(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BLOG | आरोग्यसेवेतून राष्ट्रसेवाच...
जेव्हा आरोग्य आणीबाणीच्या काळात भारतातच काय जगभरातील डॉक्टर, परिचारिका, आया, सफाई कर्मचारी , तसेच हॉस्पिटलमधले इतर कर्मचारी घरी जायला निघताना किंवा फ्रेश होताना आपल्या चेहऱ्याकडे बघतात तर अनेक दिवसांपासून लावलेल्या मास्कमुळे पडलेल्या व्रण हे कोणत्याही राष्ट्रभक्तीच्या चिन्हापेक्षा कमी भासत नाही.
जगभरात covid - 19 विषाणूंच सावट दिवसेंदिवस गडद होत आहे. भारतात या व्हायरसला प्रतिबंध घालण्याकरिता विविध राज्यं आपआपल्या पद्धतीने या आलेल्या संकटावर मात करण्याकरिता कडक पावले उचलीत आहेत. पूर्वी शिंकल्यावर 'गॉड ब्लेस यू' म्हणणारी लोकं आता शिंकल्यावर संशयित नजरेने बघू लागलेत. एवढी या व्हायरसची भीती लोकांनी मनात बाळगली आहे. अशा या सगळ्या भीतीदायक वातावरणात प्रत्येक जण आपआपल्या परीने काळजी घेत आहेत. कधीही सॅनिटायझर न वापरणारे नागरिक 5-6 सॅनिटायझरच्या बॉटल्स आपल्या परिवाराच्या सुरक्षेकरिता विकत घेतायत. त्यापेक्षा पुढे जाऊन एन-95 मास्क, सर्जिकल मास्क, दुय्यम दर्जाचे मास्क मिळेल त्या भावात विकत घेऊन कुटुंबातील सदस्यांना कसं सुरक्षित ठेवता येईल याचा पूर्णपणे विचार करताना दिसत आहे.
या सगळ्या स्वयंसुरक्षितेच्या भानगडीत तुमच्या मनात साधा विचार आलाय का? या भयभीत वातावरणात आपल्याला उपचार देणारे डॉक्टर कसे काम करीत असतील. त्यांनाही भीती वाटत असेल ना? एखाद्या रुग्णाचा त्यांना संसर्ग होऊ शकतो. आपल्यापेक्षा तर जास्त त्यांना आजाराच्या दुष्परिणामाची जास्तच माहित असते. परंतु आजतायागत एकाही डॉक्टर्सने, पॅरामेडिकल स्टाफ त्यात परिचारिका, वॉर्ड बॉय आणि अन्य सदस्य जे रुग्णालयात काम करीत असतात, त्या लोकांनी कधीही ट्रीटमेंट नाकारलेली नाही. ते त्यांचं काम इमाने इतबारे करताना दिसत आहेत.
या विषाणूच्या संसर्गाचं गांभीर्य एवढं आहे कि, कधी नव्हे ती सर्वच देशांची अर्थव्यवस्था जमिनीवर आलेली आहे. शेअरबाजारातील सेन्सेक्स कोसळतोय. सख्खे मित्र एकमेकांना भेटल्यावर गळाभेट करताना तर सोडा साधं हस्तांदोलन करताना दिसत नाही. एवढी दहशत या कोरोनामुळे निर्माण झालीय. या विषाणूमुळे सगळ्यांच्याच मनात भीतीचं घर निर्माण आहे. परंतु, या वातावरणात मात्र आपले डॉक्टर्स पेशंटची तपासणी बिनधास्त करताना दिसत आहेत. निश्चितच ते त्यांची काळजी घेतीलच. मात्र कुठल्याही डॉक्टरांनी त्यांचं क्लिनिक बंद केलेलं नाही किंवा हॉस्पिटल मधील रुग्णांना उपचार देण्याचे थांबविले नाही.
काही भाविकांनी तर देवाच्या दरवर्षी भरणाऱ्या जत्रा पुढे ढकलल्या आहेत. तर काही भाविक गर्दीच्या ठिकाणी देवळात जातात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तोंडावर रुमाल किंवा हातावर सॅनिटायझरचा वापर करीत आहेत. त्यांनी तसं केलही पाहिजे त्यात कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही कारण सुरक्षा महत्वाची आहे. मास्क आणि सॅनिटायझरचा मार्केट मध्ये काळाबाजार होत असल्याच्या बातम्या आपण सगळ्यांनी वाचल्या असतीलच परंतु अमुक एका डॉक्टर्सने या काळात आपली कंसल्टंसीचे दर वाढविल्याचे ऐकिवात नाही .
जगभरात कोविड-19 विषाणूमुळे बाधित होऊन हजारोंच्या वर नागरिकांचे मृत्यू होत असताना प्रत्येक देश या विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक पावले उचलीत आहे. अनेक राज्य शाळा बंद, नाट्यगृहे बंद, थिएटर्स बंद करत आहेत. विमान कंपन्या उड्डाण रद्द करतायेत, परदेशी जाण्यास नागरिकांना मज्जाव करीत आहे. विविध सामाजिक उपक्रम, विविध परिषदा ज्यामध्ये गर्दी होऊ शकते असे कार्यक्रम रद्द करून पुढे ढकलीत आहेत आणि वातावरण सुरक्षित कसं ठेवता येईल या संबधी आयोजक उपाययोजना आखत आहे.
या सगळ्यात विशेष बाब म्हणजे, या सर्व कोविड-19 बाधित रुग्णांना शासकीय आणि पालिकेच्या रुग्णालयात उपचार दिले जात आहेत. रुग्णांना विशेष निर्माण केलेल्या विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे. त्या सर्व कक्षाची स्वच्छता करण्याचं काम रुग्णालयातील मामा, मावशी, वॉर्ड बॉय व्यवस्थितपणे करत आहेत. डॉक्टर्स वेळच्यावेळी जाऊन औषधउपचार देत आहेत, त्यांच्या ठरलेल्या प्रमाणे राऊंड्स घेत आहे. चोवीस तास काम करणारा निवासी डॉक्टर्स, रेसिडेंट मेडिकल ऑफिसर्स, वैद्यकीय अधिकारी रुग्णांवर देखरेख करण्याचा काम करीत आहे. तर परिचारिका प्रत्येक कोविड-19 बाधित रुग्णांना गोळ्या देणं , टेम्परेचर घेण्याचं काम चोखपणे पार पडत आहेत.
महाराष्ट्रात सध्याच्या घडीला ज्या रुग्णालयात ह्या कोविड-19 बाधित रुग्णांवर जेथे उपचार सुरु आहेत. तिथं त्यांच्यावर उपचार करणारे सर्वच डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ आणि त्या रुग्णाच्या सानिध्यात विविध कामाच्या निमित्ताने येणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्यांची घालमेल काय होत असेल, खरं तर ती शब्दात मांडणं अवघड आहे. त्या सदस्यांना रात्री झोपताना आपली स्वकियांची जे रोज या आजाराने बाधित असणाऱ्या रुग्णाची सेवा करीत आहे याची भीती वाटत असेल का? कि त्यांनी मन घट्ट केलं असेल या प्रश्नच उत्तर आता तरी माझ्याकडे नाही.
फक्त शासकीयच नाही तर खाजगी रुग्णालयात काम करणारे सर्वच डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ आणि प्रशासकीय काम पाहणारे कशाचीही तमा न बाळगता रुग्णसेवा देण्याचा काम करीत आहेत.राज्यातील आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभाग, विविध महापालिकेतील सर्वच अधिकारी आणि प्रशासन आपआपल्या पद्धतीने युद्धपातळीवर काम करीत आहे, त्यांना आपण सहकार्य केलं तर अशा मोठ्या संकटाना त्यांना लढा देण्यास बळ प्राप्त होईल.
गेली अनेक वर्ष मी आरोग्य पत्रकारितेत काम करीत आहे. त्यामुळे जे दिसलं आणि मला जे योग्य वाटलं ते साध्या पद्धतीने मांडण्याचा येथे प्रयत्न केला आहे. मला निश्चितच माहित आहे की येथे मी वैद्यकीय क्षेत्रातील लोकांची बाजू मांडल्याचा आरोप कुणी करतील, माझी यास कोणतीही हरकत नाही. या काळात काही अनुचित प्रकार तुम्हाला दिसलेही असतील, पण त्या प्रकारांची संख्या नगण्यच असेल असे मी खात्रीशीर सांगू शकतो. ज्यावेळी देशावर अशा पद्धतीचं संकट येत त्यावेळी काही उपाय योजना करण्यात चुका होत असतील पण त्यावर टीका करण्यापेक्षा मार्ग काढण्याच काम हे प्रत्येक नागरिकचं कर्तव्य आहे असा मला वाटते.
जेव्हा आरोग्य आणीबाणीच्या काळात भारतातच काय जगभरातील डॉक्टर, परिचारिका, आया, सफाई कर्मचारी तसेच हॉस्पिटलमधले इतर कर्मचारी घरी जायला निघताना किंवा फ्रेश होताना आपल्या चेहऱ्याकडे बघतात त्यावेळी अनेक दिवसांपासून तोंडाला लावलेल्या मास्कमुळे पडलेले व्रण हे कोणत्याही राष्ट्रभक्तीच्या चिन्हापेक्षा कमी भासत नाही.
टीप - लेखक संतोष आंधळे हे माय मेडिकल मंत्राचे वरिष्ठ संपादक आहेत. या लेखात त्यांनी व्यक्त केलेली मतं ही त्यांची वैयक्तिक मतं आहेत.