आल्याची शक्यता असते अशा लोकांनी स्वतःला समाजापासून विलगीकरण करून घ्यावे आणि जमल्यास चाचणी करून घ्यावी. विशेष महत्वाचे म्हणजे या आजाराशी मुकाबला करण्यासाठी पायभूत सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी नागरिकांनी सुरक्षिततेचे नियम पाळले तर कोरोनाला आपण हरवू शकतो. तसेच ज्यापद्धतीने आपल्याकडे एचआयव्हीचा आजाराचा प्रसार झाला होता त्यावेळी दूरदर्शन वाहिन्यांवर त्या आजाराची जनजागृती करणारी जाहिरात करण्यात आली होती. त्या स्वरूपाची जाहिरात कोरोनासंदर्भातील करून ती प्रसारित केली पाहिजे.              


राज्यातील सर्व यंत्रणा कोरोनाला थोपविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे. यामध्ये नागरिकांनी सहभाग नोंदविण्याची गरज आहे. तो सहभाग नोंदवायचा म्हणजे त्यांनी विनाकारण घराबाहेर पडू नये आणि पडलात तर तोंडावर व्यवस्थित मास्क लावावा. सोशल डिस्टंसिंगचे पालन व्यवस्थित करावे. सॅनिटायझरचा किंवा हात धुण्यासाठी साबणाचा वापर करावा तसेच जेष्ठ नागरिकांची आणि लहान मुलांची काळजी घ्यावी या गोष्टी नागरिकांकडून अपेक्षित आहे. ज्याप्रमाणे आतापर्यंत सगळेच सण घरात साधेपणाने साजरे केले तसेच करत राहावे. विशेष म्हणजे आता शिथिलतेचा भाग म्हणून ह्या गोष्टी चालू करा, अशी ओरड करण्यापेक्षा शासनाला सहकार्य करा. त्यांनाही सर्वच गोष्टी सुरु करायच्या आहेत, परंतु वेळ काळ बघून ते  निर्णय घेतील अशी अपेक्षा बाळगूया.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग