एक्स्प्लोर

राणी पद्मावती, इव्हांका ट्रम्प आणि निर्भया...

आपलं शील हेच आपलं जीवन असं राणी पद्मावतीला का वाटलं असावं याचं चिंतन आपला समाज करत नाही. किंबहुना पद्मावतीने शस्त्र हाती धरून शरीरातील शेवटचा श्वास असेपर्यंत लढा का दिला नाही याचे उत्तर समाजाच्या मानसिकतेत मिळते.

मागच्या आठवड्यात आपल्या देशात तीन घटना घडल्या ज्यांचे परिघ भिन्न होते पण त्यांची त्रिज्या स्त्रियांशी संबंधित होती. स्त्री विषयक तीन भिन्न जाणिवांची प्रचीती या घटनांनी दिली. आपल्या देशातील जनतेचा आणि राजकारण्यांचा स्त्रीविषयक संकुचित दृष्टीकोन यातून उघडा पडला. आपल्या इतिहासात डोकावून पाहताना एकेकाळच्या मातृसत्ताक कुटुंब पद्धतीचे दाखले नेहमी दिले जातात. मातृसत्ताक कुटुंब पद्धती प्राचीन काळी भारतात सर्वत्रच अस्तित्वात होती का यावर देखील मतभेद आहेत. पण सिंधू संस्कृती आणि द्रविड संस्कृतीत देखील याच्या पाऊलखुणा आढळतात. आजघडीला ही पद्धत जवळपास नामशेष झालीय अन कधी काळी कुटुंबप्रमुख असणारी स्त्री आता भोगदासी अन वस्तूविशेष होऊन राहिली आहे. नाही म्हणायला ईशान्येकडील राज्यांपैकी मेघालयातील गारो या मुळच्या इंडोतिबेट आणि खासी या माओ- ख्येर लोकांच्या वंशज असलेल्या आदिवासी जातीतच ही मातृसत्ताक पद्धती अजूनही अस्तित्वात आहे. म्हणजे जे आदिम काळापासून निसर्गाचा पोत जपत आलेत, ज्यांनी अजूनही माणुसकी निभावताना डिजिटल युगाला आपलेसे केले नाही त्यांनी मातृसत्ताक कुटुंब पद्धतीची कास सोडलेली नाही अन जे महासत्ता व्हायची स्वप्ने पाहतात, टेक्नोसेव्ही जगाचे जे पाईक होऊ इच्छितात त्यांनी मात्र स्त्रीला मातृसत्ताक पद्धतीतील शीर्ष स्थानावरून खाली खेचून थेट पायाखाली रगडायचेच बाकी ठेवले आहे. असो. स्त्रीत्व हे स्त्रीला लाभलेलं वरदान आहे की शाप आहे असं म्हणण्याची पाळी यावी इतक्या वेगाने कालचक्र मागे फिरवत मध्ययुगीन कालखंडाकडे आपण सध्या वाटचाल करत आहोत. या निष्कर्षाच्या मागे एक पार्श्वभूमी आहे. ती म्हणजे राणी पद्मावतीचा जोहार आणि आताचा पद्मावती चित्रपटाचा वाद. राणी पद्मावतीचं अस्तित्व होतं की ते केवळ ऐक काल्पनिक पात्र होतो यावर अजूनही मोठ्या प्रमाणात मतमतांतरे आहेत. मात्र काही इतिहासकार अशी कथा सांगतात - आताच्या राजस्थानातील संघलचे राजा गंधर्व सेन आणि राणी चंपावती यांची पद्मावती ही कन्या होती. मनमोहक सौंदर्याची खाण असणाऱ्या पद्मावतीच्या स्वयंवराचे आयोजन केले गेले. चित्तोडचे राजा रावल रतन सिंह यांच्या गळ्यात तिने माळ घातली. राणी पद्मावतीच्या सौंदर्याची ख्याती सर्वदूर पसरली होती, अगदी अफघाणीस्तानातील गझनीहून आलेल्या अन दिल्लीच्या तख्तावर ताबा मिळवलेल्या सुलतान अल्लाउद्दीन खिलजीलाही तिचा मोह झाला. पद्मावतीच्या सौंदर्यावर भाळलेल्या अल्लाउद्दीन खिलजीनं थेट चित्तोड गाठले. चित्तोड किल्ल्याच्या तटबंदीने हैराण झालेल्या खिलजीने केवळ पद्मावतीचे मुखदर्शन करण्यासाठी खलिता पाठविला. परपुरुषासमोर आपला चेहरा दाखवणं हा रजपुतांसाठी अपमान होता. पण युद्ध टाळण्यासाठी राजा रतनसिंह यांनी तो स्वीकार केला. आरशाद्वारे मुखदर्शनाची अट घालण्यात आली. पद्मावतीचे निखळ सौंदर्य पाहून खिलजी तिच्यावर फिदा झाला. त्याचा इरादा बदलला आणि राजा रतन सिंहला कैद केले. जोपर्यंत पद्मावती शरण येत नाही तोपर्यत राजाला सोडणार नाही, अशी धमकी दिली. तेव्हा राणी आणि सैनिकांनी मिळून अट ठेवली की राणी आपल्यासोबत ७०० दासी घेऊन येईल. याला खिलजी तयार झाला. दुसर्‍या दिवशी पालख्या बघून खिलजी खूश झाला परंतू त्यातून राणी आणि तिच्या सख्यांऐवजी सैनिक भरलेले होते. त्यांनी खिलजीच्या छावणीवर हल्ला केला आणि राजाची सुटका करवली.
अपमानित खिलजीने युद्ध छेडले. लढाईत चित्तोडचे अनेक सैनिक मारले गेले. युद्धात राजा रतनसिंह यांचाही मृत्यू झाला. चित्तोडचा अभेद्य किल्ला भेदला गेला. पण त्यांच्या हाती लागण्यापेक्षा किल्ल्यातल्या स्त्रियांनी सती जाण्याचा निर्णय घेतला. राणी पद्मावतीने किल्ल्याच्या आत चितेत उडीत घेण्याचा निर्णय घेतला. स्त्रियांना बंदी बनवण्यास खिलजीने किल्ल्यात प्रवेश करताच राणी पद्मावती यांच्यासह जवळपास १६  हजार महिलांनी सामूहिक चितेमध्ये उडी घेतली. सतीच्या या प्रकारालाच राजस्थानमध्ये जोहार म्हणतात. या कथेत स्त्रीच्या मनाची अन स्त्रीत्वाची अनेक शकले उडवली गेलीत याकडे आपला समाज कधीच लक्ष देत नाही. पद्मावतीने काय करावे आणि काय नाही हे तिचा पती रतनसिंह सांगेल तशा पद्धतीने ठरते. पद्मावती ही केवळ असीम देखणी आहे म्हणून एका आक्रमकाला ती निव्वळ भोगवस्तू वाटते. पद्मावतीचं कर्तृत्व वा तिची विचारधारणा याहून तिच्या देखणेपणाला जास्त किंमत होती. किंबहुना आजच्या समाजात देखील बाह्य रंगरुपालाच अफाट महत्व दिले जातेय, कर्तृत्व, व्यक्तिमत्व आणि अंगभूत गुण यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. खिलजीला तर तिच्या देहभोगाशीच जास्त मतलब होता म्हणजे त्याच्या लेखी पद्मावती ही एक 'विषयवस्तू' होती. रतनसिंहांना यापैकी नेमके कशाचे वाईट वाटले असावे किंवा संताप आला असावा याचा धांडोळा घेतला तर असे लक्षात येते की, आपल्या पत्नीवर खिलजीची वाईट नजर पडली यामुळे ते क्रोधीत झाले. खिलजीच्या स्वारीदरम्यान अन्य कुठल्याच बायका नासवल्या गेल्या नाहीत का याचे उत्तर नकारार्थी येते. मग अन्य स्त्रियांविषयी, प्रजेविषयी रतनसिंहांचा दृष्टीकोन इतका संतापी होता का याचे उत्तर मिळत नाही.
आपलं शील हेच आपलं जीवन असं राणी पद्मावतीला का वाटलं असावं याचं चिंतन आपला समाज करत नाही. किंबहुना पद्मावतीने शस्त्र हाती धरून शरीरातील शेवटचा श्वास असेपर्यंत लढा का दिला नाही याचे उत्तर समाजाच्या मानसिकतेत मिळते. स्त्रीने कोणती कामे करावीत आणि कोणती कामे वर्ज्य करावीत याचे अलिखित संकेत आहेत त्यावर पुरुषी वर्चस्ववादाचा कटाक्ष कायम असतो. पद्मावतीने जोहार केला तेंव्हा तिच्यासोबत शेकडो स्त्रिया होत्या. या स्त्रियांची पलटण उभी करून तिने मनात आणले असते तर आपला मृत्यू होणार आहे हे ठाऊक असूनही खिलजीशी युद्ध पुकारून रणांगणात देह ठेवला असता. पण त्या उलट तिने अब्रू हेच सर्वस्व समजत अग्नीकुंडात जीव दिला ! स्वतःला जिवंत जाळून घेतलं. बाईचं सर्वस्व तिच्या अब्रूत आहे हा सिद्धांत कुणी मांडला ? स्त्रीचं सर्वस्व तिच्या अब्रूत आहे तर मग पुरुषाचे सर्वस्व कशात आहे याचे या सिद्धांतवादयांकडे काय उत्तर आहे ? यावर ते मिठाची गुळणी धरतील. सेक्स ही एक भावना आहे आणि तिचे शमन करण्यासाठी निसर्गाने स्त्री आणि पुरुषाला जननेंद्रिय दिली आहेत. जगातील सर्वच सजीव प्राण्यात मादी आणि नरांस निसर्गाने ही देणगी दिली आहे. मग स्त्रीचे शील हेच तिचे सर्वस्व कसे काय होऊ शकते ? तिचे कर्तृत्व, तिचे विचार, तिचा मान सन्मान, तिचा संघर्ष हे कसे काय अब्रूहून मागे उरतात ? त्याचवेळी पुरुषाचे श्रेष्ठत्व ठरवताना याच गोष्टींचा विचार करून त्याला वेगळे मापदंड लावले जातात. हा भेदाभेद इथेच थांबत नाही. नवरा मेला म्हणून बाईने सती जायचे मग बायको मेल्यावर पुरुष का जात नसत याचे उत्तर हा दांभिक रूढीवादी समाज देत नाही. त्याहून वाईट गोष्ट अशी की पद्मावतीने जोहार केला तेंव्हा रतनसिंहाच्या राज्यातील अन्य सामान्य पुरुष मंडळी काय करत होती यावर कुणी बोलत नाही उलटपक्षी पद्मावतीने केलेला जोहार हा समाजाची अस्मिता होऊन बसला आहे. 'पती मेला म्हणून आणि आपली अब्रू लुटली जाईल म्हणून शेकडो महिला जाळून घेतात' ही बाब भूषणावह आहे की पुरुषी पराक्रमाच्या तथाकथित लबाडयांना उघडं पाडणारं एक विखारी सत्य आहे यावर आम्ही विचार करत नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे जिथे बायका सती गेल्या ती ठिकाणे आजही राजस्थानात सतीमंदीर म्हणून पुजली जातात अगदी चितोडच्या किल्ल्यातही हे तथाकथित शक्तीस्थळ आहे. या गोष्टींची खरे तर लाज वाटायला हवी ती आम्ही भूषणे समजतो आहोत. असे करण्यामागे एक कुटनीती आहे. बाईने पुरुषाच्या अधीन राहावे हा दुर्विचार त्यात लपलेला आहे.
पद्मावतीच्या घटनेला शेकडो वर्षे लोटलीत तरी आपल्या समाजाच्या डोक्यातील जोहाराचे भूत उतरले नाही उलट त्याचा मोठा उदोउदो करण्यासाठी संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावती' चित्रपटाचा वापर केला जात आहे. या चित्रपटावर बंदी आणण्यापासून ते चित्रपटात नायिकेचे काम करणाऱ्या दीपिका पदुकोन या अभिनेत्रीचे नाक कापण्याच्या धमक्या देण्यापर्यंत आणि संजय भन्साळी यांचा शिरच्छेद करण्यापर्यंत धमक्या दिल्या गेल्यात. चित्रपटात इतिहासाशी छेडछाड केली असेल तर त्याचे समर्थन कोणीच करणार नाही. पण एकीकडे पद्मावतीचा गौरव करताना ती एक महान स्त्री होती असे म्हणायचे आणि दुसरीकडे एका स्त्रीला नाक कापण्याच्या धमक्या द्यायच्या ! किती विरोधाभास आहे हा ! समाजात रुजत चाललेला पुरुषी वर्चस्ववाद मध्य युगाकडे वाटचाल करत असल्याची ही चिन्हे आहेत. एक स्त्री म्हणून सर्वच कर्तृत्ववान स्त्रियांचा समान गौरव व्हायला हवा. योगायोगाने याच काळात अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका ट्रम्प भारतात आल्या होत्या. ग्लोबल एन्टरप्रिन्युअरशिप समिटमध्ये अर्थात जागतिक उद्योजक परिषदेत सहभागी होण्यासाठी त्या भारतात आल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेचं उद्घाटन केलं होतं. `यंदाच्या या परिषदेचा विषय चक्क ‘वुमेन फर्स्ट, प्रॉस्पॅरिटी फॉर ऑल’ असा होता. परिषदेत १२७ देशांमधील १२०० हून अधिक तरुण उद्योजक सहभागी झाले होते ज्यात महिलांची संख्या जास्त होती. इथे लक्षात येते की जागतिक पातळीवरील महिला आपली कूस बदलत आहोत आणि आपण आजही समाजाला लांच्छन असणारा पुरुषी वर्चस्ववाद छुप्या अभिनिवेशात जतन करत आहोत. विशेष म्हणजे या परिषदेच्या निमित्ताने मोदींनी स्त्रीशक्तीचं कौतुक केलं. मग 'दीपिकाचे नाक कापू' असं म्हणणारया विचारधारेविषयी त्यांचे मत ते का मांडत नाहीत याचा सोयीस्कर विसर आपल्या माध्यमांना होतो. इव्हांका ट्रम्पचा गौरव हे आपले दाखवायचे दात आहेत आणि 'दीपिकाचे नाक कापू' असे म्हणणे हे आपले खाण्याचे दात आहेत असा साधा हिशोब आहे, पण तो आपण दाखवत नाही. डोनल्ड ट्रम्प देखील स्त्रीभोगवादाचे कधी उघड तर कधी छुपे पुरस्कर्ते असल्याचा युक्तिवाद काहीजण यावर करू शकतात.
याच आठवड्यात घडलेली तिसरी घटना म्हणजे महाराष्ट्रातील कोपर्डी येथे घडलेल्या एका कोवळ्या मुलीवर  बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी तिन्ही आरोपींना दोषी ठरवून त्यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनवली. या खटल्याचे जातीय अंग हा एका वेगळ्या लेखाचा विषय होईल इतकी खळबळ या दरम्यान उडाली होती. कोपर्डी खटल्याचा निकाल लागताच अनेक स्त्रियांच्या मुलाखती वाहिन्यांवर दाखवल्या गेल्या, वर्तमानपत्रात रकानेच्या रकाने भरून बातम्या आल्या, प्रतिक्रिया देणाऱ्या महिलांची छायाचित्रे प्रसिद्ध झाली. आरोपींची छायाचित्रे, निकालादरम्यानची क्षणचित्रे आणि काही जुने बाईट्स दाखवले गेले. या सर्वात अत्यंत विस्मयकारक आणि लज्जास्पद साम्य होते. फोटोतील सर्व बायकांनी आपली तोंडे झाकली होती, वाहिन्यांवर बोलणारया ग्रामीण स्त्रियांनीही नाकापर्यंत पदर ओढून, खाली मान घालून बोलत होत्या. तर आरोपी निर्ढावल्यागत उभे होते. वर्तमानपत्रे आणि वाहिन्यांनाही याचे वैषम्य वाटले नसावे. या स्त्रियांनी तोंड झाकण्याची आवश्यकता नसून या पुरुषांनी खरे तर तोंड लपवायला हवे. कारण माणुसकीला काळिमा त्यांनी फासला आहे या बायकांनी नव्हे. पद्मावतीचा जोहार असो वा दीपिकाचे नाक कापणे असो वा निर्भयाच्या शिक्षेनंतर तोंड झाकून शोकाकुल, संतप्त झालेल्या बायका असोत या सर्वांवर एक दडपण आहे, एक दहशत आहे, एक कटाक्ष आहे आणि तो शोषणात्मक व्यवस्थेचा आहे जिने पुरुषांच्या तागडयात झुकते माप टाकले आहे. आपला हा चेहरा आपण इव्हांका ट्रम्पच्या गौरवासारख्या प्रसंगी साळसूदपणे झाकत नारीशक्तीचा दांभिक एल्गार उजागर करत राहतो.  आपल्या खऱ्या चेहऱ्याला आपण अंतर्मनाच्या आरशात कधीच न्याहाळणार नाही का ? -                                                                                                                                                           
 
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hardik Pandya : हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, गुजरात विरुद्धच्या मॅचचं ठिकाण बदलावं लागलं, आता पांड्याची SMAT मधून एक्झिट, कारण समोर
हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, आयोजकांवर सामन्याचं ठिकाण बदलण्याची वेळ, काय घडलं?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने संवैधानिक शिस्त पाळली नाही, निवडणुका पुढे ढकलल्यावरुन हायकोर्ट संतप्त
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने संवैधानिक शिस्त पाळली नाही, निवडणुका पुढे ढकलल्यावरुन हायकोर्ट संतप्त
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
Mumbai Goregaon Vivek College : गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बुरखा आणि हिजाबबंदीवरून तणाव
Kishori Pednekar on Nashik : साधुसंतांना पुढे करून वृक्षतोड करणार असाल, तर कोणी सहन करणार नाही
Sayaji Shinde PC : झाडं तोडणं साधु संताना पटेल का? सयाजी शिंदे यांचा तपोवनातील वृक्षतोडीवर सवाल
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya : हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, गुजरात विरुद्धच्या मॅचचं ठिकाण बदलावं लागलं, आता पांड्याची SMAT मधून एक्झिट, कारण समोर
हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, आयोजकांवर सामन्याचं ठिकाण बदलण्याची वेळ, काय घडलं?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने संवैधानिक शिस्त पाळली नाही, निवडणुका पुढे ढकलल्यावरुन हायकोर्ट संतप्त
मोठी बातमी! निवडणूक आयोगाने संवैधानिक शिस्त पाळली नाही, निवडणुका पुढे ढकलल्यावरुन हायकोर्ट संतप्त
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
Video: पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नांवर मंत्री गडकरींनी कालावधी सांगितला!
Video: पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नांवर मंत्री गडकरींनी कालावधी सांगितला!
Putin India Visit : नरेंद्र मोदी दबावात येणारे नेते नाहीत, भारताला त्यांचा अभिमान असला पाहिजे, व्लादिमीर पुतिन यांच्याकडून मोदींचं कौतुक
नरेंद्र मोदी दबावात येणारे नेते नाहीत, व्लादिमीर पुतिन यांच्याकडून भारत दौऱ्यापूर्वी मोदींचं कौतुक  
धक्कादायक! विधानसभा, लोकसभेला मतदान केलं, आता मतदार यादीतून माजी नगरसेवकाचंच नाव वगळलं
धक्कादायक! विधानसभा, लोकसभेला मतदान केलं, आता मतदार यादीतून माजी नगरसेवकाचंच नाव वगळलं
सदा सरवणकरांच्या लेकाचं मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत लग्न; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आशीर्वाद
सदा सरवणकरांच्या लेकाचं मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत लग्न; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आशीर्वाद
Embed widget