राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने आरोग्य व्यवस्थेच्या नाकात दम आणला आहे. राज्यातील विविध भागात कोरोनाच्या रुग्णांचे हाल आता रोजचे झाले आहे. अपुऱ्या आरोग्य सुविधांचा पाढा वाचणे नवीन राहिलेले नाही. मागील चार-पाच महिन्यातील कोरोनाचे गंभीर स्वरूप पाहता भविष्यातील रुग्णसंख्या वाढीचे अनुमान करून अगोदरच मोठया शहरांमध्ये आरोग्यच्या सुविधा निर्माण कराव्या लागणार आहेत. विशेष म्हणजे ऑक्सिजनयुक्त खाटा ,अतिदक्षता विभागातील (व्हेंटिलेटर) खाटाची संख्या वाढविणे अत्यंत गरजेचे झाले आहे. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचे व्यवस्थापन करण्यासाठी युद्धपातळीवर तज्ञ समितीची स्थापन करून तात्काळ निर्णय घ्यावे लागणार आहेत. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील रिक्त पद भरतीची घोषणा सत्यात उतरावी लागणार आहे. वरिष्ठ पदावरील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या काळात किमान रोज आरोग्य व्यवस्थेतील सर्व रुग्णालयांना भेटी देऊन नागरिकांच्या समस्या काय आहेत, ते जाणून तात्काळ कार्यवाही केली पाहिजे अशी वेळ राज्यातील सर्वच जिल्ह्यांवर आलेली आहे. 'अॅम्ब्युलन्स' मिळत नाही म्हणून अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडल्या जात आहेत. एखादी गोष्ट वारंवार होऊं लागली म्हणजे तिच्यांतले स्वारस्य जाऊन त्याच्याकडे दुर्लक्ष होते की, काय अशी वेळ सध्या राज्यावर आली आहे.


पुण्यात आधी रुग्णाला उपचारासाठी हॉस्पिटल नेण्याकरिता अॅम्ब्युलन्स मिळत नाही अशा तक्रारी असतानाच आता रुग्ण दगावल्यावर त्याचा मृतदेह न्यायला लवकर अॅम्ब्युलन्स मिळत नसल्याच्या तक्रारी सुरु झाल्या आहेत. शासन आणि प्रशासन सातत्याने कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी प्रयत्न करत असले तरी ते अपुरे पडताना दिसत आहेत. कोरोनाच्या संकटाकडे त्यातील उणिवांकडे राजकीय दृष्टीने न बघता वैद्यकीय दृष्टिकोनातून बघून त्यावर कशा पद्धतीने तोडगा काढला जाईल यासाठी एकत्र होऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोरोनाची परिस्थिती संपूर्ण देशात असली तरी महाराष्ट राज्यात ती अधिक गंभीर असून त्यानुसार पावले उचलणे अपेक्षित आहे. कोरोनाचे गंभीर परिणाम जसे शहरी भागात जाणवत आहे त्याचप्रमाणे ते ग्रामीण भागातही आहे. आरोग्यच्या सुविधा ग्रामीण भागात तुलनेने कमी असल्याने ग्रामीण भागातील रुग्ण शहरी भागात उपचार करण्याकरता येत आहे, त्यामुळे साहजिकच शहरी भागातील आरोग्य व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीही डॉक्टर्स, परिचारिका आणि अन्य वैद्यकीय सहाय्यक त्यांचे काम करीत आहेच. आरोग्य व्यवस्थेत मोठ्या बदलांची अपेक्षा आहेत, हे बदल एका रात्रीत होत नसतात हे मान्य असले तरी त्या बदलाची सुरुवात होणे गरजेचे आहे. या व्यवस्थेच्या दृष्टीने काही मोठे निर्णय घेऊन ते राबवावे लागणार आहेत. शासकीय रुग्णालये फक्त असून भागणार नाही तर त्यामध्ये कुशल मनुष्य बळाची आणि साधनसामुग्रीची कमतरता जाणवणार नाही या गोष्टीकडे लक्ष दयावे लागणार आहे.


कोरोना रुग्णांची संख्या का वाढत आहे ? याचा समाजातील सर्वच घटकांनी विचार केला पाहिजे. राज्य कोरोना विशेष कृती दलाचे सदस्य डॉ शशांक जोशी, सांगतात कि, " टेस्टिंगचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात लक्षणविरहित रुग्णाचे प्रमाण वाढले आहे. त्याचप्रमाणे, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधरविण्याची गरज आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे." या अशा परिस्थितीवरून नागरिकांनी बोध घेऊन सार्वजनिक जीवनात स्वतःचा वावर सुरक्षित कसे ठेवता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सगळ्याचं गोष्टीचे खापर शासनावर फोडणे योग्य होणार नाही. शासनाने सुरक्षिततेचे काही नियम आखून दिले आहेत त्याचे पालन सगळयांनीच करणे अपेक्षित आहे.


आजाराचा संसर्ग वाढत जाणे आणि रुग्णबाधित रुग्ण बरे होणे या दोन भिन्न गोष्टी आहेत हे आधी आपण लक्षात घेतले पाहिजे. रुग्णाबाधित रुग्ण बरे होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र त्याचवेळी संसर्गाचा फैलाव होऊन नवीन रुग्णाचे निदान, तेही बरे होणाऱ्या रुग्णापेक्षा अधिक वाढणे ही चिंताजनक बाब आहे हे आपण येथे ध्यानात घेतले पाहिजे. राज्याचा आरोग्य विभाग दररोज मेडिकल बुलेटिन जारी करत असतो , त्यानुसार सोमवारी जी आकडेवारी जाहीर केली होती त्याप्रमाणे 14,922 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे आणि 16,429 नवीन रुग्णांनाच निदान झाल्याचे सांगण्यात आले आहे यावरून नवीन रुग्णांची आकडेवारी वाढत आहे. तसेच 423 रुग्णाचा मृत्यू झाला आहे असेही या बुलेटिन मध्ये सांगण्यात आले आहे, दिवसागणिक या आजाराने होणाऱ्या मृत्यूची संख्याही बऱ्यापैकी आहे. सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 71.38 % एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर 2.93 % आहे.


मुंबई शहराच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख आणि के इ एम रुग्णलायचे, माजी अधिष्ठाता, डॉ अविनाश सुपे, सांगतात की, " रुग्णसंख्या वाढतआहे हे वास्तव आहे ते कुणी नाकारून चालणार नाही. विशेष म्हणजे शासनाने आरोग्यच्या सुविधा वाढविल्या आहेत हेही तितकंच खरं आहे. लोकांमध्ये या रुग्णवाढीमुळे एक वेगळ्या प्रकारची भीती निर्माण झाली आहे. सध्या आहे त्या आरोग्य व्यवस्थेत रुग्णांना उपचार देणे शक्य आहे, याकरिता रुग्णांचे वर्गीकरण व्यवस्थतीत व्हायला पाहिजे. यामध्ये जे वयस्कर रुग्ण किंवा ज्या रुग्णांना काही आधीपासून जुनाट व्याधी आहेत अशा रुग्णांना हॉस्पिटल मध्ये बेड देणे आवश्यक आहे किंवा जे रुग्ण अत्यवस्थ आहेत त्यांना तात्काळ मोठ्या रुग्णालयात दाखल केले पाहिजे. तरुण रुग्ण आहेत ज्यांना सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत त्यांनी शासनाने उभारलेल्या जम्बो फॅसिलिटीची सुविधा घेतली पाहिजे. शेवटी रुग्णाचे व्यवस्थित वर्गीकरकरण करून त्यांना योग्य ठिकाणी दाखल केलं पाहिजे. ज्या ठिकणी जम्बो फॅसिलिटी आहेत त्या ठिकणी कार्डिअॅक अॅम्बुलन्सची व्यवस्था आरोग्य विभागाने करून ठेवणे अपेक्षित आहे."


मोठ्या संख्यने रुग्ण घरी गेले आहे ही गोष्ट चांगली आहे. याचा अर्थ आपल्या डॉक्टरांचे रुग्णावरील उपचार योग्य पद्धतीने सुरु आहे रुग्ण औषधांना प्रतिसाद देत आहेत. मात्र यामुळे या आजराचा संसर्ग कमी झाला असा होत नाही. दररोज नवीन होणाऱ्या रुग्णाचं प्रमाण ज्यावेळी कमी व्हायला लागेल त्यावेळी खऱ्या अर्थाने हा आजाराला आपण पायबंद घालण्यास सुरुवात झाली असं म्हणता येईल. नागरिकांनीही मोकळीक मिळाली आहे म्हणून विनाकारण प्रवासाकरिता बाहेर पडणे योग्य नाही. गर्दीची सर्व ठिकाणं टाळलीच पाहिजे. ह्या आजाराचं वर्तन कसे असेल अजून तरी सांगणे कठीण आहे. आरोग्य यंत्रणेवर नागरिकांचा विश्वास राहील यापद्धतीने नागरिकांशी योग्य तो सवांद साधला पाहिजे. अशा साथीच्या आजाराच्या काळात अनेक नागरिक समस्या निर्माण होणे हे अपेक्षित जरी असले तरी त्यावर तोडगा काढावाच लागेल, शेवटी येथे प्रत्यके जीव महत्वाचा आहे. नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळाल्याच पाहिजे त्या नाही मिळाल्या कि तक्रारी ह्या येणारच आहेत. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन त्या समस्येवर मात करत पुढे जात राहिले पाहिजे.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग