BLOG : "झाशीची रण-राणी महाराणी लक्ष्मीबाई"

आखिर कितना खुदगर्ज हो सकता है,
किसीका वतन के लिए सरफरोश हो जाना?
ख्वाहिशों के मोहल्ले को निलामी पे रखकर
वतन के नाम एहल-ए-वफा हो जाना।
विरांगणा महाराणी लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर, यांना झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखले जाते. त्या भारतातील महिला सक्षमीकरणाचे ज्वलंत उदाहरण आहेत. अतुल दृढनिश्चयाने भरलेल्या झाशीच्या राणीला भारताची 'जॉन ऑफ आर्क' म्हणून देखील ओळखले जाते. भारताच्या पहिल्या मुक्ती लढाईतील त्या एक प्रमुख व्यक्तिरेखा होत्या ज्यांनी ब्रिटिशांविरुद्ध शौर्याने लढा दिला आणि भारतीय इतिहासावर मोठी छाप पाडली.
महाराणी लक्ष्मीबाईचे मूळ नाव मनिकर्णिका होते. राणी लक्ष्मीबाई धोरणी, चतुर, युद्धशास्त्रात निपूण तसेच अद्वितीय नेतृत्वगुणी होत्या. त्यांचे पालनपोषण पेशव्यांच्या राजवाड्यात झाले आणि दुसरे बाजीराव पेशवे त्यांना प्रेमाने छबिली म्हणत. नानासाहेब आणि तात्या टोपे यांच्याकडून त्यांना मार्शल आर्ट्स, तलवारबाजी आणि घोडेस्वारीचे शिक्षण मिळाले. मनाची एकाता, चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे कौशल्य आणि चतुरस्त्र भान वृद्धिंगत करणाऱ्या मलखांब विद्येतही राणी लमीबाई तरबेज होत्या.
सन 1842 साली त्यांचा विवाह झाशी संस्थानाचे राजे महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. महाराज गंगाधरराव आणि महाराणी लक्ष्मीबाई यांना एक मुलगा झाला, परंतु तो तीन महिन्यांचा असताना मृत्यू पावला. त्यानंतर त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांचा मुलगा आनंदराव याला दत्तक घेतले आणि त्याचे नाव दामोदरराव असे ठेवले. नोव्हेंबर 1853 रोजी महाराज गंगाधररावांचे निधन झाले. महाराजांच्या मृत्यूनंतर ब्रिटिशांनी दामोदरराव यांना झाशीच्या सिंहासनाचा कायदेशीर वारस म्हणून मान्यता देण्यास नकार दिला. तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीने भारतीय संस्थाने खालसा करण्याचं धोरण अवलंबलं आणि त्याचाच भाग म्हणून झाशीच्या दत्तक वारसालाही त्याने मान्यता दिली नाही.
त्याकाळी भारत ब्रिटिशांकडून होणारे धार्मिक छळ, राजकीय तसेच मानवी हक्कांचे उल्लंघन आणि नैसर्गिक संपत्तीचे शोषण यांसारख्या घटनांना तोंड देत होता. यादरम्यान शतकानुशतके जुनी संस्थाने नामशेष होण्याच्या मार्गावर होती. जून 1857 रोजी राणी लक्ष्मीबाईंनी स्वत:चा राज्याभिषेक करुन घेण्याची घोषणा केली. झाशीच्या राजदरबारात त्यांना महाराणी अशी बिरुदावली लावली जायची. जेव्हा त्या शाही पोशाखात, विशेषतः महाराष्ट्रीय नऊवार साडी, खांद्यावर शेला, किंवा निळा मखमली पायजमा आणि लाल मखमली अंगरखा, डोक्यावर चंदेरी निळा फेटा आणि कमरेला रत्नजडित तलवार बांधनू राजदरबार यायच्या, तेव्हा त्यांना ही बिरुदावली दिली जायची.
सन 1853 मध्ये महाराणी लमीबाईंनी महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्या परवानगीने झाशी राजमहालाच्या अगंणात एक महिला सेना तयार करून सेनेचे नाव 'दुर्गा दल' असे दिले होते. तत्कालीन स्वातंत्रयुद्धात या नारी सेनेने इंग्रजांविरुद्ध लढा देत महत्त्वाची भूमिका बजावली. ज्या पद्धतीने हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय गव्हर्नर जनरल डलहौसीने घेतला होता. त्यानुसार झाशीच्या जनतेला उद्देशून एक जाहीरनामा काढण्यात आला. दत्तक विधान नामंजूर करुन झाशी संस्थान ब्रिटिश सरकारात विलिन करण्यात आले. या वेळी स्वाभिमानी राणीने 'मेरी झाँसी नह दुंगी'... असे स्फूर्तिदायक उद्गार काढले आणि ब्रिटिशांविरोधात लढा पुकारला.
दरम्यान, कंपनी राजवटीविरुद्ध आणि त्याच्या मार्गांविरुद्ध झालेला मोठा उठाव जून 1857 मध्ये झाशीपर्यंत पोहोचला. राणी लक्ष्मीबाईंच्या सक्षम राजवटीत झाशी लवकरच स्वातंत्रलढ्यातील क्रांतिकारकांचा गड बनला. झाशीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ 35 शिपायांनी झाशीत असलेल्या इंग्रजांना पळवून लावले.
या परिस्थितीत राणी लक्ष्मीबाईंनी इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता किल्ल्यावर राहण्याचा निर्णय घेतला. पुढे ब्रिटिशांनी राणी लक्ष्मीबाईंना झाशीची अधिकारसूत्रे हाती घेण्यास सांगितले. त्यांनी जुन्या विश्वासू लोकांना परत बोलावनू त्यांना महत्त्वाची पदे दिली. दिवाण लक्ष्मणरावांना प्रधानमंत्री, तर वडील मोरोपतं तांबे यांना खजिनदार नेमले. इंग्रजांविरुद्ध बंड करणाऱ्या शिपायांना आपल्या सैन्यात सामील करुन घेतले. यामुळे झाशीवर हल्ला करू पाहणाऱ्या ब्रिटिशांना राग आला. झाशीवर हला करण्याची जबाबदार सर ह्यू रोज यांना देण्यात आली होती.
दरम्यान, 21 मार्च 1858 रोजी सकाळी सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झाशीजवळ आला. त्याने राणीला नि:शस्त्र भेटीस येण्यास किंवा युद्धास तयार राहण्यास सांगितले. परंतु, राणींने भेटीस जाण्यास नकार दिला. याच वेळी त्यांनी तात्या टोपेंना एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्याची सूचना केली. ह्यू रोजने झाशीच्या किल्ल्यावर मारा करण्यासाठी आजूबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळवला आणि तिथे तोफा चढवल्या. युद्धाच्या नवव्या दिवशी इंग्रजांनी पश्चिमेकडील तोफा बंद पाडून त्या बाजूच्या तटाला खिंडार पाडले.
राणी लक्ष्मीबाईंनी सर्व फौजेला धीर देताना स्वत:च्या बळावर लढण्याचे आवाहन केले. रणांगणात तुम्हाला मृत्यू आला, तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची व्यवस्था मी करेन असं आश्वासन राणी लक्ष्मीबाईंनी त्यांच्या सैनिकांना दिलं. राणीचे डावे-उजवे हात असणारे खुदाबक्ष आणि गौसखान इंग्रजांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडले, तेव्हा परिस्थिती बिकट झाली. एका अनुभवी सरदाराने पुढचा धोका लक्षात घेऊन राणीला परत किल्ल्यावर नेले. सर्व फौजी अधिकाऱ्यांशी चर्चा करुन राणीने रातोरात झाशी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सतत 11 दिवस त्यांनी ब्रिटिशांना झुलवत ठेवले.
झाशीतील पराभवानतंर 3 एप्रिलच्या मध्यरात्री राणी लक्ष्मीबाई आपल्या सारंगी घोडीवर स्वार होऊन, पुत्र दामोदररावांना पाठीशी बांधून , किल्ल्यावरून खंदकात उडी मारून काल्पीला गेल्या. कोंच आणि काल्पी येथील पराभवानंतर त्या रावसाहेब पेशव्यांसह 1858 रोजी ग्वाल्हेरला पोहोचल्या. ग्वाल्हेरजवळील कोट्याच्या लढाईत राणी लक्ष्मीबाईंनी शेवटपर्यंत लढा दिला. ब्रिटिशांविरोधात लढताना 17 जून 1858 रोजी रणांगणातच त्यांचा मृत्यू झाला.
राणी लक्ष्मीबाईंच्या मृत्यूनंतर वीस वर्षांनी कर्नल मॅलेसन यांनी 'हिस्ट्री ऑफ द इंडियन म्युटिनी (खंड 3)' मध्ये लिहिले," ब्रिटिशांच्या नजरेत तिच्या चुका काहीही असल्या तरी, तिचे देशवासी नेहमीच लक्षात ठेवतील की ती... तिच्या देशासाठी जगली आणि मरण पावली. भारतासाठी तिचे योगदान आपण विसरू शकत नाही."

























