BLOG | झाडांचा हवेतील ऑक्सिजनशी संबंध
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या वाचनात एक लेख आला. यात पृथ्वीवर असलेल्या वृक्ष वेलींचे महत्व कमी करुन महासागरातील सूक्ष्म प्लवक हेच पृथ्वीवरील प्राणवायूचे प्रमाण नियंत्रित करतात असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, हे काही अंशी खरं असलं तरी दुसरी बाजू वेगळी आहे. कारण ज्या सर्वसामान्य लोकांना या पृथ्वीवर जीवनचक्र कसे काम करते ह्याची समज नाही, ती लोकं या माहितीचा दाखला देऊन वृक्षतोडीला बढावा देतील. त्यामुळे दुसरी बाजू समजून घेणे आवश्यक आहे.
पृथ्वीवर असलेल्या प्राणवायूपैकी जवळपास 75% प्राणवायू हा महासागरात असलेल्या सूक्ष्म वनस्पती बनवतात हे जरी खरं असलं तरी समुद्रात असलेल्या ह्या सूक्ष्म वनस्पती त्यांचे काम सुचारू पणाने करण्यासाठी त्यांना विशिष्ट तापमानाची आवश्यकता असते. हे तापमान अधिक वाढल्यास महासागरातील बहुतांशी सूक्ष्म प्लवक मरून जाईल.
आता थोडस मागे जाऊन विविध वनस्पती पृथ्वीवर कश्या आल्या ते पाहूया. सर्व प्रथम महासागरात जेव्हा सायनो बॅक्टरियाची उत्पत्ती झाली. तेव्हा महासागराचे तापमान अती उष्ण होतं. ह्या तापमानाला इतर कोणतेही समुद्री शैवाल तग धरू शकत नव्हते. त्यावेळी पृथ्वीचं तापमान अती उष्ण असण्यामागे कारण होतं वातवणातील कर्ब वायूचे अतिरिक्त प्रमाण जे एकूण 95% इतके जास्त होते. ज्यामुळे सूर्यापासून आलेली उष्णता पृथ्वीच्या वातावरणात जास्त शोषून राहत होती, ज्यामुळे तापमान उष्ण होत होतं.
सायनो बॅक्टरीया ह्या अतिउष्ण तापमानात देखील सक्षमरित्या काम करत होते. ज्यामुळे त्यांनी केलेल्या प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत दरम्यान पृथ्वीच्या वातावरणातील कर्ब वायूचे प्रमाण कमी होत जाऊन वातावरणात प्राणवायूचे प्रमाण वाढत गेले.
वातावरणात प्राणवायूचे प्रमाण वाढत होते आणि कर्ब वायूचे प्रमाण कमी होत होते. त्यामुळे पृथ्वीचे सरासरी तापमान देखील कमी होऊ लागले. आता कमी झालेल्या या तापमानामुळे समुद्रात आणखी काही नव्या सूक्ष्म वनस्पती प्लवकांची निर्मिती झाली. आणि आता महासागरातील सायनो बॅक्टेरियाचे प्रमाण कमी होत गेले. म्हणजेच सायनो बॅक्टेरियाने महासागरामध्ये आणखी नवीन सूक्ष्म वनस्पती प्लवकांना जगण्यासाठी नवीन परिस्थिती निर्माण केली. आता ह्या अतिसूक्ष्म आणि विविध प्रकारच्या वनस्पती प्लवकांनी महासागर व्यापून गेला आणि वातावरणातील अधिकाधिक कर्ब वायू शोषला जाऊन वातावरणात अधिकाधिक प्राणवायूची भर पडत गेली. ज्यामुळे वातावरण आणखी थंड होत गेले. आणि ह्या सूक्ष्म वनस्पतींनी महासागरामध्ये बहुपेशीय वनस्पतींना जन्म दिला. म्हणजेच बहुपेशीय वनस्पतींसाठी जागा निर्माण केली. आता ह्या बहुपेशीय वनस्पतींनी अधिकाधिक प्राणवायूची निर्मिती करून महासागरातले जीवन भूतलावर आणण्यासाठी धडपड सुरू केली. ज्याची फलश्रुती म्हणून पृथ्वीच्या वातावरणात ओझोन वायूची कवचकुंडले निर्माण झाली.
(ओझोन वायूचा थर नव्हता म्हणून जमिनीवर एकही वनस्पती आणि सजीव तग धरू शकत नव्हता. कारण सूर्यापासून निघालेली अतिनील किरणे भूतल भाजून काढत होती). आता ओझोन वायूच्या निर्मितीनंतर महासागरातून पाने, मूळ, खोड नसलेल्या अगदी साधारण लिव्हरवॉर्ट सारख्या वनस्पती सर्व प्रथम महासागरातून जमिनीवर आल्या. त्यांनी पाणथळ जमिनी शेजारी आसरा घेतला आणि पुढे ह्या वनस्पतींनी जमिनीवर इतर वनस्पती येण्यासाठी सुयोग्य परिस्थिती निर्माण केली. त्यावेळी पृथ्वीवर सर्वत्र अग्निजन्य खडक होते, ज्यावर कोणतीही वनस्पती तग धरू शकत नव्हती आणि खडकांमध्ये असलेली पोषक द्रवे घेऊ शकत नव्हती. अश्या परिस्थितीत दगडफुलांचा जन्म झाला दगड फुलांमधील (CRUSTOSE LICHEN) प्रकाराने दगडावर विविध रसायने सोडून दगडांचे विघटन केले. आणि त्यानंतर स्वतः देखील मरून गेलं. आता ह्या जागी lichen च्या दुसऱ्या प्रकाराने ही जागा व्यापून दगडांवर आणखी प्रक्रिया केली. आणि आता थोडी माती तयार झाल्यावर त्या ठिकाणी मॉस सारख्या वनस्पती वाढू लागल्या ज्यांनी जमिनीत आद्रता धरून ठेवायला सुरुवात केली आणि पावसाळा गेल्या नंतर जेव्हा ह्या वनस्पती मेल्या तेव्हा त्यावर गवत आणि इतर वनस्पती उगवल्या आणि हळू हळू वृक्ष उत्क्रांत होत गेले आणि जश्या वनस्पती उत्क्रांत होत गेल्या तसे हळूहळू एक एक करून प्राणी देखील महासागरातून उत्क्रांत होऊन बाहेर येऊ लागले.
असं करता करता आजच युग आले. आता सांगायचं तात्पर्य हे. की इथे प्रतेक वनस्पती/ जीवांनी जन्माला येऊन दुसऱ्या सजीवाला जगण्यासाठी आवश्यक परिस्थिती निर्माण केली. आणि त्या वेळी वातावरणात झालेले बदल आपसात जगण्यासाठी झालेला संघर्ष यात किती तरी जीव अस्तंगत झाले.
आता मूळ मुद्यावर येऊया, आजच्या परिस्थितीत महासागरातील सूक्ष्म प्लवकांची निर्मिती ही पूर्ण पणाने जमिनीवरील वृक्ष वनस्पतींवर अवलंबून आहे. जमिनीवर वृक्ष वेली, प्राणी पक्षी जगतात, मरतात आणि मेल्यानंतर सगळी पोषक द्रव्ये मातीत जातात. पुढे पाऊस पडतो आणि नदी मार्फत ही पोषक द्रव्ये समुद्रास मिळतात आणि तिथे सूक्ष्म वनस्पतीची निर्मिती होते.
आता समुद्रात असलेल्या वनस्पती ह्या अप्रत्यक्ष पणाने पोषक द्रवयांसाठी जमिनीवरील वृक्ष वेलींवर अवलंबून असतात. शिवाय जमिनीवरील वृक्ष वेली आणि महासागरातील सूक्ष्म वनस्पती एकत्र मिळून पृथ्वीवरील कार्बन डायऑक्साइडची मात्रा नियंत्रित करतात. जर जमिनीवरील सर्वच वृक्ष काढून टाकले तर पृथ्वीच्या सरासरी तापमानात प्रचंड वाढ होईल. (जी आता सुरू आहे.) ज्यामुळे महासागराचे तापमान वाढेल हे वाढलेलं तापमान महासागरात असलेल्या सूक्ष्म वनस्पतींसाठी अती जास्त होईल आणि त्यांना प्रकाश संश्लेषण करता येणार नाही. तसेच वाढलेल्या तापमानामुळे महासागरातील पोषकद्रव्ये वर खाली करणारा प्रवाह बंद होईल ज्यामुळे तळाशी गेलेली पोषक द्रव्ये पृष्ठभागावर येणार नाहीत आणि पोषक द्रव्ये नसतील तर सूक्ष्म वनस्पती निर्माण होणारच नाहीत. शिवाय तापमान वाढीमुळे बर्फ वितळेल ज्यामुळे देखील महासागराच्या पाण्याचा सामू बदलेल आणि हजारो वर्षे विशिष्ठ तापमान आणि विशिष्ट सामू मद्ये उत्क्रांत झालेली सूक्ष्म प्लवके एका झटक्यात नामशेष होतील.
ह्या पृथ्वीवर काहीच बिनकामाचे नाही. प्रत्येक सजीवने दुसऱ्या सजीवासाठी ही पृथ्वी अनुकूल केली आहे. एका कडीला हात लावाल तर दहा कड्या तुटतील आणि दहा कड्या तुटल्या की पुढच्या शेकडो. त्यामुळे पृथ्वी नीट समजण्यासाठी प्रयत्न करत रहावा ती दिसते तेवढी साधी सरळ नाही.