द पोएट - मिसफिट ऑस्करची ट्रॅजिक कॉमेडी

यंदाचा सर्वात आवडलेला सिनेमा कोणता? असं जर कुणी विचारलं तर त्याचं उत्तर एकच. ए पोएट (२०२५). देश कोलंबिया. दिग्दर्शक सिमोन मेज़ सोतो. कोलंबियातल्या मेडेलीन भागात सिनेमाचं कथानक घडतं. चाळीसी पार केलेला ऑस्कर रेस्ट्रेपो (उबैमर रीओस) एक अयशस्वी कवी आहे. कवितेशिवाय त्याला काहीच येत नाही. तरुणपणी ऑस्कर मोठा माणूस होणार असं भाष्य करणारे अनेकजण असतात. पण तसं घडत नाही. ऑस्कर एक टॉर्चर्ड आर्टिस्ट होतो. आता हे टॉर्चर आर्टिस्ट म्हणजे एखादा चांगला कलाकार जो वाया गेलाय. आता तो वाया जाण्याला अनेक कारणं असतात. त्याच्या अंतर्मनातली वेदना, भावनिक गुंतागुंत, मनस्पात, निराशा अश्या गर्तेत सापडलेला हा कलाकार असतो. सततच्या या निगेटिव्ह भावनांमुळे तो थोडासा वेडसर वाटायला लागतो. अनेकदा व्यसनाधीन होतो. समाजाच्या दृष्टींनं तो टाकावू बनतो. म्हणजे त्याच्या असण्या-नसण्याने काहीही फरक पडत नाही. सततची नशा, त्यातून येणारी निराशा, दारुच्या गुत्यांवरची भांडणं, मारामारी आणि जबाबदारीची जाण देणारी त्याची आजारी आई असं सर्व काही ऑस्करच्या बाबतीत घडतंय.
ऑस्करच्या या मनस्थितीला प्लॅटोने ‘डिव्हाईन मॅडनेस’ असं म्हटलं आहे. गोथेच्या ‘द सफरिंग्स ऑफ यंग विर्थर (१७७४) नुसार त्याला ‘हायपर सेंसिटीव्ह’ म्हणजे प्रचंड भावनाशील असं नाव दिलं. पुढे जाऊन २० व्या शतकाच्या सुरुवातीला व्हँग गॉग हे टॉर्चर्ड आर्टिस्टचं मोठं उदाहरण ठरलं. म्हणजे हे लोक आपल्या भावविश्वात अडकतात. त्यातून अनेकदा त्याच्याकडून उत्कृष्ठ साहित्य किंवा कलानिर्मिती ही होत असते. पण तात्कालिन जगाला त्याची किंमत नसते. आपण फेल झालोय हे ऑस्करला माहितेय. ते त्याला ते सहन होत नाही. तो अत्यंत अस्वस्थ बनतो. अश्यावेळी आपल्या सारखीच प्रतिभा असलेली एक विद्यार्थिनी त्याला दिसते. जे आपलं झालं ते तिच्याबाबतीत होऊ नये यासाठी आता त्याचा आटापिटा सुरु होतो आणि यातून जे नाट्य घडतं ते अगदी भन्नाट आहे.
दिग्दर्शक सिमोन मेज़ सोतोच्या द पोएट (२०२५) या सिनेमाची मांडणी ट्रॅजिक कॉमेडी प्रकारात मोडते. दुखद घटना घडलेली असतानाही त्यातून विनोद निर्मिती करण्याची ही प्रक्रिया प्रेक्षकांना हसवून हसवून पार वेडं करते. सिमोन या कथानकाशी आपला स्वत:चा संबंध सांगतो. पहिला सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी त्याला फार ओढाताण करायला लागली. त्यातून तो निराश झाला. हे असं असेल तर सिनेमा क्षेत्रं सोडून पूर्णवेळ प्रोफेसरगिरी करण्याचा निर्णय त्यानं घेतला. अखेर आपण जे जगलोय त्यावर सिनेमा करुन शेवटचा चान्स का घेऊ नये ? यातून पोएटची संकल्पना सुचली. द पोएट (२०२५) सिनेमाला प्रतिष्ठेच्या कान आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हमध्ये सर्टन रिगार्ड सेक्शनमध्ये स्पेशल ज्युरी पुरस्कार मिळाला. त्यानंतर तो लागलीच कोलंबियात रिलीज करण्यात आलाय. प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतला. याच्या जोरावर द पोएट (२०२५) कोलंबियाकडून ऑस्कर पुरस्काराच्या स्पर्धेत पोचला. आज तो पुरस्कारच्या शॉर्टलिस्टमध्ये नसला तरी तो जगभरातल्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये नावाजलेला यंदाचा सर्वात गाजलेला सिनेमा आहे.
“ऑस्कर पुरस्काराच्या स्पर्धेत मी टिकणार नाही, हे मला माहितेय, तिथली सर्व स्पर्धा ही पीआर किंवा पब्लिसिस्ट ठरवतात. ऑस्करच्या प्रत्येक वोटर पर्यंत पोचणं मला शक्य नाही. हे मला माहित आहे. पण जगभरातून प्रेक्षकांचं द पोएटला जे प्रेम मिळालं ही सर्वात चांगली गोष्ट आहे. “ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (इफ्फी) मध्ये द पोएटसाठी उबैमर रीओसला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यावेळी बोलताना सिमोननं ही प्रतिक्रिया दिली होती. त्याआधी कैरो आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्येही याला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. मुख्य म्हणजे उबैमर रीओसचा अभिनेता म्हणून पहिल्यांदा कॅमेरासमोर काम करत आहे.
हे जग यशस्वी माणसाच्या पाठीमागे धावणारं आहे. त्यांची संख्या मोजकीच असते. असंख्य अपयशी लोक यशस्वी होण्याच्या स्पर्धेत धावत असतात. एका संधीच्या प्रतिक्षेत असतात. अपना टाइम आएगा असं म्हणत आपल्या निराश मनाचं ओझं खांदयावर घेऊन चालत असतात. आतून खचलेले असतात. ही प्रक्रियाच प्रचंड वेदनादायी असते. द पोएट (२०२५) सिनेमातला कवी ऑस्कर हा जगातल्या अश्याच अपयशी लोकांचं प्रतिनिधीत्व करतो. आपल्या आसपास अशी अनेक अपयशी माणसं वावरत असतात. खरं सांगायचं झालं तर जग हे अश्या अपयशी लोकांचंच आहे. सर्व लोक यशस्वी झाले असते तर या जगात जगणं मुश्किल झालं असतं. ऑस्करला समाजानं मिसफिट ठरवला असला तरी तो या समाजाची घडी नीट करण्यासाठी तितकाच आवश्यक आहे. असं सिमोन सांगतो.
























