गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये कोरोना आजाराला घेऊन थोडी अस्वस्थता वाढली आहे. राज्यात जेष्ठासह 45 वर्षांवरील सहव्याधी असणाऱ्यांसाठी लसीकरण सुरु झाले आहे. जमेल त्या पद्धतीने तांत्रिक गोंधळावर मात करत राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे, मात्र या लसीकरण केंद्रांची संख्या वाढली पाहिजे असा सूर कायम आहे. कारण मागणी अधिक आणि पुरवठा कमी अशी सध्याची परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी लस मिळावी यासाठी झुंबड पाहिला मिळत आहे. लसीकरणासाठी नोंदणी केल्यानंतर हव्या त्या वेळेत लस मिळण्याचे गणित अद्याप मात्र सुटलेले नाही. नागरिक लांबच्या लांब रांगा लावून लस घेत आहे. लसीकरणासाठी उत्साह पाहायला दिसत असून मध्यम आणि उच्चवर्गीय नागरिक लसीकरणाच्या मोहिमेत लक्षणीय स्वरूपात पाहायला मिळत आहे. त्या तुलनेने चाळीतील, झोपडपट्ट्यांमधील वरिष्ठ नागरिक अजून तरी मोठ्या प्रमाणात केंद्रावर जाताना दिसत नाही. त्यांना लस नोंदणी करण्यासाठीची प्रक्रिया कारणीभूत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र त्या वर्गाकडेही प्रशासन लक्ष देईल अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही. कोरोनाच्या या संसर्गजन्य आजराविरोधातील लस ही 'हवी आहे' असणाऱ्यांचा आकडा तुलनेने मोठा आहे. लसवंत होण्याकरिता घ्यावी लागणारी धडपड जर प्रशासनाने कमी केली तर या मोहिमेला मोठ्या प्रमाणात यश मिळाल्याशिवाय राहणार नाही.


16 जानेवारीला लसीकरण मोहिमेला सुरुवात झाल्यापासून राज्यात आतापर्यंत 14 लाख 80 हजार 926 लाभार्थ्यांनी लस घेतली आहे, अजूनही प्रशासनाला लसीकरणाचा मोठा टप्पा गाठायचा आहे. ज्या हेल्थ वर्कर यांनी पहिल्या दिवशी डोस घेतला होता आणि दुसरा बूस्टर डोस त्यांनी 28 दिवसानंतर घेतला असेल अशा व्यक्तींच्या लसीचे दोन डोस घेऊन जवळपास 47 दिवस झाले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये अँटीबॉडीज निर्माण झाल्या असतील किंवा त्या प्रक्रियेला सुरुवात झाली असेल. याबाबत लवकरच अभ्यास करणे गरजेचे आहे आणि त्यामुळे लस किती परिणामकारक आहे, याची माहिती मिळू शकेल. तसेच लसीकरण दोन टप्प्यात करावे, त्याचप्रमाणे ते 24 तास करावे का? या सर्व गोष्टींवर विचार विनिमय सुरु आहे. सध्या तरी सकाळ ते संध्याकाळ या वेळेत लसीकरण सुरु आहे. खासगी रुग्णलयातही लसीकरणसाठी सुरुवात करण्यात आल्याने महापालिका आणि शासकीय रुग्णालयावरील ताण कमी होण्यास मदत होईल. खासगी रुग्णलयात मात्र लसीच्या एका डोससाठी 250 रुपये इतके शुल्क निर्धारित करण्यात आले आहे. मात्र असा एक वर्ग आहे की, तो ती रक्कम भरण्यास सक्षम आहे. येत्या काळात ज्या पद्धतीने राज्यातील वरिष्ठ राजकारणी लस घेत आहेत. त्याचे अनुकरण करणाऱ्याची संख्या मोठी असल्याने यामुळे नागरिकांमध्ये लसीबाबत आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे लसीकरणाचे केंद्र आगामी काळात वाढवावी लागतील.


BLOG | मुंबईचा 'कोरोना'!


मुंबई महानगर पालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, "सध्या शहरात लसीकरण मोहीम व्यवस्थित सुरु आहे, अजूनपर्यंत कोणत्याही तक्रारी आलेल्या नाही. ज्या काही समस्या उद्भवत आहेत, त्यावर उत्तरे शोधून मोहीम सुरु आहे. अजूनतरी आम्ही कोणत्या वर्गातील नागरिक जास्त येत आहेत अशी आकडेवारी काढलेली नाही, मात्र जर असे आढळून आले की चाळीतील आणि झोपडपट्ट्यातील नागरिक कमी येत असतील तर भविष्यात त्यांच्यासाठी त्या परिसरात जाऊन जनजागृती करू. त्यांना जर लसीकरणाला घेऊन काही समस्या असतील तर त्याचे निराकारण करू. सध्या तरी पालिकेत सकाळ ते संध्याकाळ या वेळेतच लसीकरण सुरु आहे, जर प्रशासनाने वेळेबाबत काही सूचना केल्या तर ते बदल निश्चित केले जातील."

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी सर जे. जे. रुग्णालयात जाऊन कोवॅक्सीन लसीचा पहिला डोस घेतला, त्याचप्रमाणे गुरुवारी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा लसीचा पहिला डोस घेतला. त्यामुळे हळूहळू जनसामान्यात लसीला घेऊन जे किंतु परंतु होते ते दूर होण्यास नक्कीच मदत होणार आहे. सध्या देशात कोवॅक्सीन आणि कोविशील्ड या लसी दिल्या जात आहे. मात्र बहुतांश नागरिक कोविशील्ड लस घेण्याकडे आपली पसंती व्यक्त करत आहे. मात्र केंद्र सरकारने यापूर्वीच दोन्ही लशी सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचे सांगितले आहे. आरोग्य विभागाच्या 4 मार्च रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार दिवसभरात 75 हजार 452 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यापैकी 73 हजार 350 लाभार्थ्यांना कोविशील्ड या लसीने लसीकरण करण्यात आले. तर 2 हजार 102 लाभार्थ्यांना कोवॅक्सीन या लसीने लसीकरण करण्यात आले. दिवसागणिक लसीकरणाचा आकडा वाढत असून हे चांगले संकेत आहेत. मात्र असे असले तरी ग्रामीण भागात मात्र आजही लस नोंदणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. काहींना जे लसीकरण केंद्र आहे ते त्यांच्या घरापासून खूप दूर आहेत तर काही जणांना नोंदणी करणे जमत नाही. या समस्या फार मोठ्या नसल्या तरी महत्त्वपूर्ण आहेत.


फेब्रुवावरी 26 ला 'लसीकरणाचे सुलभीकरण हवे!' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते. त्यामध्ये कोरोनाविरोधातील लसीकरणाचा दुसरा टप्पा 1 मार्च पासून सुरु होणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली. गेल्या काही दिवसांपासून वाढत असणारी कोरोनाबाधितांची संख्या या पार्श्वभूमीवर लसीकरणाचा दुसरा टप्पा महत्तवपूर्ण असणार आहे. नागरिकांच्या मनात या आजराविषयी भीती आहे, विशेषत: जेष्ठ नागरिक (60 वर्षावरील) आणि सहव्याधी असलेल्या नागरिकांमध्ये या आजराला घेऊन जास्तच अस्वस्थता आहे. वैद्यकीय तज्ञांच्या मते लसीकरण हा एक या आजाराच्या विरोधातील प्रतिबंधात्मक उपाय आहे. त्यामुळे अनेकांना ही लस हवी असणे अपेक्षित आहे. मात्र सार्वजनिक रित्या जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार लसीकरणाची नोंदणी करण्यासाठी जी पद्धत आहे ती सर्वसामान्यसाठी जिकिरीची आहे असे वाटते. प्रत्येक ज्येष्ठ आणि सहव्याधी असलेल्या व्यक्तीला स्वयं-नोंदणी करावी लागणार आहे. ते ती पूर्ण करू शकतीलच अशी आजची व्यवस्था नाही. कारण यामध्ये लाभार्थ्यांना को-विन अॅप पोर्टलवर स्वतःची नोंदणी स्वतः करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे वय पात्रता सिद्ध करण्यासाठी ओळख पत्र म्हणून निवडणूक किंवा आधारकार्डची नोंदणी करावी लागणार आहे. या दोन्ही स्रोतांकडून माहिती घेण्यात येईल आणि वयोगटाबाबतची माहिती जुळल्यानंतरच हे अॅप लाभार्थ्यांची माहिती अपलोड करेल. राष्ट्रीय लसीकरणाच्या मोहिमेत लसीकरणाची प्रक्रिया सुलभ असावी जेणेकरून नागरिकांना लस घेण्यासाठी कुठल्याही तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. मात्र सध्याची प्रक्रिया सर्वसामान्यांना किती जमेल हा एक मोठा प्रश्न आहे.


सध्या तरी लसीकरण मोहिमेला प्रतिसाद चांगला मिळत आहे मात्र एवढ्यावरच थांबून चालणार नाही. कारण लस घेणाऱ्याची संख्या खूप मोठी आहे. शहरी भागात चांगले यश प्राप्त होत असले तरी ग्रामीण भागात लसीकरणासाठी आणखी मेहनत घेण्याची गरज आहे. कारण सध्या तरी या आजाराविरोधात लढण्यासाठी लस हे एकमेव शस्त्र आहे. त्यामुळे नागरिकांना लस तर हवी आहे मात्र ती मिळण्याकरिता आणखी काही प्रक्रिया होऊ शकते याकडे प्रकर्षाने लक्ष देण्याची गरज आहे. केंद्र सरकारने जी नियमावली लसीकरणासाठी आखून दिली आहे त्यांचे पालन करणे त्यांना बंधनकारक आहे. सध्या आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण आहे, त्यामुळे नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करणे अपेक्षित आहे. उगाच त्यांच्याशी हुज्जत घालण्यापेक्षा समस्या निर्माण झाल्यास त्यावर कशा पद्धतीने तोडगा काढता येईल यांच्यावर चर्चा करणे गरजेचे आहे. वैद्यकीय क्षेत्रातील सर्व तज्ञांनी लस घेणे गरजेचे आहे हे यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे नागरिकांनी इतर लोकांची मदत घेऊन लस नोंदणी करता प्रयत्न केले पाहिजे.

संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग :